Login

भेटीची ओढ... भाग २

अंतर कितीही असो महत्त्व नाही कारण प्रेम खरे आहे...
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद लेखन

भेटीची ओढ... भाग २

©® एकता माने

प्रेम तर दोघांचेही तेवढेच होते; पण एकांशी तिच्या मनातल्या भावना त्याला बोलून मोकळी होत होती. तिच्या मनामध्ये निर्माण झालेला राग सांगून व्यक्त होत होती; परंतु निखिलला मात्र आपल्या मनातल्या भावना व्यवस्थित शब्दात मांडता येत नव्हत्या आणि तिचा राग सहन होत नव्हता. तिला होणारा त्रास पाहून कधी कधी त्याला स्वतःचाच राग येत होता. तरीही कसा बसा तो तिला समजण्याचा प्रयत्न करत होता.

त्यांच्या वादांमध्ये रुसवे-फुगवे असायचे, कधी रडारडी व्हायची; पण शेवटी दोघेही एकमेकांशी बोलल्याशिवाय राहू शकत नव्हते.

त्या आठवणीने दोघांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

'वाद असले तरी प्रेम तुटलं नाही. उलट, नातं अजून घट्ट झालं.' हे दोघांनी मनाशी मान्य केलं होतं.

एकांशी ठरलेल्या ठिकाणी आली. तिच्या मनात धडधड सुरू होती. तिने स्वतः साधासा पण सुंदर असा निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. निळा रंग निखिलचा आवडता रंग असल्यामुळे तिने मुद्दामूनच त्या रंगाचा ड्रेस घातला होता. ती सतत घड्याळाकडे पाहत होती.

'तो यायला किती वेळ लागणार? सहा महिने थांबले; पण आता हा एकेक मिनिटही सहन होत नाही. कधी एकदा आपल्या या नजरेला त्याची झलक पाहायला मिळते.' या विचारांमध्ये तिची ती नजर सर्वत्र फिरत होती.

तेवढ्यात तिला दुरून तो दिसला. पांढऱ्या शर्टमध्ये, गळ्यात तीच चेन आणि चेहऱ्यावर हसरा भाव. तिचं हृदय जोरात धडधडलं.

ती अनावर होऊन ओरडली,
"निखिल!"

तो पळत तिच्याकडे आला आणि एक शब्द न बोलता तिला घट्ट मिठीत घेतलं. त्या मिठीत सहा महिन्यांचं अंतर विरघळून गेलं.

निखिल डोळ्यातून पाणी गाळत म्हणाला,
"एकांशी, मी तुझ्याशिवाय खरंच अपूर्ण होतो. रोज फोनवर बोलून भागत नव्हतं. आज मी तुला जवळ घेतोय यावरच विश्वास बसत नाही. माझे प्रेम आहे तुझ्यावर खूप."

तीही अश्रू पुसत म्हणाली,
"मलाही असंच वाटत होतं. कित्येकदा रात्री तुझ्याशी बोलता-बोलता झोप लागायची; पण सकाळी उठल्यावर तुला जवळ न बघून मन रिकामं वाटायचं."

दोघेही जवळच्या कॉफी शॉपमध्ये गेले. तिथे त्यांच्यासाठी जग थांबल्यासारखं वाटत होतं.

निखिलने तिला तिचा आवडता चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम आणला.

"हे खास तुझ्यासाठी. तुला हे किती आवडतं ना, मी विसरलोय असं वाटलं असेल तुला." तो तिची मस्करी करत म्हणाला.

एकांशी खळखळून हसली,
"सहा महिने झाले तरी अजून माझ्या छोट्या छोट्या सवयी तुला आठवतात, म्हणजे खरंच तू माझ्यावर खूप प्रेम करतोस."

क्रमशः
©एकता माने
0

🎭 Series Post

View all