जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025
अकस्मात भाग एक
“फक्त बीपी लो व्हायचं निमित्त झालं आणि आईची ऑक्सिजन लेवल कमी झाली. दोन दिवस तिला अकोल्याला इस्पितळात भरती केलं होतं, पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती म्हणून नागपूरला आणलं, दुपारी मी तिच्याशी बोलले आणि अर्ध्या तासातच…………” पुढचे शब्द रमाच्या ओठाबाहेर आलेच नाहीत तिच्या अश्रू आणि हुंदक्यांमध्ये ते विरून गेले.
आई गेल्यावर, तिचं दीवसकार्य करून दोनच दिवसापूर्वी रमा तिच्या घरी नागपूरला परतली होती. आजूबाजूच्या शेजारणी, नवऱ्याचे मित्र आणि त्यांच्या बायका, काही दूरचे नातेवाईक, सासरची काही मंडळी, रमाला भेटायला येत होती, आलेला प्रत्येक जण तोच जिव्हारी लागणारा प्रश्न रमाला विचारी की आशाताई अचानक गेल्याच कशा?
रमाला मग त्या चारपाच दिवसात ज्या घडामोडी झाल्या होत्या त्या परत परत आठवत आणि डोळ्यांचा बांध आपोआप फुटे. रमाच्या आईचं असं अकस्मात जाणं तिच्या फारच जिव्हारी लागलं होतं. सासरी परतल्यावर, नवरा ऑफिसमध्ये गेल्यानंतर, रमाला अनेक लहान मोठ्या घटनांमध्ये आईची प्रकर्षाने आठवण यायची आणि तिचे हृदय पिळवटून निघे.
आशाताईंना प्रत्येक काम अगदी चोख लागे. घिसाड घाई करून, कसंतरी थुक्याला थुकं लावून काम हाता वेगळे करणे हा त्यांचा पिंडच नव्हता. त्या नेहमी म्हणत, “माणसाने कुठलंही काम करावं तर अगदी व्यवस्थित करावं नाहीतर करूच नये.” म्हणूनच की काय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, स्वयंपाकवाली मावशी बाई आली नाही म्हणून, तीच्या आईने स्वतः सगळा पितरांचा स्वयंपाक केला, शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, वरण-भात, कढी, मूग डाळीचे वडे, तांदळाची खीर, पालकाची डाळ भाजी, भेंडीची मूगवड्या घालून केलेली भाजी, उडदाचे बोंड, आळुच्या पानाची वडी, एवढा सगळा त्यांनी साग्रसंगीत स्वयंपाकाचा घाट घातला, पण शुगर असल्याने त्या पार थकून गेल्या होत्या. सकाळचं पुष्कळ अन्न उरलेलं असल्याने रात्री निवांत, त्या घरा शेजारच्या मैत्रिणींशी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी कुणालाही असं वाटलं नव्हतं की आशाताईंची तब्येत इतकी खालावेल, पण ती दगदग आशाताईंना सहन झाली नाही. पहाटे तीन वाजता पासूनच त्यांना उलट्यांचा त्रास व्हायला लागला. रमाच्या वडिलांनी त्यांना सकाळी लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि स्वतःच्या इस्पितळात भरती करून घेतलं. दोन दिवस इस्पितळ ठेवूनही रमाच्या आईच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा होत नव्हती म्हणून मग डॉक्टरांनी तिथल्याच एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आशाताईंना हलवण्याचा सल्ला रमाच्या बाबांना दिला. रमाच्या बाबांनीही जास्त वेळ न दवडता लगेच आशाताईंना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा