"सावित्री, येण्याआधी आपल्या मुलीचा अन् निर्मोहीचा तू स्वीकार करायला तयार असशील तरच घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे राहतील. नाहीतर दोन्ही मुलींचा प्रेमानं सांभाळ करायला मी एकटा समर्थ आहे." शरद खिडकीपाशी उभे राहून बोलत होते.
आपल्या डोळ्यांतले अश्रू कोणालाही दिसू नयेत यासाठी त्यांची खटपट सुरू होती. 'साधा, सोपा, सरळमार्गी संसार आपल्या नशिबी का नसावा? आधी रमा कायमची सोडून निघून गेली. मग सावित्रीसोबत लग्न केलं खरं, पण तिचा स्वभाव हा असा! तिला समज नाही की धड उमजत नाही.'
आपल्या डोळ्यांतले अश्रू कोणालाही दिसू नयेत यासाठी त्यांची खटपट सुरू होती. 'साधा, सोपा, सरळमार्गी संसार आपल्या नशिबी का नसावा? आधी रमा कायमची सोडून निघून गेली. मग सावित्रीसोबत लग्न केलं खरं, पण तिचा स्वभाव हा असा! तिला समज नाही की धड उमजत नाही.'
"शरदराव, काय बोलता हे?" सारिका ताई तोंडावर पदर घेत रडू लागल्या. "दोन्ही मुली तुमच्या जवळ राहतील. मग युवराज आणि सावित्रीचं काय?"
"त्या दोघांनी तुमच्या घरी राहायला जावं."
"किती सहजपणे बोलता हे! यासाठी लग्न केलंत माझ्याशी?" सावित्री.
"तू माझ्याशी का लग्न केलंस ते आधी सांग. पैसा, इस्टेट की लग्न ठरत नव्हतं म्हणून निव्वळ तडजोड केलीस? निर्मोहीने तिच्या आजी - आजोबांकडे राहायला जावं म्हणून तूच मागे लागली होतीस ना? मग मीही तेच म्हणालो. इतकंच.
सासुबाई, आजवर मी एका शब्दानेही तुमच्याजवळ तक्रार केली नाही. पण पोटचं मूल न स्वीकारणं हा गुन्हा नाहीय? तेही का? तर ती मुलगी आहे म्हणून. मुलगा घराचा वारस होऊ शकतो तर मुलगी वारस म्हणून का नको? पुढे सगळी इस्टेट निर्मोही आणि युवराज या दोघांत वाटून द्यायचा माझा विचार होता. तेव्हापासून सावित्रीच्या डोक्यात नवीन कल्पना आली. आपल्याला दोन मुलं असतील तर नमूचा अधिकार आपोआप कमी होईल. काय, मी बरोबर बोलतोय ना?" शरद पुन्हा सावित्रीकडे वळून म्हणाले.
हे ऐकून तिची मान आपोआप खाली गेली.
"नमूच्या बाबतीत कर्तव्य करणं सोडा. पण एक स्त्री,आईविना पोर म्हणून तिला समजून घेणं गरजेचं होतं. तेही हिच्या हातून घडलं नाही. बायको म्हणूनही हिने काय कर्तव्य पार पडलं ते विचारा! कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवलं नाही की नवरा कामावरून आला म्हणून चहाचा कप हातात दिला नाही. कधीतरी मावशींनी केलेला स्वयंपाक वाढून देण्याचंही सुचू नये?
एका नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून काय अपेक्षा असतात? बरं, तेही जाऊदे. मी तसाच राहिलो असतो, पण माझ्या मुलीला आईचं प्रेम मिळावं म्हणून हिने 'आई' म्हणून नमूने मारलेल्या हाकेला प्रतिसाद सुद्धा दिला नाही." शरदच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
हे पाहून सारिका ताईंना गलबलून आलं. जावयाच्या डोळ्यांत अश्रू पाहून त्यांनी आपला चेहरा पदराआड लपवला. "माफ करा. आम्ही आमच्या मुलीवर संस्कार करण्यात कमी पडलो. आई म्हणून मीच कमी पडले. वाटलं होतं, लग्नानंतर मुली बदलतात. नवरा आणि त्याच घर हेच आपलं जग मानतात. सासरी रमून जातात.
पण आमच्या लेकीचं जग केवळ स्वतः भोवती एकवटलं आहे. मी समजावते तिला. पण असं माहेरी धाडू नका. उद्या लोकं काय म्हणतील? नवऱ्याने सोडून दिलं म्हणून.."
पण आमच्या लेकीचं जग केवळ स्वतः भोवती एकवटलं आहे. मी समजावते तिला. पण असं माहेरी धाडू नका. उद्या लोकं काय म्हणतील? नवऱ्याने सोडून दिलं म्हणून.."
