जखम काळजातली‌ भाग अंतिम

आपल्या नशिबात जे असते तेच आपल्याला मिळते
जखम काळजातली‌. भाग ४ अंतिम 

गौरांग आतून पूर्णतः तुटला होता. काव्याच्या मनात त्याच्या बद्दल असं काही असेल स्वप्नात देखील त्याला वाटले नव्हते. एकवेळ तिने कधी प्रपोज  केलं नसते तरी चालले असते परंतु आता त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या उरात सलत होता. काही क्षण हे सगळं खोटं असावे, आपला भास असावा अशी मनोमन देवाकडे त्याची प्रार्थना करून देखील झाली. परंतु आज देव देखील त्याला जागं करायलाच आतुर झाला असावा. ऋतू नसतानाही आज अचानक जोराचा पाऊस सुरु झाला, त्याचे अश्रू त्या पावसाच्या पाण्यात अदृश्य झाले, पण मनाचं काय? ते तर केव्हाच मृतावस्थेत पोहचले होते. डोकं काम करेनासे झाले. त्याच त्यालाच कळत नव्हते, काय करू काय नको. भासआभासच्या या खेळात त्याची विवेकबुद्धी मूर्च्छित पडली होती. चालताना त्याचा तोल जाऊ लागला. तो जमिनीवर पडणार त्याच्या आधीच नाजूक दोन हातांनी त्याला सावरले.

दहा वर्षानंतर....

" गौरांगss झालं का तुझं? माझी शॉपिंग झाली. तुला हवं ते घे आणि कॅफेमध्ये ये. आम्ही जातो पुढे." ती चेंजिंग रूमच्या बाहेरून बोलून निघून गेली.

त्याने त्याची राहिलेली शॉपिंग पूर्ण केली. बिल पेड केले आणि कॅफेच्या दिशेने तो निघाला. बॅग्स सांभाळत जाताना त्याचा धक्का एका महिलेला लागला. बॅग्स उचलत तो तिला सॉरी म्हणत उठला. समोर पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

" तू?" समोर काव्याला अचानक बघून तो थबकला. कॉलेजमध्ये टापटीप राहणारी, एखादी मॉडेल वाटावी असं व्यक्तिमत्व असेलेली काव्या आज एकदम काकूबाईसारखी दिसत होती. तिने नेसलेली साडी, वाकड्यातिकड्या झालेल्या निऱ्या, पदर कंबरेला खोचलेला, साडी सांभाळत चालताना तिच्या नाकीनऊ आले हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. दोन्ही हातात बॅग्स होत्या. शॉपिंगच्या नाही तर डी मार्टच्या. डिस्काउंटमध्ये भरलेल्या रेशनच्या पिशव्या होत्या त्या. तिला पाहून एक क्षण गौरांगला वाईट वाटले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्याला तिचे शब्द आठवले जे एवढी वर्ष होऊनही तो विसरला नव्हता. तो सरळ तिला इग्नोर करत निघून गेला. 

तिच्या डोळ्यात मात्र त्याला पाहून अश्रू दाटले होते. कॉलेजमधला गौरांग आणि आताच गौरांग यात खूप फरक होता. त्याकाळी तो स्मार्ट होता पण आता खूपच डॅशिंग दिसायला लागला होता. आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तो अपंग आहे हे कळून देखील येत नव्हते. त्याची स्टाईल, त्याचे व्यक्तिमत्व सगळंच पार बदलून गेले होते. इतक्या वर्षांनी पुन्हा तो भेटला याचा आनंद मानू की तो माझ्या नशिबात असताना मी त्याला लाथाडला याचे दुःख मानू हेच तिला समजत नव्हते. ती तशीच त्याच्या मागोमाग गेली. तो सरळ कॅफे एरियामध्ये आला. तिथे त्याची वाट बघत असणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर त्याला पाहून स्मितहास्य खुलले. त्याने पुढे जाऊन तिला स्वतःच्या बाहुपाशात घेतले. काव्याला त्या महिलेचा चेहरा त्याच्या पाठीमुळे दिसला नाही. ती मान थोडी लेफ्ट राईटला करत तिचा चेहरा दिसतोय का ते पाहत होती. मिठी मारून तो बाजूला झाला तसं तिचा चेहरा काव्याला दिसला. तो चेहरा बघून तिच्याच चेहऱ्यावरचा रंग उडाला. आपसूकच तिच्या तोंडून नाव निघाले. ती तशीच मॉलच्या वॉशरूममध्ये पळाली. तिथे जाऊन काव्या रडू लागली. 

अचानक तिच्या खांद्यावर हात येऊन विसावला. तिने रडतच मागे पाहिले.

" त..तू..?" तिला पाहून काव्याने लगेच डोळे पुसले. 

" हो मी. का, विश्वास नाही की ओळख राहिली नाही?" तिने विचारले.

" ओळख का नाही. पण तुला असं. इथे भेटणं तेही गौरांगसोबत अनपेक्षित होतं. बस." काव्याचा आवाज नरमला. 

