जखम काळजातली‌ भाग३

घराण्यांची अब्रू मुलांच्या प्रेमापेक्षा जास्त होते तेव्हा सुरू होतो संघर्ष
जखम काळजातली‌. भाग ३ 


" काव्याss" बाबांच्या आवाजाने काव्या दचकली, पटकन उठून ती गौरांगपासून दूर जाऊन उभी राहिली. तिला बघून गौरांग देखील उभा राहिला.

" ब.. बा... बाबा.. तुम्ही.. तुम्ही इ.. इथे का.. काय करताय?" बाबांना अचानक समोर बघून काव्याची बोबडीच वळली. तिच्या हातापायांना घाम फुटला. ती भीतीने थरथर कापू लागली होती. गौरांगने धीर देण्यासाठी तिचा हात पकडला. मात्र तिने तो लगेच झटकला. 

" मी इथे काय करतोय ते महत्वाचे नाही. तू हे सांग आधी मला, तू इथे काय करत आहेस? तुझं तर एक्स्ट्रा क्लास होता ना? हा आहे का तुझा एक्सट्रा क्लास?" बाबांच्या रागाचा पारा खूपच चढला होता.

" नाही बाबा. ते... ते.." काव्या आधीच घाबरली होती, त्यात तिला काहीच सुचत नव्हते. ती कधी बाबांकडे तर कधी गौरांगकडे पाहत होती.

" मला तुझं काहीच ऐकायचं नाही इथे. तू आधी माझ्या सोबत घरी चल." बाबांनी तिच्या हाताला पकडले आणि खेचत तिला घरी घेऊन निघाले. 

गौरांगने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताचा स्पर्श काव्याच्या हाताला झालाच नाही. हातातून काही तरी निसटून जात असल्याचा फील त्याला होऊ लागला. तो सुन्न मनाने, आणि भरल्या डोळ्यांनी तिला जाताना पाहत होता.

" सुजाताss सुजाताssss. " घरी आल्या आल्या काव्याला सोफ्यावर ढकलत बाबा आईला आवाज देत होते. 

" काय झालं? काव्याss" आई काव्याजवळ गेली. तिला आपल्या कुशीत घेऊन ती माऊली बाबांकडे प्रश्नमृद्रेने पाहत होती.

" काय होणार आहे? तुझं अजिबात लक्ष नाही तुझ्या पोरीकडे. ती कॉलेजला जाते की अजून काही दिवे लावायला ते देखील तुला बघायला होत नाही. बस! फक्त घरात बसून आराम करायचा आणि आयात गिळायचं एवढंच येत तुम्हाला. जरा पोरीकडे लक्ष द्यायला नको. कोण कुठल्या त्या पोरासोबत तोंड काळ करत होती ती. घराण्याची अब्रू पार वेशीवर टांगायला निघाली होती ही." बाबा काव्याच्या अंगावर धावून गेले. आईने त्यांना पकडून अडवले.

" मी बघते तीच्याकडे तुम्ही जा, फ्रेश व्हा. मी समजावते तिला, जा तुम्ही." आईने बाबांना आतल्या खोलीत ढकलून पाठवले. 

" आई, मी काहीच चुकीचं नाही केले. आम्ही असंच बसलो होतो. तो चांगला मुलगा आहे." काव्या आईला सांगत होती तेवढ्यात बाबा पुन्हा बाहेर आले.

" चांगली मुले असं एकट्या मुलीला घेऊन एकटेच कोपऱ्यात बसतात का? तू आम्हाला शिकवू नकोस, आम्ही काय लहान नाही आहोत आणि नाही मूर्ख आहोत. ते काही नाही. उद्या पासून तुझं कॉलेज बंद. बंद म्हणजे बंद. काही गरज नाही पुढे शिकायची. आता आईला मदत करत बस घरातल्या कामात. खूप झालं शिक्षण. याद राख बाहेर गेलीस तर." बाबा फर्मान ऐकवून निघून गेले. 

" आई, हि काय पद्धत आहे बाबांची? खरंच तो चांगला मुलगा आहे. माझं आणि त्याच काहीच नाही. तो मला अभ्यासात मदत करतो एवढंच आहे ते. आई, सांग ना तू बाबांना. मला शिकायचं आहे अजून. मी नाही कॉलेज बंद करू शकत. यावेळी चांगले मार्क्स पडले तर किती खुश होता तुम्ही. हे सगळं त्याच्यामुळेच झाले होते. त्याने माझा अभ्यास घेतला त्यामुळे. प्लिज आई, तू समजावं ना बाबांना." काव्या आईला विनवणी करू लागली.

" काव्या, कोण होता तो मुलगा?" आईने तिला विचारले.

" तो गौरांग आहे. गौरांग पटेल. पटेल बिल्डर त्यांचा मुलगा." काव्याने माहिती दिली.