"सासुबाई, यात तुमची काय चूक? कुठलेही आई - वडील आपल्या मुलांवर संस्कार करायला कमी पडत नाहीत. ते संस्कार अंगी बाणवून मुलांना वेळीच त्यांचा योग्य वापर करता यायला हवा. माफ करा, कठोर व्हावं लागतंय. पण वारस म्हणून फक्त मुलाचे लाड करून दोन्ही मुलींना असं वाऱ्यावर सोडून देणं मला योग्य वाटत नाही."
सारिका ताईंना शरदचं म्हणणं पटत होतं. पण सावित्री अजूनही काही बोलत नव्हती. हे पाहून ताईंनी बळेच मुलीला तिच्या मांडीवर ठेवलं आणि त्या बाळाच्या मऊ, उबदार स्पर्शाने ती सुखावली. इवलिशी पोर पाहून तिला पान्हा फुटला. आईपण तिच्या डोळ्यांतून वाहू लागलं.
"किती मोठी चूक करत होते मी! माझं बाळ आहे हे..मला माफ कर बाळा."
"असाच निर्मोहीचा स्वीकार कर. अजून ती लहान आहे तोवर तिच्या मनात आई म्हणून स्थान निर्माण कर. उद्या तिला कळायला लागलं की तुम्हा दोघींत आणखी अंतर, दुरावा निर्माण होईल. जसजसं तिचं वय वाढेल तसं हे अंतर कमी करणं दोघींनाही शक्य होणार नाही आणि तिच्या मनात निर्माण होणारी मानसिक पोकळी आयुष्यभर तशीच राहील." सारिका ताईंनी बाळाला पुन्हा आपल्या जवळ घेतलं.
"आई, काय करतेस हे? मी चुकले म्हंटलं ना. दे तिला इकडे."
शरदराव घरी चला. हिची चूक आता मलाच सुधारायला हवी.
"सावित्री, निर्मोहीला आईच्या मायेनं कधी जवळ घेऊन पाहिलं आहेस? पोटची नसली तरी मुलगी म्हणून तिचा स्पर्श अनुभवला आहेस? एकदा तिला आईच्या मायेने जवळ घेऊन बघ म्हणजे तिच्या मानसिक भुकेची तुला कल्पना येईल. युवराज आणि बाळ जसं आईवर अवलंबून आहे, तसंच नमूला आईचं प्रेम देणं, उबदार , सुरक्षित वातावरण देणं ही शरदरावांइतकीच तुझीही जबाबदारी आहे. शरदरावांना एक मुलगी आहे हे तुला माहिती होतं. तरीही तू लग्नाला होकार दिला होतास, हे विसरू शकत नाहीस." सारिका ताईंनी लेकीला समजावून सांगितलं.
"तुझ्या वागण्याचा परिणाम उद्या या तिघा मुलांत दुरावा निर्माण करेल. आई म्हणून राहू दे..ते नातं हळूहळू आकार घेईल. पण एक मैत्रीण या नात्याने निर्मोहीचं कौतुक कर म्हणजे योग्य, अयोग्य काय हे तिला समजेल. तुझ्याविषयी तिच्या मनात आपुलकी निर्माण कर, ती तुझ्यावर आपणहून प्रेम करायला शिकेल, तुझा आदर राखेल. तिच्यावर सतत टीका केलीस, तिला नाकारलंस तर तिची वृत्ती नकारात्मक बनेल. सर्वात आधी तिचा स्वीकार कर म्हणजे कुटुंबातल्या इतरांवर आणि स्वतः वरही प्रेम करायला शिकेल ती." सारिका ताईंचा अनुभव हे सारं बोलत होता.
"आई, मी प्रयत्न करेन." सावित्रीला ताईंचं बोलणं पटत होतं. मन लावून ती आपल्या आईचं म्हणणं ऐकत होती. तिला आपल्या आईपणाची नव्याने जाणीव होत होती. आई म्हणजे माया, ममता, वात्सल्य, अन् आपल्या मुलांना जोडणारा दुवा. कोणत्याही स्वार्था शिवाय असणारं नातं. हे आपल्या आईकडे पाहून कधी उमगलं कसं नाही? आई या शब्दाचा अर्थ तिला नव्याने समजत होता.
'याआधी आपण काय केलं? केवळ मुलगा झाला या आनंदात सारं काही विसरून गेलो. ना घराकडे लक्ष दिलं, ना निर्मोहीकडे. तीही माझ्या स्पर्शाला आसुसली असेल, हे कधी ध्यानातच आलं नाही. आपण केवळ स्वतःचा आणि बाळाचा विचार करत राहिलो. अगदी स्वतःच्या नवऱ्याला देखील विसरून गेलो आपण.'
'याआधी आपण काय केलं? केवळ मुलगा झाला या आनंदात सारं काही विसरून गेलो. ना घराकडे लक्ष दिलं, ना निर्मोहीकडे. तीही माझ्या स्पर्शाला आसुसली असेल, हे कधी ध्यानातच आलं नाही. आपण केवळ स्वतःचा आणि बाळाचा विचार करत राहिलो. अगदी स्वतःच्या नवऱ्याला देखील विसरून गेलो आपण.'
