Login

झक मारली आणि पार्टीला गेलो

Husband Wife Fight Scenes Described

झक मारली आणि पार्टीला गेलो

माझं लग्न झाल्यावर वाटलं होतं की, आम्ही नवरा-बायको टिपिकल नवरा-बायकोसारखे न राहता, एकमेकांचे चांगले मित्र होऊ. सुरुवातीला खरंच तसंच होतं. जणू आमचंच एक छोटंसं जग होतं आणि बाकी काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं.
पण म्हणतात ना, "श्रीहरी जगद्पिता, दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा..." – अगदी तसाच आमचा संसारही सुरु झाला.
सुरुवातीला वाटायचं, जाऊ दे, आपलीच बायको आहे, कशाला उगाच तक्रार करायची. पण आता मात्र सहन होत नाही. वाटतं, गरीब नवऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची वाचा निदान मी तरी फोडावी, म्हणून लिहतोय...
तर, झालं असं की, आमच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. लग्नाआधी कधी पार्टीला गेलो, तर सरळ मध्यरात्री परतायचो. पण आता लग्न झालंय, म्हणून ठरवलं वेळेत जाऊ आणि वेळेत परत येऊ.
तरीही, सरकारची (म्हणजे बायकोची) परवानगी घेतलीच:
ती: किती लांब आहे पार्टी?
मी: इथेच आहे, 7-8 किलोमीटर लांब.
ती: बरं जा, पण रात्री 10 वाजता घरात या, नाहीतर तुमच्या आईला फोन करेन!
मी: पार्टीला नकोच जायला, तू घरी एकटीच असशील..
ती: अहो जावा की, मस्त एन्जॉय करा. तुम्ही येउपर्यंत मी सिरीयल्स बघते.
मी: येताना गरम नूडल्स आणतो...नाही नाही, नको नूडल्स... बटर पनीर आणतो, म्हणजे उरलेलं मी दुसऱ्या दिवशी खाईन.
ती: काही नका आणू, मी काहीतरी करून खाईन.
मी: अगं, मी बाहेरून येणार आणि तुझ्यासाठी काहीही न आणता येणार, कसं दिसेल ते ?
ती: अजिबात काही नका आणू, जावा आणि वेळेत या.
संध्याकाळी ट्रॅफिकमुळे पोहोचायला 8:30 वाजले. खाणं-पिणं झालं, आणि आम्ही थोडं नाचलो. 10 वाजता लक्षात आलं की निघायला हवं.
फोन पाहतो, तर 9:30 पासून 10 मिस्ड कॉल्स!
मित्र म्हणत होते, "जा सिंडरेला जा, तुझी वेळ झालीय, 10 चा ठोका वाजलाय"
परत कॉल आला.

ती: काय ओ कुठंय ? किती वेळ अजून ? दिसतोय का नाही घराचा रस्ता?
मी: हो, निघालोय. अर्ध्या तासात पोहोचेन.
ती: लवकर या, नाहीतर आईला फोन!

घरी पोहोचलो, बघतो तर बायकोने जेवून हात धुतले होते. मी फ्रेश होऊन झोपायला निघालो, पण बाई साहेबांचा मूड काही खास नव्हता. थोडा गमतीशीरपणा करून तिला गुदगुल्या केल्या, तर ती म्हणाली:

ती: गप झोपा आता. आले ना गिळून बाहेरून!
मी: अरे, तुला विचारूनच गेलो होतो ना...
ती: दुसरं कोणी असतं, तर बायकोसाठी काहीतरी आणलं असतं. माझंच नशीब फुटकं!
मी: अगं, तूच तर म्हणालीस ना की काही नका आणू...
ती: मी कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही आणायचं ना, निदान मंचुरियन तरी!
मी: अशी का गं दुतोंडी वागतेस?
ती: तुमचं प्रेमच राहिलं नाही!
मी: थांब, झोमॅटोवरून मंचुरियन मागवतो.
ती: अजिबात नको! आता सांगितल्यावर नका आव आणू काळजीचा!
मी: आता काय ? मागवतोय ना...
ती: मी जेवली की नाही, हे तरी विचारताल असं वाटलं. पण माणूस सरळ बिछान्यावर आडवं!
मी: मी पाहिलं की तू ताट धुतलेस, म्हणून समजलं तू जेवली असशील ते...
ती: तरीपण विचारायचं असतं ना! शी बाबा..खरंच, प्रेमच उरलेलं नाही!
मी (रागात): जा, नाही राहिलं प्रेम बीम ! काय करायचं ते कर!
ती (रागात): उद्या जेवणच नाही बनवत मी!
मी: ठीक आहे, मी उपाशी राहीन!
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे थोडा उशिरा उठलो, अंघोळ झाली आणि मोबाईल चाळत बसलो.
ती: काय बनवू जेवायला?
मी: काही नको. काल जे बोललीस त्यानंतर काहीच खायचं मन नाही.
ती: अहो, तुम्ही असाल स्वार्थी... पण मी नाही. मी बायको आहे, माझं कर्तव्य ठाऊक आहे मला!
मी: च्यामारी, परत सुरू झाली... झक मारली आणि पार्टीला गेलो! कुठून दुर्बुद्धी झाली आणि गेलो असं वाटतंय!

तुम्हीच सांगा चूक कोणाची होती ?