Login

झोका - भाग 3

हळुवार उलगडणारी नात्याची कथा
"तूही इतकं मनाला लावून घेऊ नको रामा. आलेल्या अनुभवांवरून बोलतोय मी. खरंतर दुसरं लग्न करण्याचा विचार केलाच नव्हता. पण मावशींनी समजावलं. वाटलं, सगळं सुरळीत होईल, नमूला आई मिळेल आणि मला पार्टनर. पण सवित्रीचा स्वभाव उमगतच नाही. ती कधी काय बोलेल, तिच्या मनात काय असेल याचा नेम लागतं नाही. आम्ही केवळ एक सोपस्कार किंवा आकर्षण म्हणून शरीराने जवळ येतो. त्यात ओढ, बंधन, प्रेम, स्नेह अशा भावनांचा आदर मुळीच नसतो." बोलताना शरदचे डोळे भरून आले, आवाज दाटून आला.

"साहेब, मनात येईल ते सगळं बोलून रिकामे व्हा. हा रामा इकडची गोष्ट तिकडे करायचा नाही. शब्द आहे आपला. चला, मस्तपैकी चहा पिऊ. एक दिवस ऑफिसला लेट मार्क पडला तर काय बिघडत नाही. माणसानं कधीतरी मनासारखं वागून, बोलून रिकामं व्हावं. बॉस काय म्हणल, बायको काय विचार करेल, शेजारी -पाजारी काय म्हणतील या विचारांना सरळ धाब्यावर बसवावं."

हे ऐकून शरद मनापासून हसले आणि रामाने गाडी शहरापासून काहीशा दूर अंतरावर असलेल्या चहाच्या टपरीकडे वळवली.
---------------------------------------------------

मावशींनी नमूच्या जाण्याची तयारी केली. चिवडा, लाडू, भडंग असे बरेच खाण्याचे पदार्थ करून बांधून ठेवले.

यावेळी मात्र नमूचा घरातून पाय निघत नव्हता.

"बाबा, मला नाही जायचं. मी नसेन तर बाळाशी कोण खेळेल? त्याला कडेवरून फिरवून बाग कोण दाखवेल? झोपाळ्यावर बसून झोके कोण देईल मग? अजून आमच्या गप्पाही संपल्या नाहीयत. मला त्याची खूप, खूप आठवण येईल तिकडे." नमू फुरंगटून म्हणाली.

"मग बाळाला घेऊन जा आजीकडे." शरद सहज म्हणाले.

"खरंच? माझ्यासोबत आई आणि बाळ येईल?"

"जा, तूच विचारून ये."

नमू पळत आत गेली. "आई, बाळ आणि तू माझ्यासोबत आजीकडे याल?"

"आम्ही येऊन काय करणार? ते माझं नाही, तुझ्या आईचं घर आहे. म्हणजे तुझं आजोळ बरं आणि बाळाचं आजोळ म्हणजे माझ्या आईचं घर हं. तू जाऊन ये. आम्हाला तिकडे करमणार नाही." सावित्री बाळाचं आवरत होती.

"बाबा, असं कसं? बाळाची आजी वेगळी आणि माझी आजी वेगळी कशी काय? शाळेतल्या मैत्रिणी आणि त्यांचे भाऊ - बहीण सुट्टीला एकाच आजी -आजोबांकडे जातात." नमू पाठोपाठ आलेल्या शरदना म्हणाली.

"बाळ तुझा सख्खा भाऊ नाहीय काही. सावत्र भाऊ आहे, हे इथून पुढं लक्षात ठेव." असं म्हणत सावित्री बाळाला घेऊन तिथून निघून गेली.
-------------------------------------------------------


'सावत्र म्हणजे काय?' नमू जाताना याचं विचारात गढून गेली होती.
'सखू आजीचं घर म्हणजे माझ्या आईचं घर..म्हणजे माझी आई कोण होती? पण शाळेतल्या मित्र -मैत्रिणी आणि त्यांचे भाऊ - बहिण यांची आई तर एकच असते!' काही केल्या तिला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेना. बाबांना विचारावं तर ते गाडी चालवणाऱ्या रामा काकाशी बोलण्यात मग्न होते.
'खरंच बाळाला सोबत आणायला हवं होतं. म्हणजे त्याला या खिडकीतून दिसणारी पाळणारी झाडं, रस्ते, आकाश, शेत हे सगळं दाखवायला कित्ती मजा आली असती!' नमूला युवराजची आठवण आली अन् ती वेगळ्याच विश्वात रमून गेली.
----------------------------------------------------------

सखू आजीने देखील सावत्र या शब्दाचा अर्थ नमूला सांगितला नाही. ती म्हणाली, "आत्ता तू अजून लहान आहेस. आणखी मोठी झालीस की सांगेन."