दरवाज्यात उभ्या असणाऱ्या मावशी ताईंचं बोलणं ऐकून गहिवरल्या होत्या. त्यांच्या कडेवर युवराज तर हाताशी नमू उभी होती. दोघांना पुढे करून डोळे पुसत त्या आत आल्या. "घरी चला, बाळाच्या स्वागताची समदी तयारी झालीय. नमू बाळाला बघायचा कधीपासून हट्ट करत होती म्हणून दोघांना घेऊन आले. ताई, तुमचं बोलणं ऐकून मनाचं अवघडलेपण दूर झालं.
माफ करा, पण बाईसाहेबांना आईच्या मायेनं हे सारं सांगणार कोणीतरी हवं होतं. त्याशिवाय त्यांच्या मनात नमू विषयी जागा निर्माण झाली नसती. आम्ही सांगितलं असतं तर तो लहान तोंडी मोठा घास झाला असता अन् असं करून कसं चालेल? 'मुलगी नको ' असा विचार आपल्या आईने केला असता तर आज आपण ह्यात असतो का? सांगा बघू. "
"मावशी, तसं काही नसतं. मोठ्यांनी लहानांचे वेळीच कान पिळायला हवेत. तुम्ही बोलला असता तरी काही हरकत नव्हती." ताई म्हणाल्या.
------------------------------------------------------
------------------------------------------------------
घरी मावशी आणि नमूने नव्या बाळाचं केलेलं स्वागत पाहून सावित्रीचा चेहरा आनंदाने फुलून आला. रामा आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन बाळाच्या स्वागताला आला होता. नमूने स्वतः बाळासाठी पाळणा सजवला होता. पण यातून बाळ झोका कसा घेणार? हेच तिला कळत नव्हतं. "बाळ मोठं होईपर्यंत त्याला झोका घालावा लागतो." कोणीतरी म्हंटल आणि सगळेच हसायला लागले.
बाळ झोपलं तशी नमू युवराजला घेऊन आपल्या आवडत्या जागी आली. शरदही तिथेच उभे होते. त्याला मांडीवर घेऊन तिने एक मोठा झोका घेतला. तसा युवराज खदखदून हसायला लागला अन् नमू सारं काही विसरून त्याला खेळवण्यात मग्न झाली. आतून त्यांचा खेळ पाहणारी सावित्री मनोमन सुखावली.
'स्वतःच्या आनंदापुढे आपल्या कुटुंबाचं सुख, हित, समाधान हे सारं काही विसरून गेलो होतो आपण. स्वार्थी विचार, हट्टामुळे हा आनंद कुठेतरी हरवला होता, आता तो गवसला. आजपर्यंत आपण खूप काही गमावलं. पण आता भरभरून देण्याची वेळ आली आहे. मग गमावलेलं सुख नक्की पदरी पडेल.' आपल्या लेकीच्या आगमनाने मन स्वच्छ झाल्यासारखं वाटलं तिला.
'मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करू आता.' विचारासरशी तिचं मन हलकं झालं.
'स्वतःच्या आनंदापुढे आपल्या कुटुंबाचं सुख, हित, समाधान हे सारं काही विसरून गेलो होतो आपण. स्वार्थी विचार, हट्टामुळे हा आनंद कुठेतरी हरवला होता, आता तो गवसला. आजपर्यंत आपण खूप काही गमावलं. पण आता भरभरून देण्याची वेळ आली आहे. मग गमावलेलं सुख नक्की पदरी पडेल.' आपल्या लेकीच्या आगमनाने मन स्वच्छ झाल्यासारखं वाटलं तिला.
'मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करू आता.' विचारासरशी तिचं मन हलकं झालं.
"नमू, इकडे ये बाळा." नकळत तोंडून शब्द फुटले अन् आवाजासरशी नमू कधी जवळ आली, हे सावित्रीला कळलंच नाही.
हे पाहणारे शरद युवराजला घेऊन पुन्हा झोक्यावर बसले. पायाने मोठा झोका घेताच युवराज उसळ्या मारायला लागला. त्यांना वाटलं, 'आयुष्य हे या झोक्यासारखं असतं. कधी पुढे, तर कधी मनानं मागे जाणारं! जसं झोक्याचं नियंत्रण पायात असतं तसंच आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात असतं. त्यावर स्वार होऊन जीवनाचा मनमोकळा आनंद आपल्याला लुटता यायला हवा.'
"आई.." नमूच्या तोंडून हाक ऐकून सावित्रीने नमूला जवळ घेतलं. तशा दोघीही मनापासून बिलगत एकमेकींच्या नव्याने प्रेमात पडल्या अन् शरदनी प्रसन्न मनाने झोका घेतला..अगदी उंच उंच जाणारा.
समाप्त.
©️®️ सायली धनंजय जोशी.
©️®️ सायली धनंजय जोशी.