राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
संघ :- मुंबई
विषय : - .... कौंटुबिक
शीर्षक : - अन् ती हसली ..... भाग - २
" अगं आई, आम्ही मुलांना घेऊन जातोय. खूप दिवस त्यांनाही कुठे नेले नव्हते म्हणून या वेळेला .. " वैभवी आईला मध्येच थांबवत बोलली.
" हो का? हे बरं केलंस …
मग आता कसलं टेंशन आलंय तुला? ", त्यांनी प्रश्नार्थक नजरेने तिला विचारले.
" आई तुला … ", वैभवी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण पुढे बोलण्यासाठी तिची जीभ रेटत नव्हती.
" अगं बोलं … मला काय? …. मला नेता येत नाही, हेच नं तुला सांगायचेय? .. ..", हनुवटी वर उजव्या हाताची मुठ ठेवून ती वैभवीच्या उत्तराची वाट बघत राहिली.
वैभवीच्या डोळ्यात नकळत पाणी तरळले. तशी ती आईच्या बाबतीत हळवी होती. आईला कशाचे वाईट वाटू नये. अशी तिची किमान इच्छा तरी असायची.
" आई …. प्लिज, मला तू चुकीची समजू नकोस गं. कधी कधी माझाही समीर पुढे नाईलाज होतो. प्रत्येक वेळी तुला बरोबर घेऊन जाण्याची गरज त्याला वाटत नाही.", वैभवीने तिची मजबुरी सांगितली.
" त्याला काय वाटते ते महत्वाचे नाही … तुला काय वाटते ते महत्वाचे आहे माझ्यासाठी. तुला वाटते नं, आईला सुद्धा बाहेर फिरायला घेऊन जायला हवं. तेवढंच बसं झालं मला.",
आई बद्दल एवढं तरी वाटतयं ऐकून त्यांनी समाधानाने म्हंटले.
आई बद्दल एवढं तरी वाटतयं ऐकून त्यांनी समाधानाने म्हंटले.
" मला नुसतं वाटून काय फायदा? त्याला तिकडून त्याच्या आईबाबांकडे जायचे आहे. आठ दिवस त्यांच्याकडे राहणार आहोत. मग तुला कसे नेणार बरोबर? मुलांना नाताळची सुट्टी आहे तर, त्या आजी आजोबांना सुद्धा भेटवून आणूया म्हणतोय.", वैभवीने समीरचे मत आईसमोर मांडले.
" अगं बरोबरचं आहे त्याचे. तू तुझ्या सासू सासऱ्याकडे जाणार, मग माझी लुडबुड कशाला हवी मध्ये? तुम्ही खुशाल जा. मी राहील एकटी. मी घेईन माझी काळजी … जेवण करायला रखमा आहेचं …. नी भांडीकुंडी करायला ज्योती. मला काय मेलीला खायचं आणि झोपायचं.
पंधरा दिवस कसे जातील कळणार सुद्धा नाही आणि माझा छान आरामही होईल. तसेही गुढघे अलिकडे फारच कुरकुर करायला लागलेत. आराम केल्यावर जरा गप्प तरी बसतील.", वत्सलाबाईंनी ठामपणे सांगितले.
" तू म्हणतेस ते पटतयं मला आई … पण तो तुला इथे एकटीला ठेवायला नको म्हणतोय.", वैभवी मुद्द्याचे बोलून गेली.
" हं … आलं लक्षात माझ्या …. थोडक्यात माझी जाण्याची वेळ झाली … ", वत्सलाबाई खालच्या आवाजात स्वतःशीच पुटपुटल्या.
" आई, समीरचे असे म्हणणे आहे की, मुलं आता मोठी झालीत. त्यांना पाळणाघरात ठेवून आम्ही ऑफिसला जाऊ शकतो .... त्यामुळे उगाच तुला इथे अडकून ठेवायला नको. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तू आता तुझ्यासाठी जगावं, असे मलाही वाटते. तुझ्या मनाला येईल ते तू करावं. ", वैभवी कशीबशी बोलून गेली.