तसंच बाळाची आणि माझी आई एक का नाही? या प्रश्नाचं उत्तरही आजोबांना देता आलं नव्हतं. त्यामुळे नमूच्या मनातले अनेक प्रश्न तसेच अनुत्तरीत राहिले.

"बाबांकडे फक्त मावशी आणि बाबा हे दोघेच माझ्याशी नीट बोलतात. आई सारखी ओरडते आणि बाळाला अजून बोलता येत नाही." नातीची ही तक्रार ऐकून आजोबांचा चेहरा मात्र गंभीर बनला.

"तरी मी तुला सांगत होतो, आपली नातं आपल्याला जड नाही. तिला इथेच ठेऊन घेऊ. तिकडे सावित्रीबाई हिच्याशी कशा वागतात, हे आपल्याला ठाऊक नाही. ही पोरगी आपल्याला सावत्र शब्दाचा अर्थ विचारते, बाळाची अन् हिची आई वेगळी कशी? हे विचारते. याचा अर्थ काय घ्यावा? सखू, मुलांना फक्त बाबांचं प्रेम मिळणं गरजेचं असतं, तसंच आईचं प्रेमही मिळायला हवं. पोर एकटीच रमते. मन मोकळं हसत - खेळत नाही. काळजी वाटते गं तिची."
सखू आजीही विचारात पडली. वेळ येईल तेव्हा शरदरावांना याचा जाब विचारायचा असं ठरवून दोघांनीही या विषयाला तात्पुरता विराम दिला.

आजी - आजोबांच्या मायेने दरवर्षीपेक्षा यावर्षी नमू आजोळी चांगली रुळली. एरवी एकटं राहणं पसंत करणारी नमूने दिवसभर मित्र -मैत्रिणी जमवून खेळ, गप्पा - गोष्टी केल्याने बाकीचे विचार सध्या तरी तिच्या मनातून दूर गेले होते. तिचं हरवलेलं बालपण पुन्हा एकदा नव्याने तिला गवसलं होतं.

इकडे सावित्री ' दुसरा चान्स 'घेण्यासाठी शरदच्या मागे हट्ट करत होती. गुपचूपपणे जाऊन स्वतःची पत्रिका दाखवून पुन्हा एकदा मुलगा होण्यासाठी तिने उपायही सुरू केले होते. आपल्याला दोन्ही मुलं असतील तर निर्मोहीचं प्रस्थ कमी व्हायला मदत होईल. शिवाय या घराचे वारस म्हणून त्यांचाच हक्क, अधिकार अबाधित राहील असं तिला वाटत होतं.
शिवाय अडून, अडून तिने शरदना हेही सुचवलं होतं की, निर्मोही आता तिच्या आजी - आजोबांकडे कायमची राहू दे. पण शरद असं होऊ देणार नव्हते.
"इतकी वर्षे तुम्ही तिचा सांभाळ केलात ना? मग तिच्या आजी - आजोबांचं काही कर्तव्य आहे की नाही?" सावित्री एक दिवस चिडून म्हणाली.

"सांभाळ? सावित्री, नमू माझी पोटची पोर आहे. मी कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रेमाने तिचा आयुष्यभर सांभाळ करायला तयार आहे. तू नमूच्या बाबतीत कर्तव्य देखील पार पाडायची तसदी घेत नाहीस. जर तुला कोणी सांगितलं तर युवराजला केवळ एक कर्तव्य म्हणून सांभाळशील? उलट तू तर त्याला जीवापाड जपतेस. भलेही नमूचे आजी -आजोबा तिला तिकडे ठेऊन घ्यायला तयार असतील. पण मी मात्र तिला मुळीच अंतर देणार नाही."

या उत्तराने सावित्रीला चीड आली. आता दुसरा चान्स घ्यायचाच, असं मनात पक्कं ठरवून ती शरदशी प्रेमानं वागण्याचं नाटक करू लागली. शरदना मात्र एकाएकी बायकोच्या स्वभावात बदल झाला कसा? हेच कळेना. पण म्हणतात ना, स्त्रीचं मन चंचल असतं. बायकांचं मन कधी बदलेल याचा नेम नाही म्हणून त्यांनी सावित्रीच्या बदलेल्या स्वभावाचा स्वीकार केला.

