शून्य भाग 3 अंतिम

गोष्ट किंमतीची

"अगं, कानावर आल्या त्या गोष्टी खऱ्या म्हणायच्या की खोट्या?" मंजिरीचे तात्या आपल्या बायकोला विचारत होते. "अजितराव मंजिरीचा छळ करतात? अगदी मारहाणही करतात म्हणे. ते शाळेतले मास्तर म्हणत होते. यामुळे तिची तब्येत खराब झाली होती, आत्मविश्वासही कमी झाला म्हणे." ते कानाजवळ येत म्हणाले.

"अहो, काय बोलता हे? ते असं का करतील? सुशिक्षित आहेत आपले जावई. शिवाय मंजिरीचे सासू - सासरेही चांगले आहेत आणि ती आपल्याला कधी काही बोलली नाही. पण सारं काही ठीक असेल. तुम्ही काळजी करू नका." आई.

"ती कशी बोलेल? आपल्या मनस्वीचं लग्न नुकतचं ठरतयं. तिची तर काळजी असेल ना मंजिरीला? हे लग्न पार पडलं की मी स्वतः बोलेन तिच्याशी." तात्या कामासाठी बाहेर निघून गेले खरे. पण त्यांचं मन चलबिचल झालं होतं.
'हे खरं असेल तर?' तिच्या आईचा जीव कासावीस झाला. ताई आणि आप्पा आपल्या लेकीला सांभाळून घेत असतील की तेही असंच..' सुलभा बाईंनी पट्कन आपल्या लेकीला फोन लावला. तिच्याकडून काही अंदाज घेण्याचा प्रयत्नही केला. पण मंजिरीने आईला काहीही सांगितलं नाही. तरीही आई म्हणून त्यांच्या मनातून लेकीची वाटणारी काळजी कमी होणार नव्हती.

मनस्वीचं लग्न ठरल्याच्या बातमीने मंजिरीला आनंद झाला. जवळचा मुहूर्त ठरल्याने मदतीसाठी माहेरी जावं लागणार होतं. सुट्टीसाठी अर्ज लिहावा लागणार होता. घरी येऊन तिने सुलक्षणा ताईंच्या कानावर ही बातमी घातली. त्यांनाही आनंद झाला.
"तू तिथे गेलीस तर इथे कोण पाहणार? आमचे डब्बे, मुलांच्या शाळा, आई - आप्पांकडे कोण बघणार?" अजित मध्येच म्हणाला.

"तू इथली काळजी नको करू. मी बघते सगळं. लग्नाचे दिवस परतून येत नसतात. आपण जितकी मदत करू तितकी कमीच पडते. एकुलत्या एका बहिणींचं लग्न आहे, तू निश्चिंत मनाने जा." ताई मंजिरीला म्हणाल्या.

काहीही असलं तरी अजित खुश होता. मोठा जावई म्हणून आपल्याला भरगच्च मानपान मिळणार, निदान अंगठी किंवा सोन्याची चेन तरी मिळेल अशी त्याला खात्री होती. हल्ली ऑफिसमध्ये त्याच्या दबदबा वाढत असल्याने त्याचा स्वभाव उर्मट, उद्धट, बेफिकीर बनत होता. इतरांना कमी लेखण्याची त्याची वृत्ती सहकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत होती. बाबांच्या अशा वागण्याने मुलंही त्याच्यापासून दूर राहणं पसंत करत होती.

पण लवकरच अजितचा आनंद हिरावून घेतला गेला. एक दिवस घोटाळ्याच्या आरोपाखाली त्याला ऑफिसमधून सक्तीची रजा घ्यावी लागली. आत्मसन्मानाला ठेच लागल्यावर अजितचा मूळ स्वभाव उफाळून वर आला. यासाठी तो मंजिरी, आई - आप्पांना दोष देऊ लागला. कधी मुलांना जबाबदार ठरवू लागला. मंजिरी नोकरी करते म्हणून तिच्याकडे पैसे मागू लागला. हिला माझं स्टेट्स पाहावलं नाही, त्यामुळे नोकरी गेली असा आरोप मंजिरीवर करू लागला.

