शून्य भाग 2

गोष्ट किंमतीची
"आई, प्रतिकार म्हणजे नक्की काय करू मी?" मंजिरीच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. ती उत्तरासाठी सुलक्षणा ताईंकडे पाहत राहिली. पण तिला नेमकं काय उत्तर द्यावं हे ताईंना कळेना.

"प्रतिकार म्हणजे तू बोल, स्वतःची बाजू मांड. प्रसंगी भांड. पण गप्प राहू नको. आम्ही आज आहोत तर उद्या नाही, किती दिवस तुझी बाजू घेणार? आमचा काय भरवसा?" ताई म्हणाल्या.

"हे मी करत नाही? आई, आधी हे केवळ भांडायचे. आता मारहाण करतात. मग मीही तसंच केलं तर चालेल?" मंजिरी.
यावर ताईंना काय उत्तर द्यावं कळेना. त्या गप्प झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"मुलाने सुनेला मारहाण केली तर चालते. पण सुनेने आपली पायरी सोडायची नाही. बरोबर ना? नवरा मारतो म्हणून रडत बसायचं. नुसतं दुःख उगाळत बसायचं. पण सुशिक्षित असणाऱ्या नवऱ्यावर बायकोने हात उगारायचा नाही. कारण वर्षानुवर्षे बायका हे सहन करत आल्या आहेत. सासरी राहायचं म्हणजे आपलं मन मारून, सगळ्या आवडी -निवडी बाजूला ठेऊन जगत राहायचं. कोणी बोललं तर दुर्लक्ष करायचं आणि आपण कोणाला बोललो तर मात्र सून चांगली नाही असा शिक्का आयुष्यभर सोबत घेऊन फिरायचा." मंजिरी.

"आम्ही तुला काही बोलतो का? तुझी बाजू घेतो ना? आज तर मी माझ्या मुलावर हात उगारला. ते पाहिलंस ना?" ताई तोंडावर पदर घेऊन रडू लागल्या. "मुलगा सुनेला मारतो. मग सुनेने प्रतिकार म्हणून त्याला मारहाण करावी. मग त्याच्यात आणि तुझ्यात काय फरक उरला? चांगलं सुशिक्षित कुटुंब आपलं..आम्ही इतकी वर्षे गरिबीत काढली. मुलगा चांगला शिकला, नोकरीला लागला. वाटलं आता चांगले, सुखाचे दिवस येतील. पण काय होऊन बसलं हे!"

"आई, मग रडता का? खरंतर असं दुःख तुमच्या मुलाला वाटायला हवं. आपण बायकोवर हात उचलतो याचा पश्चाताप व्हायला हवा. पण इथं सगळं वेगळंच आहे. नुसता पैसा, पद घेऊन काय करायचं? त्यासाठी माणुसकी अंगी असावी लागते." मंजिरी मोकळेपणाने बोलत होती.
ताईंना ते पटत होतं. पण त्या फार काही बोलत नव्हत्या. पैसा, पद, प्रतिष्ठा यामुळे आपला मुलगा बदलत चालला आहे, याची त्यांना जाणीव होती. सुनेला होणारी मारहाण सहन होत नव्हती आणि तिच्या माहेरी सांगायचं म्हटलं तर लग्नाची अजून एक बहिण होती. तिचं लग्नं कसं व्हायचं? म्हणून मंजिरीच्या माहेरी काही सांगायची सोय नव्हती.

"वा! कित्ती छान बोलते माझी बायको. तितकीच छान वागली असतीस तर फार बरं झालं असतं. अगं, कमावणाऱ्याला अक्कल असते. घरकाम कोणीही करु शकतं. आईने तेच केलं इतकी वर्षे. आता घरात सुख आलंय तर काही ना काही कारण काढून नुसतं रडत बसायचं. नवरा हात उचलतो म्हणून तक्रारी करायच्या..त्यापेक्षा माझ्या पदाला शोभेल असं आपलं वागणं, बोलणं, स्टेट्स सुधारण्याचा प्रयत्न करा. चल, आपल्या खोलीत. मी वाट बघतोय." अजित मोठ्याने ओरडून म्हणाला. तसं सुलक्षणा ताईंनी तोंड फिरवलं.

हे ऐकून मंजिरीच्या अंगावर काटा आला. एक वेळ मारहाण बरी. पण रात्रीचा अधिकार नको. ती तिथेच बसून राहिली. बऱ्याच वेळाने मुलं आत आली आणि आजी शेजारी झोपून गेली. तेवढ्या वेळेत अजित चार वेळा येऊन गेला. पण काहीही झालं तरी आज खोलीत जायचं नाही असं ठरवून मंजिरी तिथेच झोपली.
अजित खोलीत येरझाऱ्या घालत होता. 'मला नकार ऐकायची सवय नाही. ऑफिसमध्ये एकूण एक लोकं मला मान देतात. माझा शब्द अन् शब्द झेलतात आणि घरात मात्र काडीची किंमत नाही आपल्याला.'
तो आई -बाबांच्या खोलीत आला. मंजिरीला झोपलेलं पाहून पुन्हा त्याचा राग अनावर झाला. त्याने तिचा हात धरून खेचायचा प्रयत्न केला. इतक्यात आप्पा आत आले.
"अजित, काय चाललंय?" ते थंड स्वरात म्हणाले.

"आप्पा, माझी बायको आहे ती. मी काहीही करेन." मंजिरी भेदरून मागे सरकली. मुलेही उठून बसली.

"दिवसेंदिवस तुझं वागणं बेताल होत चाललंय. बाहेर लोक तुला बोलत नाहीत तर आम्हाला बोलत आहेत. आता बस् झालं. तू तुझ्या खोलीत जा." आप्पा दरडावत म्हणाले.

