Login

झाले मोकळे आकाश

कुमुद चे यजमान जाऊन बराच काळ लोटला होता.
झाले मोकळे आकाश

सुधा दार बंद करून बाहेर निघाली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते.
मे महिन्याची ती संध्याकाळ, दिवसभराच्या उकाड्या पासून सुटका, म्हणून बरेच लोकं फिरायला बाहेर निघत.
सुधाताई सुद्धा जवळच असलेल्या बागेमध्ये फिरायला जात.
तिथे अनेक मुले खेळायला येत काही समवयस्क जोडपीही भेटत.
आज त्यांना बागेत येऊन बराच वेळ झाला, पण कुमुद चा अजून पत्ता नव्हता .
कुमुद त्यांची समवयस्क मैत्रीण. दोघी संध्याकाळी बागेत येत फिरत गप्पा मारत आणि अंधार पडायला लागला की आपापल्या घरी परतत.
दोन चक्कर त्यांनी बागेतल्या वॉकवे वर लावल्या, तेवढ्यात कुमुद लगबगीने येताना दिसली तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता.
दोघी जवळच असलेल्या बेंचवर विसावल्या .
"आज इतका उशीर"!
"ते जाऊ दे ग" म्हणत कुमुद ने पर्समधून डबा काढला त्यातून केक चा एक पीस सुधाला भरवला.
केक खात खात सुधा ने विचारले "काय ग ---काही गोड बातमी वाटतं शिल्पा कडून"!
"नाही ग तसं नाही"...
मग?
"अगं, आज माझा वाढदिवस आहे ना म्हणून राहुल, माझ्या लेकाने माझ्यासाठी हा- मोठा केक आणला. त्यावर आयसिंग ने हॅप्पी बर्थडे लिहिल होतं. सोबत सुंदरसं ग्रीटिंग पण होतं. त्यावर,
"जिचे अवघं विश्व माझ्या भोवती फिरतं त्या माझ्या आईसाठी वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. "काय सांगू तुला सुधा मला इतका... इतका आनंद झाला म्हणून,.... माझा राहुल ,त्याचे माझ्यावर किsती प्रेम आहे हे त्यांनी दाखवून दिले त्याच्या मनात माझी अशी एक खास जागा आहे तिथे फक्त मीच आहे आणि ती जागा कोणीही घेऊ शकत नाही." ‌
"..आणि शिल्पा??"
"शिल्पा सुद्धा तिथेच होती, मी तिला म्हंटले ही कि आपण दोघी मिळून केक कापू...."
" मग'??"
ती म्हणाली ...".नाही, आई हा स्पेशल दिवसाचा स्पेशल केक फक्त तुमच्यासाठी आहे, "
कुमुद च्या आनंदात सहभागी होत सुधाने तिला प्रेमाने घट्ट मिठी मारली.

घरी परतताना सुधा चे ही मन प्रसन्न होते.
सुधा चे यजमान दोन वर्षापूर्वीच गेले. दोन मुली, त्यांची लग्नही पूर्वीच झालेली. एक मुलगी इथेच गावात आहे अधुन मधुन येते.
नाहीतर फोनवर बोलणे होते. सुधा इथे एकटीच राहते.
कुमुद चे मिस्टर जाऊन बराच काळ लोटला. राहुल तीन वर्षाचा असताना अपघातात ते गेले. कुमुद तिच्या मुला बरोबरच राहते. नुकतेच तिच्या मुलाचे लग्न झाले आहे बराच काळ तिने एकटेपणात घालवला तिचे सर्व जग राहुल भोवतीच फिरत असते. मिस्टर लवकर गेल्याने मुलासाठी तिने खूप कष्ट केले .
नुकतीच रिटायर झाली त्यामुळे तीही फिरायला येत असे आणि तेव्हा तिची सुधाबरोबर मैत्री झाली.

नवरा गेल्यानंतर च आयुष्य किती कठीण असतंहे सुधाने अनुभवले आहे. पण कुमुद चे मिस्टर तिच्या तरुणपणातच गेले त्यामुळे तिच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, मुला भोवतीच आहेत हे जाणवत होते.

सुधाला आठवले दोन महिने आधी जेव्हा "व्हॅलेंटाईन डे" होता सगळीकडे व्हॅलेंटाईन डे ची धूम चालली होती.सुधा व कुमुद दोघीजणी अशाच बागेमध्ये बसल्या होत्या. कुमुद चा चेहरा उदास दिसत होता.
"कां ग-- काय झाले आज?" सुधाने विचारले?
कुमुद म्हणाली "राहुल दोन दिवसापासून बाहेर गावी गेला आहे, त्याच्या कंपनीच्या कामासाठी.आज सकाळी सकाळी कुरियर वाला आला, लाल गुलाबांचा सुंदर बुके शिल्पाला देऊन गेला,.... राहुल ने तिच्या साठी पाठवला म्हणाली."
बुके पाहून शिल्पाचा चेहराही गुलाबा प्रमाणे टवटवीत दिसत होता .
"खर सांगू मला ही राहुलच शिल्पा वरचे प्रेम पाहून खूप खूप आनंद झाला होता. पण--- थोड्या वेळाने का कोण जाणे असे वाटले , कि एक फूल माझ्या नावाने ही कां नाही पाठवले राहुन ने! प्रेम तर तो माझ्या वर ही करतोच न."
येवढं बोलुन कुमुद ने आपला चेहरा दुसरी कडे वळवला.
कुमुद च्या ह्या दुःखा मागचे कारण सुधाला समजत होते. नवरा लवकर गेल्याने तिने हे सुख कधीच उपभोगले नव्हते त्यामुळे तिच्या साऱ्या भावना मुलाभोवती एकवटल्या होत्या पण -- यावर काहीच उपाय नव्हता.
काहीतरी कमतरता तर आयुष्यात राहतेच.
पण-- --आजच्या घटनेने तिला जाणीव झाली की प्रत्येक माणसाची दुसऱ्याच्या जीवनात एक विशेष जागा, एक स्थान असते ,आईची जागा वेगळी, तर बायकोचे स्थान वेगळे.
आपण दुसऱ्या ची जागा घेण्याचा प्रयत्न करू नये त्यातच घराची सुख शांती अवलंबून असते. मनातिल किल्मिश दूर होताच ती सुखावली.
तिचे मन आकाश मोकळे झाले....
----------------------------------------
लेखिका--- सौ. प्रतिभा परांजपे