शून्य भाग 1

गोष्ट किंमतीची

शून्य

"अहो, काय करताय हे? सोडा..माझा हात खूप दुखतोय." मंजिरी ओरडत म्हणाली. तसा अजितला आणखीनच चेव चढला.
"जरा स्वतःकडे बघ. कशी राहतेस, कशी दिसतेस? एका मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या माणसाची बायको आहेस तू. वारंवार याचा विसर पडतो की काय?" त्याने तिचा हात जोरात पिरगाळला.

"अ..अहो, दुखतयं." मंजिरी हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिचा आवाज ऐकून इकडे बेडरूमच्या दरवाजाला कान लावून उभ्या असलेल्या सुलक्षणा ताई ओरडू लागल्या, "अजित, मारू नको रे तिला. सोड, तुझी बायको आहे ती." बेडवर, खाली, जिकडे - तिकडे बांगड्यांच्या तुकड्यांचा खच पडला होता. नव्या बांगड्या भरून आलेली मंजिरी अतीव दुःखाने त्या फुटलेल्या तुकड्यांकडे पाहत होती. गर्द हिरव्या रंगाच्या या बांगड्या तिला आईने आग्रहाने भरायला लावल्या होत्या.

तिला आपल्या नवऱ्याचा खूप अभिमान होता. पण इतरांपेक्षा स्वतःला सुखी समजणारी मंजिरी हल्ली उदास राहू लागली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळ, चेहऱ्यावरचे दुःखी भाव, कृश झालेली देहयष्टी काहीतरी चुकत असल्याचं सांगत होती.

नोकरीच्या ठिकाणी अजित जशा वरच्या पायऱ्या चढत गेला तसा त्याचा अहंकार वाढत गेला. आपले आई -वडील, बायको , मुलं यांना आपल्यापेक्षा कमी अक्कल आहे असं त्याला वाटायला लागलं. त्यातच आई कमी शिकलेली! बाबा आयुष्यभर एकाच नोकरीत आणि त्याच पदावर चिकटलेले. अगदी झापड लावल्यासारखं जीवन होतं त्यांचं. इतर कशाचा विचार न करता आपल्याला जे जमतं ते एकच काम करायचं. बाकी आपल्या क्षमता, योग्यता, तपासून पाहायच्या नाहीत की नव्या संधीचा शोध किंवा लाभही घ्यायचा नाही.

नंतर बायको आली, तीही आईच्या पसंतीची. जेमतेम पदवीधर असलेली. उच्चशिक्षित मुलींच्या अटी भयंकर असल्याने मुलगी आवडूनही अजितला अनेक वेळा नकार द्यावा लागला. मनात नसताना त्याने मंजिरीला होकार दिला. आईच्या मते, बायकोला नोकरी करता आली नाही तरी चालेल. पण घर सांभाळता यायला हवं. चार माणसांचं मनापासून करता यायला हवं. यानुसार मंजिरीने घराचा कारभार हाती घेतला. सासू - सासऱ्यांना आई - वडील मानलं. ताई तिला जमेल तशी मदत करत होत्या आणि आप्पाही समाधानी होते. एका गृहिणीला आणखी काय हवं?

मंजिरी घरात आली आणि अजित एक एक करून यशाच्या पायऱ्या चढून वर जाऊ लागला. आईने याचं श्रेय आपल्या सुनेला दिलं. आपल्या निवडीवर खुश होऊन ती सुनेचं कौतुक करण्यात गर्क झाली. मिळणाऱ्या यशाबरोबरच हळूहळू आपण अहंकाराच्या पायऱ्या चढत आहोत हे अजितच्या लक्षात येत नव्हतं. तशीच इतरांना कमी लेखण्याची त्याची मनस्थिती होत होती.

"अजित, दार उघड." सुलक्षणा ताई जोरात ओरडल्या. तशी मंजिरीने आपली कशीबशी सुटका करून घेत पट्कन दार उघडलं. घाबरून ती त्यांना बिलगली. तिच्या डोळ्यांतून पाणी अखंड वाहत होतं. "काय चाललंय हे? किती वेळा समजावलं? घरच्या स्त्रीचा अपमान करू नये, तिला मारझोड करू नये. इतकं शिकून देखील काय उपयोग त्याचा? अजित, मुलं घाबरून खोलीत बसलीत. नशिबाने पदरात दोन मुलंच आहेत. उद्या त्यांच्या बायका घरात येतील. त्यांनाही अशीच वागणूक मिळेल. त्यांच्यावर हेच संस्कार करणार का?"

"संस्कार! आई, हिच्यावर कसले संस्कार आहेत गं? राहते कशी, वागते कशी? एखाद्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडे नेण्याची सुद्धा लायकी नाही हिची. मग माझ्या सक्सेसच्या पार्ट्या तर दूरच राहिल्या. आता मुलांवर तरी काय संस्कार होणार मग? तीही आयुष्यभर अशी गबाळीच राहणार."

"तोंड सांभाळून बोल अजित. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी दोघांची असते, एकट्या आईची नाही. इथून पुढे जर माझ्या सुनेची लायकी काढलीस तर मीही विसरून जाईन, तू माझा मुलगा आहेस ते." सुलक्षणा ताईंनी उगारलेला हात मागे घेतला. रागाने थरथरत त्या मागे सरल्या.

"मार ना..का थांबलीस? तिकडे दरवाज्याला कान लावून उभे असलेले शेजारी सगळं ऐकत असतील. म्हणतील, मुलगा मोठा झाला, शिकला - सवरला तरी आई अजूनही त्याच्यावर हात उचलते. अगं, तुम्हाला आता माझ्याकडे पैसे मागावे लागतात. मी घरचा खर्च उचलतो. यासाठी आप्पांची पेन्शन कामी येत नाही म्हंटलं." अजित कुत्सितपणे हसत म्हणाला.

इतक्यात मुले आत आली. "आई, काय झालं? अशी का दिसतेस? आणि या बांगड्या कशा फुटल्या? बाबा, तुम्ही आईला काय केलं?" मोठा मुलगा म्हणाला.
मंजिरीचा अवतार पार विस्कटून गेला होता. वेणीतून केस सुटून बाहेर आले होते. साडीचा पदर खांद्यावरून लोंबत होता. फुटलेल्या बांगड्यांमुळे हाताला जखमा झाल्या होत्या, खरचटलं होतं. डोळे लाल झाले होते. ओठ कोरडे पडले होते. मुले आपल्या आई -बाबांकडे आळीपाळीने बघत उभी होती. एकदम ती आपल्या आईला बिलगली. "बोल ना काहीतरी..आम्हाला भीती वाटते."

"आमच्या खोलीत चला तुम्ही. इथं थांबायची काही एक गरज नाही." सुलक्षणा ताई तिघांना घेऊन आपल्या खोलीत आल्या. "तू प्रतिकार केला नाहीस तर त्याचं आणखी फावेल. का सहन करतेस सगळं?" ताई मंजिरीच्या हाताला मलम लावून देऊ लागल्या. मुलं मात्र भेदरून आई आणि आजीकडे पाहत होती.

इतक्यात त्यांचे आजोबा आले आणि त्यांना बाहेर घेऊन गेले. तसे आजूबाजूला जमलेले शेजारी आपापल्या घरात निघून गेले. "नक्की काय चालतं याच्या घरात? हल्ली रोजचंच झालंय हे. म्हणतात, हा अजित बायकोला रोज मारतो म्हणे!"

"का?"

"अगं, मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला घरीही तसाच मान द्यावा लागतो. समाजात त्याच स्टेट्सने वागावं लागतं. चारचौघांत मॅनर्स पाळावे लागतात. असं वागून चालत नाही.

"असं म्हणजे?"

"बघ, आता आपल्याकडे ही सगळी सुखं हात जोडून उभी असती तर आपण कसे वागलो असतो? छान, व्यवस्थित, महागडे कपडे वापरले असते. शेजारी -पाजारी सारखं येणं - जाणं ठेवलं असतं, मिरवलं असतं. आपल्या बरोबरच्या माणसांत जास्त करून मिसळलो असतो की नाही?" शेजारी राहणाऱ्या दोन बायकांचं बोलणं ऐकून आप्पांना दुःख झालं.