पण मंजिरी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. नोकरीमुळे थोडा आत्मविश्वास तिच्यात आला होता. घरातून बाहेर पडल्यामुळे इतरांची सुख दुःख समजली होती. मन खंबीर बनलं होतं. हातात चार पैसे येत असल्याने ती बरेचसे निर्णय स्वतः घेऊ शकत होती. त्यातच अजित व्यसनांच्या नादी लागला. मंजिरी -आप्पांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण केवळ स्वतः वर विश्वास असलेला अजित इतरांना दोष देण्यात मग्न होता. 'विनाशकाले विपरीत बुद्धी!' असं म्हणत आप्पांनी अखेर दुर्लक्ष केलं.

सुट्टी मिळाल्यावर मंजिरी माहेरी गेली. मुलं सुट्टीच्या दिवशी येत आणि शाळेच्या दिवशी आप्पा त्यांना पुन्हा घेऊन जात. तात्या आपल्या लेकीवर न कळत लक्ष ठेऊन होते. तिची अवस्था फारशी बरी नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. खरेदी, फराळ, सजावट सगळं पार पडलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. सगळी धावपळ सुरू होती. त्यातही अजित मंजिरीला सतत फोन करून पैसे मागत होता. काही रक्कम ऑफिसमध्ये भरली तर त्याची नोकरी परत मिळणार होती.

लग्न पार पडलं आणि मंजिरीची धावपळीतून सुटका झाली. ऐन लग्नाच्या दिवशी हजर झालेला अजित मात्र मानपान न मिळाल्याने सगळंच आपल्या मनाविरुद्ध घडतंय म्हणून खवळला.
"मंजिरी, तात्यांकडून ही अपेक्षा नव्हती. या लग्नात माझा मान ठेवला गेला नाही. एखादा सोन्याचा दागिना द्यायला काय धाड भरली होती तुझ्या बापाला? त्यामुळे माझी नोकरी तरी वाचली असती.." अजित तिचा हात पकडत म्हणाला.

"अजित, सोड तिला." आप्पा गरजले.

"अजित, सोडा..हे तुमचं घर नाहीय. माझं माहेर आहे. जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा." मंजिरी.

"अगं, हा विचार तुझ्या बापाने करायला हवा.."

"तोंड सांभाळून बोला अजितराव. तुम्ही आमच्या लेकीला मान दिला असता तर आम्ही जावई म्हणून तुमचा मान निश्चित ठेवला असता. पण जिथं आमची लेक सुखी नाही तिथल्या लोकांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? आप्पा , बरोबर आहे ना?" तात्या खुर्चीचा आधार घेत म्हणाले.
"इतके दिवस कानावर येत होतं. आज प्रत्यक्षात पाहिलं. आप्पा, अशा वेळी लेकाला नुसतं समजावून काय फायदा? योग्य ती कारवाई करायला नको का? अन् ताई, आमची लेक आम्हाला जड नाही. तिला इथेच राहू दे आणि आमची नातवंडही इथेच राहतील. त्यांच्यावर नसते संस्कार व्हायला नकोत."

"तात्या, असं बोलू नका. चूक झाली. पण आमची सून आहे ती, घरची लक्ष्मी आहे. तिला असं माहेरी टाकून आम्ही जाणार नाही." सुलक्षणा ताई हात जोडून म्हणाल्या.

"हा तुमचा मोठेपणा झाला. पण माझ्या लेकीला मी मार सहन करायला सासरी पाठवू की घरची लक्ष्मी म्हणून पाठवू हे तुम्हीच सांगा अन् असल्या जावयाला काय मान द्यायचा?" तात्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.

"तात्या, रडू नका ना." मंजिरी धावत त्यांच्या जवळ आली.