" काव्या तुला समजत नाही की तुला आम्ही अडाणी वाटलो. तुझं आणि त्या मुलाचं काय चालू आहे हे न कळण्याइतपत आम्ही नक्कीच नासमज नाही आहोत. तुझ्या बाबांनी फक्त पाहिले म्हणून इतका तमाशा केला त्यांनी, जर त्यांना कळाले तुमच्या बद्दल, त्याच्या घरातील लोकांबद्दल, जातीबद्दल तर ते त्याला मारायला देखील कमी करणार नाहीत. तुला माहित आहे ना तुझे बाबा कसे आहेत ते. शहाणी असशील तर ते म्हणतात तसं कॉलेज बंद कर. पुढचं पुढे बघू. तुझ्या बाबांच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आलंय तुला, उगाच नको त्या भानगडीत अडकू नकोस." आईने तिला सौम्य शब्दात समजावले.  समजावले कसले डायरेक्ट धमकीच दिली. काव्या पुढे काही बोललीच नाही.

काव्या एकटीच तिच्या खोलीत बसली होती.

" शुssक शुssक काव्याss.." खिडकीतून आवाज आला तसं काव्याने तिथे पाहिले.

" तू? तू इथे काय करतोयस? गौरांग तू जा इथून बाबांनी पाहिले तर मारतील तुला ते. जा तू." काव्या घरात डोकावून गौरांगला जायला सांगत होती. गौरांगने तेवढ्यात तिचे जा म्हणणारे हात पकडले.

" काव्या, उद्या एकदा भेट फक्त. प्लिज." गौरांगच्या डोळ्यात पाणी होते. ते बघून काव्यालाही गहिवरले.

" हो येते. पण आता कोणी बघायच्या आधी तू जा इथून." गौरांग तिच्याकडे बघतच तिथून निघाला. तो दिसेनासा होईपर्यंत ती त्याच्याकडे पाहत होती.

दुसऱ्या दिवशी काव्या आईला सांगून कॉलेजमध्ये आली. आई पाठवतच नव्हती परंतु लिविंग सर्टिफिकेटसाठी एप्लिकेशन द्यावे लागेल ते देते आणि येते असं सांगून ती घरातून निघाली.

" गौरांग..." गौरांग दिसताच ती त्याच्या मिठीत शिरली.

" काव्या, बाबा काही म्हणाले का?" गौरांगने काळजीने विचारले. 

" हम्म.. ते म्हणाले कॉलेजला जायची काहीच गरज नाही. आता देखील मी लिविंग सर्टिफिकेट घेण्यासाठी एप्लिकेशन्स द्यायचं म्हणून आले इथे. सॉरी गौरांग, मला खरंच माफ कर. पण माझे बाबा नाही ऐकणार आपले काही. आपण इथेच थांबलेलं बरं. सॉरी." काव्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. गौरांगने काहीच प्रतिसाद नाही दिला. थोडा वेळ थांबून काव्या निघाली. गौरांगने तिला अडवले देखील नाही. 

" हे काव्या वेट." नागेशने काव्याला आवाज देऊन थांबवले.

" काय रे?" काव्या थांबली तसं नागेश तिला बाजूला घेऊन गेला.

" तू खरंच कॉलेजला येणार नाहीस आता?" नागेश धापा टाकत म्हणाला.

" हो रे. बाबांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे. त्यामुळे त्यांनी नको सांगितले कॉलेजला यायला." काव्या 

" ओह्ह! खरंच मुलगा पाहिला आहे की गौरांग पासून पिच्छा सोडवण्यासाठी तू असं सांगतेस." नागेश तिच्याकडे बारीक नजर करून पाहू लागला.

" काही काय नागेश? चांगला आहे रे गौरांग." काव्या गौरांगचा चेहरा आठवून गालात हसली.

" ओय! खरंच प्रेमात पडलीस की काय त्याच्या? आठवतंय ना. टाईमपासचे प्रेम म्हणून होतीस तू त्याच्यासोबत." नागेशने तिला आठवण करून दिली.

" हो बाबा. आठवतेय मला. आणि मी काही प्रेमात बिमात नाही पडली त्याच्या. हा, फक्त आवडतो तो मला, इतकंच. त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढणं अशक्य आहे माझ्यासाठी. एकवेळ तो आमच्या जातीचा नसता तर चालवलं असतं मी पण एका अपंग व्यक्तीसोबत संसार करणं नाही जमणार. माझ्या खूप अपेक्षा आहेत. मला मुलगा असा हवा जो आयुष्यात हवं ते मिळवू शकतो स्वतःच्या जीवावर. त्याच्या भरवश्यावर मी मस्त आरामात राहणार, असा मुलगा हवा मला माझा जोडीदार म्हणून, ना की त्याचच मला करावं लागणार. गौरांगला आयुष्यभर सांभाळण्यात मला अजिबात रस नाही. त्यात एक बरं त्याने काहीच हंगामा नाही केला. मी इथेच थांबू या म्हंटले तर काहीच बोलला नाही. थँक गॉड. त्याने ऐकलं माझं." काव्या नागेशला टाळी देऊन निघून गेली.

काव्याच्या मागे तिला थांबवायला आलेल्या गौरांगने मात्र काव्या आणि नागेशचे सगळं बोलणं ऐकलं. तो ते ऐकून हादरला.

क्रमश:


🎭 Series Post

View all