" ते आलं लक्षात माझ्या. कसं अपेक्षित असेल तुला, तुला तर माहितच नव्हते तू गेल्यावर काय काय झालं ते? तू एकदाही मागे वळून नाही पाहिलेस जाताना. बघितले असतेस तर तुला कळालं असत, तुझं प्रेमाचं नाटक कोणाच्या तरी किती जीवावर बेतलं होतं. हो काव्या, तुझ्या प्रेमाच्या नाटकाचा खुलासा जेव्हा तू नागेश समोर करत होतीस ना तेव्हाच गौरांगने ते ऐकलं होतं. त्याच्यावर किती मोठा आघात झाला होता याची पुसटशी देखील कल्पना नव्हती तुला. किती खुश होता तो जेव्हा तू त्याला प्रपोज केलं होतं, परंतु, त्याहून जास्त दुखावला होता तो जेव्हा त्याला कळालं तू फक्त प्रेमाचं नाटक केलं होतं. तरी त्याने कायम तुझाच विचार केला. तुला कधीच दूषणे देत बसला नाही तो." ती बोलत होती काव्या मात्र खाली नजर करून तिचे ऐकत होती. 

त्या दिवशी काव्या निघून गेली. गौरांग कोलमडला. त्याला सावरायला दोन नाजूक हात मदतीला आले. अर्पिता, अर्पिता होती ती. काही महिन्यापूर्वी जिने त्याला इतक्या आनंदात पाहिले होते आज तीच त्याला या दुःखातून बाहेर काढायला सरसावली होती. तिच्या मैत्रीच्या मदतीने तो लवकर सावरला. काव्याच्या बोलण्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता. अर्पिताने त्याच्या मनात पुन्हा आशावाद निर्माण केला. आपल्यातील कमतरता लपवून आपले सामर्थ्य जगासमोर कसे आणायचे हे तिने त्याला शिकवले. तो देखील अर्पिता जे सांगायची ते करू लागला होता. 

" तुम्ही लग्न कधी केले?" काव्याच्या मनात घोळणारा प्रश्न अखेर तिने विचारलाच.

" काव्या अजून पण तू स्वार्थी सारखीच वागतेस. तू अजूनही गौरांग कसा यातून बाहेर आला? तो कसा आहे? हे नाही विचारलंस. तुला फक्त हेच जाणून घ्यायचे आहे ना की आम्ही तू असताना एकमेकांना डेट करत होतो का? आणि मी आता त्याच्या सोबत खरंच खुश आहे की तू त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता तो योग्य होता? हेच मुळात तुला जाणून घ्यायचं आहे ना, हो ना? काव्या, तू त्याला सोडून खूप मोठी चूक केलीस, हो चूकच केलीस तू. त्याच्यासारखा जोडीदार तुला कधी भेटलाच नसता. आता हेच बघ ना. तू तुझ्या जातीत, तुझ्या बाबांच्या पसंतीने, एका श्रीमंत मुलासोबत लग्न केलेस. अगदी राजबिंडा दिसणारा, धडधाकड असणाऱ्या मुलासोबत लग्न करून तू खुश आहेस का? आम्हाला सगळं माहित आहे काव्या. तुझा नवरा तुला किती त्रास देतो, तुला कसं नेहमी बंधनात ठेवतो. एकेकाळी मॉडेल सारखी राहणारी तू, तुझी अवस्था बघ त्याने त्याच्या अहंकारापायी काय करून ठेवली ती. तू नाटक केलेस पण गौरांगने तुझ्यावर खरं प्रेम केले. आजही करतो तो तुझ्यावर खूप प्रेम. म्हणून तर तुला एकही शब्द वाकडा बोलला नाही. तुला असं पाहून तो माझ्या गळ्यात पडून रडला आता. इतकेच काय, आमच्या मुलीचे नाव देखील काव्याचं ठेवले आहे त्याने. तुझ्या वाटणीचे प्रेम तो तिला देतो. काव्या तुला खरं प्रेम कधी कळलंच नाही. कळालं असते तर तुला गौरांगचे अपंगत्व दिसले नसते. दिसले असते ते त्याचे प्रेम, त्याची माया जो तो तुझ्यावर जीवापाड करत होता. चल जाऊ दे. जे झालं ते झालं. एक मैत्रीण म्हणून तू अजूनही आमच्या आयुष्याचा भाग आहेस. जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा आवर्जून हाक मार." अर्पिताने तिला मिठी मारली. तिच्या हातात घरचा पत्ता आणि फोन नंबर देत अर्पिताने तिचा निरोप घेतला.

खरंच आपण इतके स्वार्थी झालो होतो का की गौरांगचे प्रेम कळत, असून दिसत असून आपण ते झिडकारले. चार दिवसाच्या टाईमपाससाठी केलेले प्रेम पवित्र होते आणि ज्याला आयुष्यच जोडीदार निवडला त्यानेच माझ्या आयुष्याचा टाईमपास करून ठेवला. स्वतःच्या नशिबाला दोष देत काव्या तिच्या वाटेने निघून गेली.

समाप्त.


🎭 Series Post

View all