Login

अनुत्तरित प्रश्न... भाग १

प्रेम कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - अनुत्तरित प्रश्न
भाग: १




सुनिता सारखी आत-बाहेर येरझाऱ्या मारत होती. ती पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होती. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. नेहमी दिवेलागणीच्या आत घरी येणारा संतोष अजुनही आला नाही म्हणून तिचा जीव वर-खाली होत होता.
' कुठे गेले असतील हे? सकाळी कामावर जाताना काही सांगून पण गेले नाहीत.'

एरवी ६.३० पर्यंत घरी येऊन आठ ते साडेआठच्या आत जेवण करणे हा संतोषचा नित्यक्रम. त्यामुळे ती जास्तच बेचैन होती.

'आज असे अचानक काय झाले असेल? स्कूटर तर घेऊन गेलेत, मग इतक्यात यायला पाहिजे होते.'

तिचा जीव कासावीस झाला होता. परत एकदा अंगणात जाऊन दूरवर स्कूटर दिसते का, ते तिने पाहिले, पण नाही.
ती आत घरात जाण्यासाठी वळतच होती, तोच संतोषची स्कूटर घरासमोर येऊन थांबली. त्याला बघून तिचा जीव एकदाचा भांड्यात पडला. इतक्यात तिला तिच्या आईने सांगितलेल्या एका गोष्टीची आठवण झाली.
'नवरा थकून भागून घरी आला तर वाटेवर त्याला काही विचारू नये, भले त्याची चूक असू दे.'
तसे तिने त्याच्याकडून जेवणाच्या डब्याची बॅग घेतली व घरात निघून गेली. संतोष बूट काढून आत येऊन सोफ्यावर बसला. ती त्याच्यासाठी पाणी घेऊन आली.
"घ्या."
तिच्या हातातला पेला घेऊन संतोषने एका घोटात पाणी पिऊन टाकले.
"आज फार उशीर केलात यायला? नाही म्हटले जाताना सांगून पण नाही गेलात उशीर होईल म्हणून." सुनिताने दबक्या आवाजात विचारले.
"होतं एक महत्त्वाचे काम. बरं, मला एक सांग कविता कुठे आहे ?"
"आहे ती आपल्या खोलीत. का? काय झाले? बोलावू का तिला ?" ती उत्तरली.
"नाही नको. तिला सांग येत्या रविवारी संध्याकाळी कुठे जायचा बेत करू नको, तो माझा कामावरचा मित्र रमेश आहे ना, तो येणार आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत कविताला बघायला." संतोषने एका दमात सांगून टाकले.
"'अहो पण कविताला विचारूया ना आधी, ती इतक्या लवकर लग्नाला तयार आहे का ? नाही म्हटले तर अजून तिचे शिक्षण पण पूर्ण झालेले नाही."
"मी सांगितले ना एकदा? मग झाले, मला या विषयावर आणखी काहीही चर्चा करायची नाही." संतोष संतापत बोलला आणि रागाने आत निघून गेला.
त्यांचे हे सगळे संभाषण कविता दारामागून ऐकत होती. पण तिला तिच्या बाबांचा राग माहीत होता, म्हणून तिने पुढे येऊन बोलण्याचे धाडस केले नाही.

"आई मला इतक्यात लग्न करायचे नाही गं." कविता म्हणाली.
"अss?" सुनिता एकदम तंद्रीतून बाहेर आली.
तिला कविताला काय उत्तर द्यायचे तेच कळत नव्हते.
"काय म्हणालीस ?" सुनिताने पुन्हा प्रश्न केला.

"आई, तू सांग ना गं बाबांना, मला एवढ्यात लग्न करायचे नाही. आधी माझे शिक्षण तरी पूर्ण होऊ दे." कविता चिडत म्हणाली.

"तुला तुझ्या बाबांचा राग माहीत आहे ना, ते तुला आणि मला दोघींनाही फाडून खातील. त्यांना नाही म्हणण्याची हिंमत माझ्यात तरी नाही." सुनिता समजावण्याच्या स्वरात म्हणाली.
"अगं पण...."
"तुला सांगितले ना एकदा. बाबांनी एकदा निर्णय घेतला, तर ते तो कधीच बदलत नाहीत." असे म्हणत सुनिता स्वयंपाकघरात निघून गेली.

रात्रीचे जेवण झाले. भांडी पण घासून झाली. पण, सुनिताच्या मनात मात्र तोच विचार घोळत होता.

'कविता म्हणत आहे तर विचारावे का यांना? हो. मुलीचे आधी शिक्षण होऊ द्या.' तिने मोठे धाडस करून संतोषला विचारायचे ठरवले.

"अहो, ऐकताय ना." सुनिताने पलंगावर झोपल्या झोपल्या संतोषला विचारले.
" काय झाले?" संतोषने मोठ्या आवाजातच म्हटले.
"अहो, पोरगी म्हणत होती की, तिला इतक्यात लग्न करायचे नाही." सुनीताने जरा अडखळतच सांगितले.
हे ऐकून संतोष ताडकन उठून पलंगावर बसला.

" फक्त शिकून ती काय कुठे दिवे लावणार आहे? पोरानांच सांभाळायचे आहे ना तिला? पुन्हा असे चांगले स्थळ मिळणार नाही. आणि मी पण बापच आहे तिचा, मला पण काळजी आहे तिच्या बऱ्या-वाईटाची ." संतोष तावातावाने बोलला.
"अहो पण..." सुनिताने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला.
"मला या विषयावर आणखी काहीएक बोलायची इच्छा नाही, माझा निर्णय झाला आहे. रविवारी रमेशचे कुटुंबीय कविताला बघायला येणार आहेत आणि हो, त्या दिवशी मला काही एक तमाशा नको आहे. झोपा आता, मला पण सकाळी लवकर उठायचे आहे." असे म्हणून संतोष डाव्या कुशीवर वळून झोपी गेला.

सुनिताचे संतोषसमोर काहीही चालले नाही. निमूटपणे सर्व ऐकून घेण्या व्यतिरिक्त ती काहीएक करू शकली नाही. एका बाजूला पतीचा राग व हट्ट, तर दुसऱ्या बाजूला मुलीचे पुढचे आयुष्य. रात्रभर किती तरी वेळ ती विचार करत बसली. त्या विचारात तिला झोप कधी आली हे तिलाच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी बाबा कामावर गेलेत हे बघून कविताने प्रश्न केला.
"आई, विचारलेस का बाबांना ?"
"हो." सुनिता.
"मग काय म्हणाले ते?"
"काय म्हणणार, त्यांनी इतकी वर्षे आपण ठरविलेला निर्णय कधी फिरवला आहे काय?"
"म्हणजे ?" कविताने घाबरून विचारले.
"त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले की, रविवारी ती मंडळी तुला बघायला येणार आहेत व त्या दिवशी त्यांना काहीही गडबड नको." सुनिता चेहऱ्यावर काहीही भाव न आणता म्हणाली.
"पण आई..."
"तू ओळखतेस ना तुझ्या बाबांना, मला त्यांचा राग माहीत आहे. त्यांना पाहिजे ते झाले नाही तर ते तुला व मला दोघींनाही सोडून जाणार." हे ऐकून कविता क्षणभर स्तब्ध झाली.

रविवारी नवऱ्याकडची मंडळी बघायला येणार म्हणजे, एक दोन महिन्याच्या आत लग्न होणार. पण तिने इतकी वर्षे प्रमोदवर प्रेम केले होते त्याचे काय ?

क्रमश:
0

🎭 Series Post

View all