Login

सासूबाई म्हणतील तसं... भाग ३ (अंतिम भाग)

अजूनही घरामध्ये सुनेला सासूबाईंच्या म्हणण्यानुसार वागावे लागते...
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

जलद कथा

सासूबाई म्हणतील तसं... भाग ३ (अंतिम भाग)

©® एकता माने

“माझ्या काळात असंच चालायचं. मी जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा मलाही माझ्या सासूबाई सांगतील तसंच वागायला लागत होते; पण खरं सांगू? मलाही कधी कधी वाटायचं की मला कुणी विचारावं; पण तेव्हाच्या काळात बोलायची हिंमत नव्हती. म्हणून कदाचित मीही तुला आणि तुझ्या बायकोला जुन्या पद्धतीनेच वागवलं.”

सासूबाईंच्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या जुन्या आठवणी जग्या झाल्या आणि जे आपल्या सासूने आपल्या सोबत केले आपण तसेच आपल्या सुनेसोबत करत आहोत याची त्यांना जाणीव होऊ लागली.

असंच जर चालत राहिलं तर आपल्या घरात येणारी कोणतीही सून सुखाने, समाधानाने या घरात नांदणार नाही. तिला नेहमी घराच्या जुन्या रूढी, परंपरेनुसारच वागावे लागणार. स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य तिला कधीच मिळणार नाही आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागले. जे आपल्यासोबत घडले ते आपण आपल्या सुनेसोबत का करावे, याचीही त्यांना जाणीव झाली.

त्या दिवसापासून घरात हळूहळू बदल होऊ लागला. अन्वीला, तिच्या मताला घरात स्थान मिळू लागलं. तिने पाव-भाजीही केली, जी सगळ्यांनी आवडीने खाल्ली.

दिवाळीतल्या सजावटीत तिने नवे रंग आणले. दिवाळीमध्ये घराच्या जुन्या परंपरेसोबतच अन्वीचे नवीन विचारही ग्राह्य धरण्यात आले. अन्वीने आपल्या प्रेमाने आणि आपल्या आवडीनुसार आपले घर सजवले. घरातल्या सगळ्या माणसांसोबत आनंदाने दिवाळीचा सण साजरा केला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अमेयलाही छान वाटले. आपली बायको आपल्यासोबत आपल्या या घरात सुखाने राहत आहे याचा अनुभव त्याला येत होता.

काही दिवसांनी अचानक तिच्या सासूबाईंना थोडा त्रास होऊ लागला. तेव्हा अन्वीने आपली सगळी कामे बाजूला ठेवून ऑफिसला सुट्टी घेतली आणि सासुबाईंच्या आरोग्याची काळजी  घेतली. डॉक्टरांना दाखवायलाही स्वतः नेलं. आपल्या आईप्रमाणे ती सासूबाईंची काळजी घेत होती आणि तिची ती काळजी सासूबाईंनाही समजत होती.


सासूबाईंच्या मनातही प्रेम उगवू लागलेलं.

त्या म्हणाल्या,
“अन्वी, तुझ्या डोक्यात नवीन कल्पना आहेत. घराला त्याची गरज आहे. मी तुला अडवायचा प्रयत्न केला; पण खरं सांगायचं तर तू आमच्या या घराला नवीन श्वास दिलास. मी या घराची सून म्हणून तुला या घरात घेऊन आले; पण तू कधी माझ्या मनामध्ये आणि या घरामध्ये लेकीचे स्थान मिळवले ते आम्हालाही समजले नाही.”


एका संध्याकाळी घरात छोटा समारंभ होता. नातेवाईक आले होते. सगळे गप्पा मारत बसलेले.

त्यात कुणीतरी विचारलं,
“काय हो वहिनी, घरात सगळं नीट चाललं ना? नव्या सुनेशी जुळवून घ्यायला त्रास झाला का?”

सासूबाई हसून म्हणाल्या,
“अगं, त्रास कसला? सुरुवातीला वाटलं, ‘सगळं माझ्या म्हणण्यानुसार झालं पाहिजे.’ पण आता कळलं की घर हे फक्त सासूबाई म्हणतील तसं चालत नाही. घर चालतं सगळ्यांच्या मतांनी, प्रेमाने आणि समजुतीने! आमच्या घराला आता अन्वीमुळे नवा रंग आला आहे आणि मी तिचा अभिमानाने तसा उल्लेख करते.”

हे ऐकून अन्वीच्या डोळ्यात अश्रू दाटले; पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. ते समाधानाचे, आनंदाचे अश्रू होते.


'सासूबाई म्हणतील तसं...'  या एका वाक्यामुळे कित्येक संसारांमध्ये दडपण, अश्रू आणि नाराजी निर्माण होते; पण जेव्हा सासूबाई स्वतः सुनेचं मत ऐकतात, तिला स्वीकारतात, तेव्हा त्या घरात खरं सुख, खरं ऐक्य निर्माण होतं. प्रत्येक मुलगी जेव्हा स्वतः नवीन लग्न करून दुसऱ्या घरी येते आणि त्या घराच्या रूढी, परंपरा जपायला सुरुवात करते तेव्हा तिच्या मतालाही तेवढीच किंमत असते हे जर त्या घरात असलेल्या सासूबाईंना समजले तर कोणत्याही घरात सासू-सुनेचे तंटा होणार नाही. नवऱ्याने आपल्या बायकोची बाजू घेणे यामध्ये काहीही वाईट नाही.

जेव्हा एखादी मुलगी आपलं घर, आपली माणसं सोडून लग्न करून नवीन घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ज्या प्रकारे नवीन घराला आपलंसं करून घेणे ही तिची जबाबदारी असते त्याचप्रमाणे त्या घरातील सगळ्या माणसांनाही तिला आपलंसं करून घेऊन ते घरही तिचं आहे हे दाखवून देणे ही सगळ्यांची जबाबदारी असते आणि जेव्हा सगळ्या घरांमध्ये असे घडेल तेव्हा प्रत्येक सुनेला आपल्या सासरी राहायलाही तितकाच आनंद वाटेल जितका तिला माहेरी राहायला वाटतो.

अमेयने आपल्या बायकोच्या इच्छा, तिचा त्रास समजून घेतला आणि त्यानुसार आपल्या आईला न दुखावता समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आज त्याच्या त्या घरात त्याची आई आणि त्याची बायको दोघीही सुखात नांदत आहेत.

आता अन्वी अगदी प्रेमाने बोलते,
“सासुबाई म्हणतील तसं!”

समाप्त.
©एकता माने ( संघ कामिनी)
0

🎭 Series Post

View all