Login

अनुत्तरित प्रश्न... भाग :२

Love Story
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - अनुत्तरित प्रश्न
भाग: २


भाग:२

ती माध्यमिक शाळेत असल्यापासून प्रमोद तिला आवडायचा. तो पहिल्यापासूनच मनमिळाऊ, दणकट, सुस्वभावी असा होता. अगदी कुठलीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असाच तो होता.

कविताच्या वर्गात प्रसाद नावाचा मुलगा शिकत होता. तो सतत कविताच्या मागे मागे फिरायचा. आधी कविताने त्याचे फारसे मनावर घेतले नव्हते. पण एके दिवशी सायंकाळी वर्गात कुणी नाही ते पाहून त्याने चक्क कविताचा हात पकडला व तो तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करु लागला. इतक्यात मागून कुणीतरी त्याची मानगुटी पकडली. कविता मागे वळून बघते तर तो प्रमोद होता.

प्रमोदने प्रसादची मानगुट पकडताच त्यांच्यात बाचाबाची झाली. हीच संधी साधून तिने तिथून पळ काढला. पण ओळख-पाखळ नसताना प्रमोदचे कविताच्या मदतीला येणे तिला आवडले होते.

पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि नकळत कधी ती त्याच्या प्रेमात पडली, हे तिला कळलेच नाही.

मग एक दिवस कविताने प्रमोदला आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या, प्रमोदला पण कविता आवडत होती. त्यामुळे त्यानेही लगेच तिचे प्रेम स्वीकारले.

दोघांचे भेटणे, प्रेमाच्या आणाभाका घेणे चालूच होते. कविताने प्रमोदला सांगून पण टाकले होते की, ती लग्न करेन तर त्याच्याशीच. त्याच्याशिवाय ती कुणाबरोबरही लग्न करणार नाही. पण आज आई-बाबांनी असा लग्नाचा विषय काढला आणि कविताच्या पोटात गोळा आल्यागत झाला होता.


'आता पुढे कसे होणार?' हा एकच विचार तिच्या मनात घोळत होता. प्रमोदवर ती निस्सीम प्रेम करत होती. त्याच्याशिवाय ती कुणाचा विचार सुद्धा करू शकत नव्हती. पण, बाबांच्या हट्टापुढे करणार काय? त्याच्यासमोर बोलण्याचे धाडस करणारा माणूस तिला दिसत नव्हता. पण येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचे असे तिने ठरविले.

रविवार उजाडला. तिच्या बाबांच्या मित्राचे कुटुंबीय आले. बघण्याचा कार्यक्रम झाला. लग्नाची बोलणी पण झाली आणि पुढच्याच महिन्यात लग्नाचा मुहूर्त सुद्धा नक्की करण्यात आला.
पण कविताच्या मनाला यातील काहीच गोड लागत नव्हते. तिचे त्याकडे लक्षच नव्हते. तिच्या डोक्यात फक्त प्रमोदचा विषय होता. आता पुढे कसे?

सुनिताला पण मुलगा आवडला होता. सगळी बोलणी झाल्यावर नवरदेवाच्या मंडळींना सोडण्यासाठी संतोष बाजारापर्यंत गेला होता. हीच संधी साधत कविताने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

"आई मी प्रमिलाच्या घरी जाऊन येते गं, बघून येते तिची लग्नाची तयारी कुठवर आली आहे व तिची शिवण पण बघून येते."कविताने आईला उद्देशून म्हटले.

आता कविताचे लग्न पुढील महिन्यात व प्रमिलाचे लग्न पुढील आठ दिवसांत म्हणजे आपल्या मुलीला लग्नाची तयारी कशी करायची, ते पण समजेल म्हणून सुनिताने जाण्यास होकार दिला.
'प्रमिलाच्या घरी जाते' असे निमित्त करून कविता थेट पिंपळाच्या झाडाखाली पोहोचली. जे तिचे व प्रमोदचे भेटण्याचे ठिकाण होते.

भेटण्याचे आधीच ठरल्यामुळे प्रमोद आधीच तिथे पोहोचला होता. प्रमोदला पाहताच कविताला भावना अनावर झाल्या नाहीत. तिने धावत जात प्रमोदला मिठी मारली. कितीतरी वेळ त्याला घट्ट धरुन ती रडतच होती. प्रमोदला नक्की काय झाले ते समजत नव्हते.