"बाहेर तुमचं काय स्टेट्स आहे आप्पा? इतकी वर्षे तुम्ही फक्त खर्डेघाशी केली. ज्या खुर्चीवर बसलात तिथेच चिकटून राहिलात. मी कमी वयात तुमच्यापेक्षा जास्त कमावतो आता. मग लोक बोलणारच."

"हीच हवा तुझ्या डोक्यात गेलीय अजित. तुझ्याकडे फक्त पद अन् पैसा आहे. ते काढून घेतलं तर तू शून्य आहेस. वेळीच सावध हो. आपल्या माणसांना धरून रहा. त्यांची किंमत ठेव." आप्पा.
बाप -लेकाचं बोलणं ऐकून सुलक्षणा ताई रडू लागल्या. मुलं पुन्हा आईला बिलगून बसली.

"हे तुम्ही मला शिकवू नका. जे शिकवायचं ते सुनेला शिकवा." अजित पुढे होत म्हणाला.

"निघ. माझ्या परवानगीशिवाय अजिबात या खोलीत पाऊल टाकायचं नाही." अजित तरातरा निघून गेला.
"आणि तुम्ही का रडताय? अशाच रडत राहिलात तर सुनेकडे, नातवंडांकडे कोण बघणार? त्यांच्या पाठीशी उभ्या रहा. मुलगा चुकतोय, वेळीच त्याचा कान पकडा."

आप्पा बाहेर गेले. मंजिरी मुलांना जवळ घेऊन झोपली. पण रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. 'माझ्यात काय कमी आहे? रूपाने तशी उजवी आहे, घरकामात कमी पडत नाही. शिक्षणही चांगलं आहे. मनात आणलं तर या शिक्षणावर नोकरी सुद्धा मिळेल. खरंच नोकरी करायची का? की लग्नाआधी घेत होते तसे क्लासेस घ्यायचे? आप्पा आणि आईंना याबाबतीत उद्या विचारायचं आणि ते नको म्हणाले तर?' मंजिरी रात्रभर विचार करत राहिली.

घड्याळात सहाचा ठोका पडला तशी ती उठून आवरून कामाला लागली. हळूहळू अजितचा, मुलांचा डब्बा, आई - आप्पांचा नाष्टा.. केर -वारे, भांडी सगळं यांत्रिकपणे पार पडलं. मुलं शाळेला गेली तर अजित डब्बा न घेताच ऑफिसला गेला. तिने कालचं सगळं विसरून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता. पण अजितने तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.

मंजिरीला वाईट वाटलं. 'सगळं सहन करून आपल्याला काहीच किंमत नाही? स्त्री म्हणजे फक्त उपभोग घ्यायची वस्तू आहे की अधिकार गाजविण्याकरता आणलेला गडी? बस् झालं. आता अजिबात सहन करायचं नाही. स्वतः साठी उभं राहायचं.

"आप्पा, एक बोलू? मी लग्नाआधी घ्यायचे तसे चित्रकलेचे क्लासेस घेतले तर चालतील?" ती आत आली.

आप्पा वर्तमानपत्र बाजूला ठेवत डोळे मिटून काही क्षण शांत बसले. "तुमचं तेच शिक्षण झालंय ना? मग नोकरी केली तरी चालेल. आता मुलं मोठी झाली आहेत. तेवढाच वेळ जाईल नि हातात चार पैसे येतील. माझे शाळेतले काही स्नेही आहेत त्यांच्याशी हवं तर मी बोलेन." आप्पांनी होकार दिला म्हणजे सुलक्षणा ताईंनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

पुढच्या काही दिवसांत आप्पांनी फील्डिंग लावली आणि मंजिरीला नोकरी मिळाली. ताई मदतीला होत्या तरी पहिले काही दिवस धावपळीत गेले. अजित मंजिरीची चेष्टा करायची एक संधी सोडत नव्हता. "अधिकाऱ्याची बायको, एक शिक्षिका? हे शोभत नाही." पण तिने त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. मुलांसोबत ठीक अकरा वाजता ती घरातून बाहेर पडायची आणि साडे पाचच्या ठोक्याला घरी यायची. दिवसातले बरेच तास घरातून बाहेर असल्यामुळे नसते विचार मनात येत नव्हते. शाळेत तिच्या वयाच्या तसंच मोठ्या शिक्षिका होत्या. लहान विद्यार्थी होते. शिवाय आवडीचे काम असल्याने त्यात तिचा वेळ छान जाई.

शेजारी -पाजारी आता मंजिरीला मान देऊ लागले. नवऱ्याचा अन्याय सहन करून ही कामावर जाते म्हणू लागले. या नोकरीमुळे हळूहळू तिच्यात बदल घडून येऊ लागला. नव्या मैत्रिणी, संगत, लहान मुलांत रमून गेलेली, स्वतःकडे लक्ष न देणारी मंजिरी आता नीटनेटकी राहत होती. स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिकत होती. कायम कमीपणा घेणारा तिचा स्वभाव खुलून येत होता तर एका पुरुषाला समाजात जितकी किंमत असते तशीच स्त्रीलाही तितकीच किंमत असते, हे तिच्या लक्षात येत होतं.

मंजिरीने आनंदाने पहिला पगार ताईंच्या हातात दिला.
"आई, तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं."
हे पाहून अजित म्हणाला, "असंही या पगारात काय येणार? मला माझे सहकारी चिडवतात. म्हणतात, तुमच्या पदाला तुमची बायको शोभत नाही. हसतात ते माझ्यावर. माणसानं नेहमी मोठी स्वप्नं पाहावी. अशी लहान -सहान कामं करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ नये." मंजिरी नोकरीला लागल्यापासून अजितचा ताठा थोडा कमी झाला होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all