झोका -भाग 1

हळुवार उलगडणारी नात्याची कथा
झोपाळ्यावर उंच झोके घेत असलेली निर्मोही दारात रिक्षा थांबलेली पाहताच टुणकन उडी मारून फाटकाजवळ गेली. बघता, बघता तिच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पसरला.

"बाबा, बाळ आलं."

या हाकेने तिथेच वर्तमानपत्र वाचत बसलेले शरद गडबडीने सामान घ्यायला धावले.

"आई..बाळाला माझ्याकडे दे ना. त्याला झोका फार आवडतो."

शरदकडे समान सोपवून निर्मोहीच्या हाकेकडे लक्ष न देता सावित्री तडक आत निघून गेली. तिने कडेवरच्या बाळाला घरकाम करणाऱ्या मावशींकडे सोपावलं आणि खोलीत येऊन पलंगावर आडवी पडली. "हुश्श..किती हा उकाडा! अन् त्यात तो ट्रेनचा प्रवास. जीव नकोसा झाला बाई."

"कसा झाला प्रवास? काही अडचण तर आली नाही. दादा स्टेशनवर पोहोचवायला आले होते ना?" मागोमाग आलेले शरद सावित्री जवळ बसत म्हणाले. त्यांनी सामान पलंगा खाली सरकवले. पाठोपाठ मावशी युवराजला शरदकडे देऊन बाहेर आल्या.

"अडचण! तुम्ही न्यायला का आला नाहीत? आम्ही कित्ती वाट पाहिली. नाराज केलंत ना आमच्या बाळराजांना? दादा आले होते म्हणून बरं. तरी आई म्हणत होती, जावईबापू आले की मग जा. पण मी कुठली ऐकते? तुम्ही आला नाहीत तर माझं काही अडत नाही. हे कळायला नको का तुम्हाला?"

"अगं, ऑफिसचं काम होतं. मग कसा येणार होतो मी? सुट्टी मिळाली नाही म्हणून यायची इच्छा असूनही येऊ शकलो नाही. शिवाय नमू इथं एकटी होती. तिला एकटीला सोडून यायचं धाडस झालं नाही. अजून तशी लहान आहे ती."

"घरात मावशी होत्या ना? जसं की त्या निर्मोहीची काळजी घेतच नाहीत आणि आपलं बाळही लहानच आहे म्हंटल. अगदी निर्मोहीपेक्षाही लहान. माझ्याजवळ ढीगभर समान होतं, त्यात कडेवर युवराज. शेवटी ट्रेनमधल्या माणसांना दया आली, त्यांनी केली हं मदत. काही अडलं नाही."

हे ऐकून शरद ओशाळले.
"मी विसरलो होतो, आपल्याला एक नाही तर दोन बाळं आहेत ते." ते युवराजला थोपटत म्हणाले.

"तुम्हाला दोन असतील, पण माझं बाळ एकच. निर्मोही माझी मुलगी नाही." सावित्री युवराजला मांडीवर घेत म्हणाली.

"सारखं, सारखं हे बोलायलाच हवं का? वाटलं, या पंधरा दिवसांत स्वभावात थोडातरी बदल झाला असेल. नसती आशा ठेवली मी. पण असो, आत्ताच आलीस, मावशींना न्याहारी मांडायला सांगतो." चिडून शरद बाहेर जायला म्हणून वळले.

"काही नको. आईने बांधून दिली होती. येताना तिच खाल्ली. आत्ता भूक नाही." सावित्री फणकाऱ्याने म्हणाली.

"नमू, ती कोपऱ्यातील छोटी बादली घे अन् फुलझाडांना थोडं थोडं पाणी घाल." खोलीतला आवाज बाहेर ऐकू येत होता म्हणून मावशींनी नमूला अंगणातल्या झाडांना पाणी घालण्यासाठी पाठवलं. जेणे करून आई -वडिलांचं बोलणं तिच्या कानावर पडू नये.
"बाईसाहेब, न्याहारी करणार की चहा टाकू?" मावशी गडबडीने खोलीजवळ येत म्हणाल्या.

"मावशी, फक्कड चहा करा. साहेब आणि मी चहाच घेऊ." सावित्री तयार होणाऱ्या शरदरावांना न्याहाळत म्हणाली. साधारण पस्तिशीच्या आसपास वय असलेले शरद ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट, त्यावर काळी पँट. नेटका भांग पाडून मागे वळवलेले काळेभोर केस, त्यांचं धारदार नाक युवराजच्या नाकाशी मिळतं -जुळतं होतं. डोळ्यांची ठेवण मात्र निर्मोहीने उचलली होती. ओठांवर नकळत राखलेली मिशी त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वात भर घालत होती.
"लवकर याल?" सावित्रीच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

शरद मात्र काही न बोलता युवराज जवळ आले. त्याच्या गोबऱ्या गालावर हलकेच ओठ टेकवत त्यांनी गोड पापी घेतली अन् मागे न वळून पाहता चटकन खोली बाहेर पडले.