सावित्री हल्ली शरदना काय हवं, काय नको हे जातीनं पाहू लागली. त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करू लागली. स्वयंपाकघरात काम करू लागली. निर्मोहीबद्दल चांगलं बोलू लागली. रागराग करून परिस्थिती बदलली नाही, निदान इतरांच्या नजरेत चांगलं वागून तरी ती बदलते का पाहू म्हणून सावित्री नीट वागण्याचा प्रयत्न करू लागली.

तिचं हे बदलेलं रूप मावशींना रुचत नव्हतं. 'स्त्रीचा स्वभाव असा अचानक बदलत नसतो. यामागे काहीतरी खास कारण असावं, हे मात्र खरं! मावशींना राहून, राहून असं वाटत होतं. नमू इथं नसल्यामुळे बाईसाहेब असं वागत असतील? की खरंच त्यांना मनापासून साहेबांबद्दल काही वाटत असेल?' हे त्यांनाही कळत नव्हतं.
------------------------------------------------------------

"शरदराव, आमच्या नातीला इथेच राहू दे. आम्हाला शक्य आहे तोवर आम्ही हिच्या पाठीशी उभे राहू. या लहान वयात नको ते प्रश्न पडतात तिला. त्यांची उत्तर कशी द्यायची हे तुम्हीच सांगा. तिला आई - वडील दोघांचं प्रेम मिळायला हवं. सावित्रीबाईंनी मुलगी म्हणून तिचा मनापासून स्वीकार करायला हवा, जीव लावायला हवा. तरच तिचं हरवलेलं बालपण परत येईल. या निरागस वयात मुलगी मोठ्या माणसांसारखी वागायला लागली तर कसं व्हायचं?" सखू आजी नमूला न्यायला गेलेल्या शरदशी बोलत होती.

हे जरी खरं असलं तरी शरद सगळं काही ठीक होईल. या आशेवर नमूला घरी घेऊन आले.

अखेर दोन महिन्यानंतर नमू सुट्टी संपवून घरी आली. इच्छेप्रमाणे सावित्रीला दिवस गेले होते. पुन्हा एकदा मुलगा होणार या आनंदात ती खुश होती. तिचा स्वार्थी हट्ट आत्ता तरी पूर्ण झाला होता. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला असल्याने युवराज नमू आणि मावशींच्या सहवासात वावरत होता. आणखी एक बाळ येणार म्हणून नमू आनंदात होती होती. आईची काळजी घेत होती.

सावित्री नमूला स्वीकारणार असेल तर शरदना आणखी काय हवं होतं? येणाऱ्या बाळाचा पायगुण चांगला आहे म्हणून तेही खुश होते. असं हसतं - खेळतं घर बघून मावशींना बरं वाटलं.
'आपलंही घर असंच असावं.' आता रामाच्या लग्नासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले.

दिवस सरत होते. येणाऱ्या बाळासाठी सावित्रीने खूप स्वप्नं पाहिली होती. 'युवराजच्या सोबतीला एक भाऊ असेल तर कित्ती छान होईल! दोघं एकत्र मोठी होतील, वाढतील, खेळातील अन् मुलांची आई म्हणून माझा मान वरचा राहील तो भाग वेगळाच. पण मुलगी झाली तर? नको..हा विचारही मनात यायला नको.' सावित्री भानावर आली.

नऊ महिने सरले. आपल्या लेकाला कुशीत घेण्यासाठी आसुसलेली सावित्री दवाखान्यात दाखल झाली. वाट पाहून, कळा सोसून अखेर सावित्रीने एका गोड मुलीला जन्म दिला. ती अजून शुद्धीवर यायची असल्याने शरद वाट पाहत खोलीत थांबले होते.

"अहो, कुठंय माझं बाळ?" बऱ्याच वेळाने सावित्रीचा क्षीण आवाज कानावर पडला. तिच्या पलीकडे झोपलेलं, दुपट्यात गुंडाळलेलं इवलंसं बाळ तिच्या कुशीत देताना शरदना कोण आनंद होत होता.
"सावित्री, मुलगी झाली आपल्याला."

हे ऐकून सावित्रीने पुढे केलेले आपले हात मागे घेतले.

"काय बोलता हे? मला खात्री होती, मुलगा होणार होता. तुमच्या सांगण्यात काही चूक तर होत नाही ना?"

"नाही. अगं, चूक कशी होईल? जवळ घे हिला. आपल्या आईची वाट पाहत असेल ती."

