Login

अकस्मात अंतिम भाग

अकस्मात आईच्या जाण्याने होणाऱ्या भावनिक वेदना
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

अकस्मात अंतिम भाग


आपली आई आपल्याला अचानक सोडून गेल्याचे दुःख तर रमाला होतच, पण आईचं अकस्मात निधन होणं ही गोष्ट तिचं मन आणि बुद्धी स्वीकारू शकत नव्हती. तेरा दिवस माहेरी पाहुण्या-राहुण्यांमध्ये तिला थोडा तरी दुःखाचा विसर पडायचा पण आता सासरी परत आल्यानंतर मात्र तिला आईची अतिशय तीव्रतेने आठवण येई आणि ती एकटीच हुंदके देत बसे.

आयुष्यातल्या अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी, छोट्या-मोठ्या अडचणीं करिता रमाला आईचाच आधार होता. तिचा मुलगा लहानपणी सतत सर्दीने आजारी असायचा, तेव्हा आशाताई रमाला डॉक्टरांच्या औषधांबरोबरच अनेक घरगुती उपायही सांगायच्या.

कधी त्या म्हणायच्या की जायफळ उगाळून त्याच्या डोक्याला लेप लाव, तर कधी दुधातून हळद द्यायला सांगायच्या. खूप जास्त कफ झाला असेल तर गरम कपड्याने त्याची छाती शेकायला सांगायच्या. तर कधी लसूण पाकळ्यांची माळ त्याच्या गळ्यात घालायला सांगायच्या.

घरातही एखादा सण असला की रमा आईला विचारी, “आई जीवतीची पूजा कशी मांडू ग?” किंवा मग दिवाळीच्या आठवीच्या पूजेत काय काय ठेवायचं आहे?, देवीच्या फुलोऱ्याच्या करंज्यांच्या पारीकरिता मैदा भिजवू कि रवा? मार्गशीर्षातल्या लक्ष्मीची पूजा करतांना पूजेची मांडणी कशी करू? देवीच्या ओटीत कुठल्या कुठल्या वस्तू ठेवू? अशा एक ना अनेक लहान मोठ्या गोष्टी रमा तिच्या आईलाच विचारे! इतके दिवस तिची आई तिचा मायेचा आधार होती. आई गेल्यानंतर रमाला जणू पोरकं झाल्यासारखंच वाटते. आई असताना अनेक लहान मोठ्या गोष्टींकरिता ती आशाताईंकडे अगदी हक्काने आता आपले हट्ट कोण पुरे करणार या विचारानेच तिचा जीव कासावीस होई.

दिवाळी तोंडावर आली होती. तिच्या आजूबाजूला राहणाऱ्या शेजारच्या बायका घराची साफसफाई करीत होत्या, कुणी डब्बे घासत होत्या तर कुणी भांड्यांच्या रॅक धुवत होत्या. कुणी अंथरुण पांघरुण धुवत होत्या तर कुणी दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागल्या होत्या.

दिवाळी आली की रमालाही माहेरची ओढ लागे. ती आईला हट्टाने खोबरा कीसाच्या करंज्या, बेसन लाडू आणि पोह्यांचा कुरकुरीत चिवडा, मसाला शेव, भाजणीच्या चकल्या असं सारं बनवायला लावे. लाडाच्या लेकीसाठी आशाताई सगळं हौसेने स्वतः सगळं करत किंवा कामवाल्या मावशी बाईंकडून करून घेत. दिवाळीच्या पंधरा-वीस दिवस आधीच रमाचे बाबा तिचं अकोल्याचा रिझर्वेशन करून ठेवत.

सासरी परतताना रमाची आई तिला भरपूर फराळाच तर दिईच पण अकोल्याची प्रसिद्ध गांधीग्रामची चिक्की, नांदुऱ्याचा खवा, आणि इतर अनेक वस्तूही खास रमासाठी आणून ठेवे.

उन्हाळ्याच्या वाळवणाच्या मूगवड्या, सांडगे, कुरडया, सांडल्या, ज्वारीचे, नागलीचे, बटाट्याचे पापड, चिप्स, भगरीच्या चकल्या अनेक पदार्थांची बेगमी आशाताई रमासाठी करून ठेवायच्या.

दिवसभरातून मायलेकींचं एकदा तरी बोलणं व्हायचं. पण आता आई गेल्यानंतर, नवरा त्याच्या व्यापात गुंतलेला, मुलगा त्याच्या शाळेत. उभा दिवस रमाच्या अंगावर यायचा. कितीतरी वेळा ती तिच्या आईला फोन कराण्यासाठी मोबाईल हातात घेई पण आता आई फोन उचलणार नाही तिचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही या विचारानेच रमा उदास होई.

नवरा आणि मुलगा घरी असताना ती मोठ्या कष्टाने स्वतःच्या दुःखाला आवर घाले परंतु एकट्या घरात आईच्या अनेक जुन्या आठवणी तिच्या मनात पिंगा घालत.

स्वतःला आवरता आवरता तिला तिच्या बाबांची प्रकर्षाने आठवण येई तेव्हा परत ती स्वतःला हतबल समजे.

प्रेमाची मनोवस्था तिच्या नवऱ्यापासून लपलेली नव्हती. त्याने तिला अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण जवळची व्यक्ती गेल्यानंतर केवळ वेळ हेच सर्वोत्तम औषध असतं हे त्याला माहिती होतं.

एखाद महिन्यानंतर रमा परत एकदा माहेरी गेली. आईच्या आठवणी चारही बाजूंनी तिच्या भोवती नाचू लागल्या. पण त्याचवेळी तिला तिचे वडील समोर दिसले. वडिलांना बघून मग रमाने स्वतःला सावरले, वडिलांनीही आईच्या ममतेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“बाळा, आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही.” वडिलांचे हे शब्द ऐकून बापलेकीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हाता रमा आणि तिचे वडील बऱ्यापैकी सावरले आहेत. रमा तिच्या वडिलांना घेऊन आपल्या घरी परतली आहे. आईच्या अकस्मात जाण्याने रमाला धक्का तर बसला होता, पण आता ती हळूहळू सावरली आहे.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.