Login

झुकणार नाही-1

गोड बोलून बायकोला दिमतीला ठेवण्याचा योगेशचा डाव
"नाही म्हणजे नाही...यापुढे हातात वस्तू देणार नाही, जायचं आणि स्वतः उठून घ्यायचं.."

रात्रीच्या भांडणाने सुमा चांगलीच चिडली होती. रात्रभर तिचं मन थाऱ्यावर नव्हतं, सतत डोळ्यात पाणी यायचं, हुंदका दाटून यायचा, मनात नको नको ते विचार यायचे. योगेश तिला नको नको ते बोलून मोकळा झाला आणि स्वतः घोरत गाढ झोपी गेला. सुमाला किती वाईट वाटलं असेल याचा जराही विचार त्याने केला नव्हता.

सुमाला राहून राहून योगेशचे शब्द आठवायचे,

"एवढंच होतं तर स्वतः कमवायचं आणि पैसा उधळायचा, खर्च करायला काही लागत नाही, कमवायला मात्र अक्कल लागते"

अक्कल काढल्यावर सुमाचं डोकच फिरलं,

"अक्कल? दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन चे मार्कशीट काढा, मला तुमच्याहून चांगले टक्के आहेत बरं का! भ्रमात राहू नका"

"मग कमवायला अक्कल कुठे गेलेली?"

"हे तुम्ही विचारताय? जसं लग्न करून आणलंत तसं पूर्ण अडकवून ठेवलंर मला...अगदी पहिल्या दिवसापासून, माझं ऑफिस आहे मला सकाळी 7 ला चहा लागतो, 8 ला नाष्टा लागतो आणि साडेआठ ला डबा..डब्यात अमुक एक गोष्टीच लागतात, अंघोळीहून बाहेर आलं की समोर कपडे ठेवलेले हवेत, आठवडाभराचे कपडे धुवून इस्त्री करून हवेत..यापलीकडे लक्ष द्यायला तुम्ही वेळ कुठे दिलात मला?"

"पूर्ण दिवस तुला हेच पुरायचं का? काहीही आपलं."

"बरोबर, तुमच्या कामातून मोकळे झाले आणि स्वतःसाठी शोधली होती चांगली नोकरी..पण तुमचे हजार प्रश्न, तू 7 ला गेलीस तर माझा चहा, नाष्टा, डबा कधी होईल? वेळेवर मिळेल का? जरा म्हणून ऍडजस्ट करायला तयार नव्हता...म्हणजे तुमचं सगळं अगदी प्रायोरीटीवर ठेवायचं आणि वेळ मिळालाच तर मी माझ्या करियरकडे बघायचं..हेच होतं तुमचं.."

सुमा डोळ्यात पाणी आणून बोलत होती. योगेशलाही कळत होतं पण वळवून घ्यायला तो तयार नव्हता. लग्नाआधी आई सगळं आयतं हातात देई, आणि तीच सवय बायकोला लावून दिली...आता ती अडकली.

सुरवातीला प्रेमापायी तिने सगळं केलं, कौतुकाने केलं..पण यात आपलं स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे हे समजायला तिला खूप वेळ लागला.

त्या भांडणानंतर सुमाने योगेशला त्याची कामं करायला आणि सगळं आयतं हातात द्यायला स्पष्ट नकार दिला.

पहिल्या दिवशी योगेशने बाहेरच नाष्टा, जेवण केलं..पण दुसऱ्या दिवशी त्याला नको नको झालं, सुमा ऐकायला तयार नव्हती. मग त्याने आईकडे मोर्चा वळवला आणि आईकडून चहा नाश्त्याची सोय करून घेतली.

जेव्हा सासूबाईंना कळलं तेव्हा त्यांनी सुमाला खूप ऐकवलं, नको नको ते बोलल्या.."माझ्या मुलाचे हाल करायचे होते मग लग्न कशाला केलंस?" इथपर्यंत ऐकवलं.

पण आता सुमाने आपला हेका सोडला नाही. आता फक्त स्वतःच्या करियरकडे बघायचं हेच तिने डोक्यात घेतलं. योगेशला कंटाळा येऊ लागला, कितीही झालं तरी स्वतःची बरीच कामं त्याला आता करावी लागत होती. सगळं आधीसारखं आयतं हातात मिळावं म्हणून त्याने साम, दाम, दंड आणि भेद नीती वापरायची ठरवली.

"सुमा अगं माझं तुझ्याशिवाय पान हलत नाही माहितीये ना तुला? तुझा हात लागल्याशिवाय वस्तू हातात घेऊ वाटत नाही मला..इतकी सवय झालीये तुझी.."

सुमा या शब्दांना भुलणारी नव्हती...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all