"कशासाठी सहन करतेस पोरी? एकदाही या बापाला सांगावस वाटलं नाही? तुझ्या बहिणींचं लग्न होणार नाही म्हणून? की सासरी कमीपणा वाटेल म्हणून? ताई, जीवात जीव असेपर्यंत आम्ही आमच्या लेकीला सांभाळू. पण पुन्हा सासरी पाठवणार नाही. तुमच्या लेकाचं वागणं, बोलणं सुधारलं तर विचार करू." हे ऐकून मंजिरीने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. बाप -लेक दोघे एकमेकांना धीर देत बराच वेळ रडत राहिले. आज कितीतरी वर्षांनी मंजिरी मोकळी झाली.

"आई, आप्पां - आईंनी खूप साथ दिली. ते नेहमी माझ्या बाजूने उभे राहिले आणि तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी काही सांगितलं नाही."

"ते काही नाही. आजचे दिवस सहन करण्याचे नाहीतच मुळी. आमची एक मुलगी सासरी गेली आणि दुसरी पुन्हा माहेरी आली असं आम्ही समजू." मंजिरीची आत्या म्हणाली. बाकी नातेवाईक कुजबूज करू लागले. इतक्यात तिचा चुलत भाऊ अजितच्या अंगावर धावून गेला. त्याला आडवे पर्यंत अजितने चांगलाच मार खाल्ला होता. "जावईबापू, लेकीच्या पाठीशी तिचं माहेर खंबीरपणे उभं आहे. पुन्हा असेल उद्योग केले तर तुमची कंप्लेंट गेलीच म्हणून समजा." तात्यांचे भाऊ धमकी देत म्हणाले. "आजी, बाबा आईशी नीट वागत नाहीत. कधी कधी मारतात सुध्दा." दोन्ही नातवंडं सुलभा बाईंना बिलगली आणि झालेल्या अपमानाने अजितची मान खाली गेली.

"तात्या, आम्ही तुम्हाला शब्द देतो इथून पुढे असं व्हायचं नाही आणि माझ्या मुलाने पुन्हा तुमच्या लेकिवर हात उगारला तर त्याला घरातून मी कायमचा बेदखल करेन." आप्पांनी आपला हात तात्यांच्या हातात दिला. ते आपल्या सुनेला घेऊन घरी आले.

इतके दिवस आई -आप्पा अजितशी दोन शब्द बोलत होते, आता तेही बंद झालं होतं. मुलंही बाबा म्हणत गळ्यात पडत होती. आता तीही जवळ येईनाशी झाली. मंजिरी अजितकडे लक्ष देत नव्हती. नोकरी नाही, घरात माणसं असून ती नीट वागत नाहीत, मित्र कधीही दुरावले होते. हातात पैसा, पद काहीही उरलं नव्हतं. एरवी अजितची बाजू घेऊन बोलणारे शेजारी आता त्याला नाव ठेवत होते, "पद, प्रतिष्ठा असेल तरच माणसाला मान मिळतो. बायकोला मारहाण करणाऱ्या माणसाची किंमत नेहमी शून्यच असते."

हे ऐकून आप्पांना वाटलं, 'लोकही किती चमत्कारिक वागतात! माणसाच्या हातून पैसा, पद गेलं की त्याला काडीची ही किंमत देत नाही. आता तिच किंमत मंजिरीला मिळते आहे. कारण ती नवऱ्यावर अवलंबून न राहता नोकरी करते, कमावते.'

पुढे बऱ्याच दिवसांनी खटपट केल्यानंतर अजितला प्रयत्नांती आधीच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. पण पद मात्र खालचं होतं. त्याचा गर्व, अहंकार आता खूपच कमी झाला होता.
ज्या सहकाऱ्यांनी आपल्या हाताखाली काम केलं त्यांच्या हाताखाली नोकरी करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. म्हणतात, नियती अशीच असते. संधी देते तशीच हिरावूनही घेते. कर्माचे फळ आपल्याला इथेच भोगावे लागते. शेवटी हाती काही नसलेल्या माणसाची किंमत ही 'शून्य 'असते.

समाप्त.

©️®️सायली जोशी.
(सदर कुठेही वापरू नये.)

🎭 Series Post

View all