"नको शरद. मला मुलगी नको होती." सावित्री तोंड फिरवून तशीच पडून राहिली.

"काय बोलतेस हे? दुसरा चान्स घेण्याचा हट्ट तुझा होता. तो पूर्ण झालाय सावित्री. आपल्या मुलीला जवळ घे. तिला तुझी गरज आहे. नऊ महिने पोटात वाढवून, कळा सोसून या चिमुकल्या जीवाला जन्म देऊन तुला पुन्हा एकदा आईपण सिद्ध करायचं होतं ना? की पत्रिका दाखवून पहिला मुलगा असताना पुन्हा मुलगाच होणार या आशेवर तू या कळा सोसल्यास?" सावित्रीने चमकून शरदकडे पाहिले.

"मला सगळं माहिती होतं. अगं, तुझ्या पोटची मुलगी आहे ही. निदान हिचा तरी स्वीकार कर. तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आई -वडिलांनी देखील असाच विचार केला असता तर? हा स्वार्थीपणा जन्मालाच आला नसता." शरद मुलीला घेऊन बाजूला होत म्हणाले.

इतक्यात डॉक्टर बाई आल्या.
"सावित्री, कसं वाटतंय आता? मुलीला जवळ घे. आईची ऊब मिळू दे तिला."

"नको डॉक्टर. अजून ती धड शुद्धीवर आलेली नाहीय." असं म्हणत शरद रागारागाने खोलीतून बाहेर निघून गेले.
---------------------------------------------------------

"सावित्री, वेडेपणा पुरे झाला. मुलीला जवळ घे आता." सावित्रीच्या आई, सारिका ताई नातीला मांडीवर घेऊन बसल्या होत्या. "देवानं दोनदा तुझी ओटी भरली आणि तू केवळ मुलगी झाली म्हणून ती नाकारते आहेस! काय म्हणावं या वागण्याला? अगं, तीन मुलांची आई आहेस तू. जनाची नाही, निदान मनाची तरी बाळग." ताईंना राग अनावर झाला होता.

"अहो, असे कितीतरी पेशंट येतात इथं. मुलगी झाली म्हणून कधी घरचे नाराज असतात, तर कधी स्वतः आई नाराज असते. पण आम्ही अशा पेशंटना चांगलं समजावून सांगतो. त्यांचं समुपदेशन करतो. मग नीट वळणावर येतात ते. तुम्ही नका काळजी करू." दवाखान्यातली नर्स ताईंना म्हणाली.

"मला आणखी एक वारस हवा होता. यात माझी काय चूक झाली? आई, निर्मोही माझी मुलगी नाही, मला तिच्याबाबत कधीही माया वाटली नाही. तिच्यात अन् माझ्यात कायम परकेपणा जाणवतो. असं वाटतं, कितीही झालं तरी ही सावत्र! मग मी तिचा स्वीकार कसा करू? असं असलं तरी मी तिचा छळ केला नाहीय हं." सावित्री.

"आपल्या वागण्याचं समर्थन काय करतेस? आजवर तुला खूप समजावून सांगितलं. पण आता मात्र हद्द झाली. लग्नाचं वय उलटून निघालं तरी तुझं लग्न ठरत नव्हतं. तेव्हा आमचा जीव थाऱ्यावर नव्हता. त्यात तुझा हा हट्टी स्वभाव! नशिबाने शरदरावांनी तुझा स्वीकार केला आणि आमची काळजी मिटली.

इथं काय कमी आहे तुला सांग? मुला - बाळांनी भरलेलं मोठं घर आहे, दारात गाडी, हाती पैसा, शिवाय नातेवाईक जास्त नाहीत, त्यामुळे फारसं येणं -जाणं नाही. कसली जबाबदारी नाही. आणि काय हवंय तुला?

या चांगल्या गोष्टी पाहायच्या सोडून तू केवळ स्वतःचा विचार करत आलीस. मला जे हवंय ते मिळायलाच हवं असा हट्ट करत आलीस. निर्मोहीला आईची माया दिली नाहीस. पण शरदरावांनी आमच्याकडे कधीही तक्रार केली नाही." ताईंचा राग अजूनही गेला नव्हता.

शरद मात्र आपल्याच विचारांत बाहेर फेऱ्या मारत होते.

क्रमशः

(मुलगा आणि मुलगी एकसमान आहेत. फक्त कथेसाठी वरील विधानांचा वापर केला आहे.)

🎭 Series Post

View all