"हे काय! साहेब गेले? अन् चहा?" मावशी लगबगीने खोलीत येत म्हणाल्या.

"मावशी, त्यांचा चहा तुम्हीच घ्या. आता हाक मारली तरी मागं वळून बघायचे नाहीत हे. बाप - लेकीचा स्वभाव सारखाच हट्टी आहे म्हणायचा." सावित्री युवराजला कुरवाळत म्हणाली.

'आता यात नमूचा काय संबंध? उठसूठ तिला बोल लावणं कधी थांबणार? आईविना वाढलेली पोर अजून लहान आहे. बाईसाहेबांनी आत्ताच तिला आईची माया दिली तर ठीक. नाहीतर ती यांना आई म्हणून कधीही स्वीकारणार नाही. तसंही बाईसाहेब या घरात आल्यापासून साहेबांचा स्वभाव बदलला आहे. नमूच्या बाबतीत ते जरा जास्तच हळवे झाले आहेत." मावशी मनातल्या मनात बोलत होत्या.

"मावशी, अति विचार केला की मनुष्य संभ्रमात पडतो. जा तुम्ही. खूप कामं पडली असतील ना?" सावित्रीने युवराजला जवळ घेतलं.


"बाबा, लवकर या." झाडांना पाणी घालत असलेली निर्मोही त्यांच्या कमरेला मिठी मारत म्हणाली. शरदनीं तिला कडेवर घेत तिच्या केसांना कुरवाळलं. "असा जातो अन् असा येतो. ऐक, युवराजला त्रास द्यायचा नाही. आईला उलट उत्तर द्यायचं नाही. मावशींचं ऐकायचं, वेळेवर जेवायचं आणि अभ्यास करायचा. इतकं ऐकशील ना?"

"ओके बाबा." नवीन शिकलेला हा इंग्रजी शब्द निर्मोहीने योग्य वेळी वापरलेला पाहून शरद कितीतरी मोठ्याने हसले. पट्कन गाडीत जाऊन बसले. "रामा, आज यायला उशीर होणार आहे. दोन - तीन बैठका करून रात्री जेवणाच्या वेळेत येणं होईल." ते आपल्या ड्राइव्हरला म्हणाले.

"बस् का साहेब, हे काय सांगणं झालं? रोजचचं आहे. मी काय तुम्हाला ओळखत नाही होय? हल्ली रोज रात्री घरी उशीरा येतो आपण. तुम्ही न जेवता झोपी जाता. सकाळची न्याहारी देखील वेळेवर करत नाही. सतत कसल्या ना कसल्या विचारांत असता. तरी बरं, नमू ताईंकडे तुमचं लक्ष असतं अन् युवराजांकडं लक्ष द्यायला बाईसाहेब आहेतच की."

"हे कोणी सांगितलं?" शरदना आश्चर्य वाटलं.

"साहेब, भिंतींना कान आणि डोळे असतात. आपल्याला वाटतं, चार भिंतींच्या आत काय घडतं हे कोणाला कळत नाही. पण तसं मुळीच नसतं. आपण डोळे मिटले तरी जगाचे डोळे उघडे असतात." बोलता, बोलता रामाने गाडी जोरात पळवली. शरदनी डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला.
--------------------------------------------------

"मावशी, बघा तरी गुलाबाच्या झाडाला खूप साऱ्या कळ्या लागल्या आहेत." नमू त्यांना ओढत घेऊन आली.

"खरंच की! असंच रोज पाणी, खत घातलं की झाडं छान फुलतात."

"खत म्हणजे काय?" नमूचा निरागस प्रश्न आला.

"खत म्हणजे, झाडांचं जेवण. जशी तुला भूक लागते तशी झाडांनाही भूक लागते. मग जेवण करून ती चांगली धष्टपुष्ट होतात. त्यांना फांद्या फुटतात, कळ्या येतात. काही दिवसांनी त्या कळ्यांची फुलं होतात. आता या कळ्यांची फुलं झाली की एक फुल तुझ्या केसांत माळायचं अन् बाकी देव बाप्पाला वाहायची." मावशी कळ्या न्याहाळत म्हणाल्या.

"आईला पण एक फुल देऊ. तिचे केस खूप मोठे आहेत ना. त्यावर एकदम छान दिसेल. हो ना? नमू टाळी वाजवत म्हणाली.
यावर मावशींनी मानेनेच होकार दिला. मनात त्या म्हणाल्या, 'असा विचार बाईसाहेबांनी केला तर फार बरं होईल.'
"मावशी, आई कित्ती छान दिसते ना. बाळ अगदी आईसारखाच दिसतो. गोरा रंग, मऊ गाल, त्याचे डोळे सुध्दा आईसारखेच आहेत. पण ती सारखी बाळाजवळ असते. त्याच्याशी खेळते, बोलते, छान गोष्टी सांगते. पण माझ्याशी नीट बोलत नाही. गोष्टी सांगत नाही, खाऊ भरवत नाही की अभ्यासही घेत नाही. असं का? मग मला खूप एकटं वाटतं."

