Login

अकस्मात भाग दोन

अकस्मात आईच्या जाण्याने होणाऱ्या भावनिक वेदना
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

अकस्मात भाग दोन

रमाच्या वडिलांनी रमाला, आशाताईंना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचं कळवल्यानंतर, ती लगेचच माहेरी जायला निघाली होती. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर तिच्या डॉक्टर असलेल्या चुलत भावाचा फोन आल्यावर रमा परत माघारी फिरली.

“रमा तू अकोल्याला यायची घाई करू नको. काकूंच्या तब्येतीत पाहिजे तशी सुधारणा होत नसल्यामुळे मी आणि काकांनी, काकूंना नागपूरला आणण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता थोड्या वेळातच निघत आहोत. पाच ते सहा तासात नागपूरला पोहोचू, तू अकोल्याला येशील आणि मग परत आमच्याबरोबर नागपूरला, उगीच कशाला दगदग करतेस! होईल सगळं ठीक देवावर विश्वास ठेव!” रमाला पण तिच्या चुलत भावाचं म्हणणं पटलं होतं. आईला नाही तरी नागपूरला आणणार आहे तर आपण घरी परतताना, तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये घालण्याकरिता दोन गाऊन घ्यावे आणि बाबांकरिता स्वयंपाक करून ठेवावा या विचाराने ती घराकडे परतली.

संध्याकाळी आशाताईंना नागपूरच्या एका सुप्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रमा नवऱ्याबरोबर वडिलांकरिता डबा घेऊन इस्पितळात पोहोचली. रामाचे बाबा आयसीयूच्या बाहेर सचिंन्त बसलेले होते. आशाताईंची ऑक्सिजनची पातळी फारच कमी झाली असल्यामुळे त्यांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेलं होतं. त्यांचं बीपी ही अगदी 32 वर आलं होतं.

इस्पितळातली रुग्णांना भेटण्याची वेळ केव्हाच संपली होती पण तरीही स्वतःच्या आईची ती अवस्था बघून, रमा कुणाचीही तमा न बाळगता सरळ आईजवळ गेली. रमाच्या आईने तिचा हात हाती घेतला. हातानेच पाठ दुखते आहे असं खुणावले. रमाने मग हलकेच आईची पाठ दाबून दिली आणि थोड्या वेळ आईचे पायही दाबले.

तिच्या आईने रमाच्या डोक्यावरून हात फिरवला. थोड्यावेळ आईजवळ बसून रमा आयसीयूतून बाहेर आली. पण तेवढ्यात आत मध्ये काहीतरी गडबड झाली. नर्सेसने डॉक्टरांना बोलावलं. आणि आशाताईंना सीपीआर देणं सुरू केलं. डॉक्टरही धावत आले. पाच-दहा मिनिटं डॉक्टरांनी आत मध्ये काय प्रयत्न केले कोणास ठाऊक पण आता सगळं संपलं होतं. रमाच्या आईला तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन ती देवाच्या घरी गेली होती. आयसीयूतून बाहेर येऊन डॉक्टरांनी आई गेल्याच सांगितल्याबरोबर रमाने जोरात हंबरडा फोडला आणि ती धावतच आई जवळ गेली. आईला त्या तशा अवस्थेत बघून रमाला चक्कर आली आणि ती तिथेच खाली कोसळली. आई गेल्याचा धक्का रमाला सहन झाला नव्हता. ती बेशुद्ध झाली होती. दहा मिनिटांपूर्वी ज्या आईने आपल्या डोक्यावरून हात फिरवला तिचा देह आता निश्चल झाला आहे हे मान्य करणं रमाला शक्यच नव्हतं.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.