"आज तुला पाहायला आले होते ना?" खूप वेळाने अगदी न राहून प्रमोदने प्रश्न केला. तशी कविता आणखीनच रडायला लागली.
"काय झाले गं? फार सुंदर दिसतो का गं तो ?"प्रमोदने थट्टा करत विचारले.
"प्लीज, मस्करी करु नकोस रे. तुला माझे मन कळणारच नाही. चल जा." कविता रडत म्हणाली.
"ए वेडे, मी पण तुझ्याशिवाय जगू शकणार नाही गं आणि लक्षात ठेव, ज्यादिवशी तुझे लग्न असेल तो दिवस... म... मा... माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल." असे म्हणत प्रमोदने पण आपले डोळे पुसले. एवढा वेळ अडवून ठेवलेला भावनांचा बांध आता फुटला होता. खूप वेळ ती दोघंही एकमेकांना मिठीत घेऊन रडली.

"आता पुढे कसे होणार गं कविता?" आपले डोळे पुसत शांतता भंग करण्याचा प्रमोदने प्रयत्न केला.

"तोच तर विचार करून करून माझे डोके फुटायची वेळ आली आहे. मागच्या महिन्यात देवळात बाबांचे आणि तुझे भांडण झाले. त्यामुळे आणखी घोळ झाला."

"अगं पण त्यात माझी काय चूक होती, मी खरे तेच बोललो होतो." प्रमोदने आपली बाजू मांडली.

"चुक तुझी नव्हतीच रे. ते मलाही माहीत आहे. मी तुला ओळखते व माझ्या बाबांना पण..."

"आपण पळून लग्न करूया का?" प्रमोदने प्रस्ताव मांडला.

"प्रमोद, माझे निस्सीम प्रेम आहे रे तुझ्यावर मी तुझ्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहे, पण... आई- बाबांची मी एकुलती एक मुलगी आहे. आपण पळून गेलो तर ते जगाला काय तोंड दाखवतील. बाबा तर माझ्या आईला जिवंत सोडणार नाहीत." कविता बोलत होती.
"अगं मग आता करायचे तरी काय?' प्रमोदने उद्विग्न होऊन विचारले.
"तेच तर कळत नाही." कविता उत्तरली.
"तू काहीही कर कविता, पण मी पुन्हा एकदा सांगतो. तुझे लग्न अन्य कुणाबरोबर झाले तर तुझ्या लग्नाचा दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल." असे म्हणून प्रमोद ताडकन तिथून निघून गेला.

कविता एकटक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. अगदी तो दृष्टिआड होईपर्यंत.

लग्न अगदी महिन्यावर येऊन ठाकले होते, पण कविताच्या मनाची मात्र घालमेल चालूच होती.

"आई मला हे लग्न करायचे नाही." कविताने धाडस करत आईशी बोलण्याचा प्रयत्न केला.

"अगं हळू बोल. तुझे बाबा बाहेर बसले आहेत. त्यांनी हे ऐकले तर जिवंत ठेवणार नाही ते तुला आणि मलाही." सुनिता कविताला समजावत म्हणाली.

"अगं पण..."

" लग्न पुढच्या महिन्यात आहे, सगळी तयारी सुद्धा झाली आहे आणि हे कसले नसते खूळ आले आहे तुझ्या डोक्यात."
"आई माझे दुसऱ्या एका मुलावर प्रेम आहे." कविताने आढेवेढे घेत सांगितले.
"अगं हे काय बोलतेस तू?" सुनिताला धक्काच बसला.

"खरे तेच सांगते मी आई आणि तुम्ही बळजबरीने माझे लग्न दुसऱ्या कुणाबरोबर लावून दिले तर मी त्याच्यासोबत आयुष्यभर सुखी राहू शकणार नाही." कविता आता न घाबरता बोलत होती.

"अगं मुलीच्या जातीला तडजोड करत जगावेच लागते. सगळेच आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही." सुनिता बोलत होती.
" पण आई..."
"मी कशी तडजोड करत जगते, तसे तुलाही जगावे लागेल. स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी.".
"अगं पण आई मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही." कविता उत्तरली.
" हे फक्त तरुणपणातील खूळ आहे. पण कोण आहे तो ?" सुनिताने प्रश्न केला.
"वरच्या वाड्यावरचा प्रमोद. त्याच्यावरच प्रेम करते मी."
'अगं तो? त्याच्याबरोबर तुझ्या बाबांचा मागच्या महिन्यात देवळात काहीतरी वाद झाला होता, तोच ना प्रमोद ?"
'हो आई. तोच.' कविता उत्तरली.