'काय सांगावं हिला? पोरीचं वय धड कळण्याजोगं नाही. प्रश्न मात्र खूप पडतात. त्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हे आम्हा मोठ्या माणसांना कधी, कधी समजतच नाही.' नमूच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे मावशींना न उमगल्याने त्या शांत झाल्या.

वहिनीसाहेब गेल्यानंतर मावशींनी हे घर मनापासून सांभाळलं होतं. नमू, शरद या दोघांची आईच्या मायेने काळजी घेतली होती. पण हक्काच्या स्त्री शिवाय घराला घरपण कसं येईल? आणि पोरीला आई हवी म्हणून त्यांच्याच आग्रहाखातर शरदनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला.


संध्याकाळी सावित्री माहेरहून आणलेलं सामान काढत होती.
"मावशी, हा फ्रॉक निर्मोहीला द्या. म्हणावं, माझ्या आईने दिला आहे. ही आई पण ना..उगीच काहीतरी देत असते. नको म्हणाले, तरी ऐकलं नाही." सावित्री मावशींच्या हातात एक पिशवी देत म्हणाली.

"बाईसाहेब, हे तुम्हीच दिलंत तर योग्य होईल. तेवढंच पोरीला बरं वाटेल."

"मावशी, तुम्ही मला शिकवायची गरज नाही. मला कळतं कुठे कसं वागायचं ते." सावित्री आपल्या खोलीत निघून गेली.

'नमूला आई मिळावी म्हणून साहेबांनी दुसरं लग्न केलं. बाईसाहेब आधी काहीशा नीट वागल्या. जशी युवराजांची चाहूल लागली तसं सगळं बिनसलं.' मावशी विचारात मग्न झाल्या.
'आज वहिनीसाहेब असत्या तर ही वेळ आली असती का? त्यांनी हे घर आपल्या मायेने बांधून ठेवलं होतं. आल्या -गेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी जीव लावला. त्या गेल्या तेव्हा अनोळखी माणसं सुद्धा येऊन भेटून, सांत्वन करून गेली. आजच्या काळात अशा स्वभावाची स्त्री मिळणं फार कठीण.'
---------------------------------------------

"नमूबाई, झाला का अभ्यास? काय लिहिलंय, किती पाठ केलंय हे बाबा आल्यावर तपासून बघणार आहेत बरं आणि किनई, तुमच्या आजीने गंमत पाठवली आहे. आई म्हणाली, बाळाला छान, छान फ्रॉक दिला आहे." मावशी नमू जवळ बसत म्हणाल्या.

"वा! कित्ती छान आहे. मी आत्ताच घालून बघणार. बाळाला काय दिलंय आजीने?"

"ते आईलाच विचार."

नमू फ्रॉक घालून आईच्या खोलीत आली. "आई, कशी दिसते मी? आणि बाळाला काय दिलं आजीने? कपडे की खेळणं?" नमू बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"निर्मोही, बाळ झोपलाय. अजिबात दंगा करू नको. जा, नंतर ये." सावित्री.

"पण आई, मला बाळाशी खेळायचंय, खूप गप्पा मारायच्या आहेत. कित्ती दिवस भेटला नाहीय तो. मला तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. बाबांना फोन करूया म्हंटल तर नको म्हणाले. आता मी कशी दिसते हे तरी सांग." नमू समोरच्या आरशात स्वतःला पाहत होती.

"फोन करू नको म्हणाले का बाबा? थांब, ते आले की मी विचारते त्यांना." सावित्री विषय बदलत म्हणाली खरी, पण गेल्या पंधरा दिवसांत शरदनी केवळ एकदाच फोन केला होता. कामाचा व्याप, निर्मोहीचे कारण देऊन ते सावित्रीला न्यायला सुद्धा गेले नव्हते. दारात गाडी होती. मात्र ती फक्त ऑफिसच्या कामासाठी वापरता येत होती.
'खरंच शरदना बाळाची, माझी आठवण आली नसेल का? की त्यांना फक्त निर्मोहीची काळजी आहे? तिला आई हवी, घरात कर्ती स्त्री हवी म्हणून त्यांनी लग्न केलं असेल माझ्याशी? कालही ते चिडले, पण नेहमीसारखे बोलले नाहीत. रात्री उशीरा घरी आले. जेवले देखील नाहीत. नक्की काय बिनसलंय?'

क्रमशः

🎭 Series Post

View all