" अगं मुलं पाळणाघरात गेल्यानंतर, कशातही न अडकता, इथे राहून करता येईल की, मला जे माझ्यासाठी करायचे आहे ते. त्यासाठी दुसरीकडे कशाला जायला हवयं? नाहीतरी लळा लागला आहे मला मुलांचा. सकाळ संध्याकाळ त्यांच्यात वेळही चांगला जाईल माझा.", मनात मुलीकडे राहण्याची इच्छा नसतानाही, ती काय उत्तर देते, हे जाणून घेण्यासाठी वत्सलाबाईनी तिचे मत बोलून दाखवले.
" आई मला आवडेल, तू इथे कायमची राहिली तरी? पण …", बोलता बोलता वैभवी मध्येच थांबली
वैभवीला, आईला नाराज न करता, कसे समजावे ते कळत नव्हते. ती स्वतःच्याचं विचारात गुंग झाली होती.
तिची आई, त्यांच्या घरातचं राहत असल्यामुळे, चार दिवसांसाठी जरी, समीर आणि तिला कुठे बाहेर जायचे असले तरी त्या दोघांमध्ये वाद होत होते.
तिचं म्हणणे असायचे, आईची एवढी आपल्याला मदत होते तर, चार दिवस तिलाही कुठे बाहेर नेले तर कुठे बिघडले? नाहीतरी लवकुश कडे लक्ष ठेवायला तिची मदतचं होते. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर, त्या दोघांना निवांत वेळही घालवता येतो.
तर समीरला वाटायचे आईला प्रत्येक वेळी कशाला सोबत नेले पाहिजे. नवरा बायकोला थोडी प्रायव्हसी नको का? मुलेही मोठी झालीत. पाळणाघरात आरामात राहतील. उगाच आईचं लोडणं घरात कशाला हवं आहे?
स्वतंत्र आयुष्य आता तरुणपणी नाही तर, म्हातरपणी जगायचे का?
स्वतंत्र आयुष्य आता तरुणपणी नाही तर, म्हातरपणी जगायचे का?
" अगं पण काय … ? पुढे काय बोलणार आहेस की नाही ? तुमच्या दोघांत माझ्या वरून भांडणं झाले का? ", वत्सलाबाईंनी तिला प्रश्न केला.
" हं. .. काय म्हणालीस ? ", आईने काहीतरी विचारल्याचा तिला भास झाला.
" तुमच्या दोघांत माझ्यावरून वाद झाला का? काय म्हणंणे आहे तुमच्या दोघांचे? ", वत्सलाबाईंनी पुन्हा विचारले.
" आता तू, त्याला इथे रहायला नकोय. तू नसलीस तर त्याचे आई बाबा अधूनमधून येऊन रहातील ", वैभवीने मान उडवत तिची नाराजी दर्शवली.
वत्सलाबाई, ज्या विषयाची सुरवात कशी करावी म्हणून विचार करत होत्या, तो विषय आपोआपच त्यांच्या समोर आला होता म्हणून मनातल्या मनात त्यांना हायसे वाटले होते.
" मग काय चुकीचे बोलला का तो? जशी तुझी आई तुला हवी आहे, तसे त्याला त्याचे आईवडील जवळ असावेत असे नाही वाटणार का? ", वत्सलाबाई समजूतीच्या सुरात तिला म्हणाल्या.
" अगं पण का कोण जाणे त्यांचं आणि माझं फारसं जमत नाही.", वैभवीने तिची समस्या बोलून दाखवली.
" जमतं नाही की, तू जमवून घेत नाही ?", वत्सलाबाईंनी मुलीच्या नेमके वर्मावरचं बोट ठेवले.
" तुला माहीत नाही आई. सासऱ्यांचा विशेष काही त्रास होत नाही, पण सासूबाई असल्या की नुसताचं डोक्याला शॉट असतो. ", वैभवी वैतागतं बोलली.
" अगं काय तुझी ही भाषा? कोणाविषयी बोलतेस याचं तरी जरा भान ठेवं. तुला कशाही वाटल्या तरी, तुझ्या सासूबाई आहेत त्या? तुझ्या नवऱ्याच्या आई आहेत त्या. नात्याचे, वयाचे थोडे तरी भान ठेव. नीट बोल जरा त्यांच्याविषयी. ", वत्सलाबाई चिडून बोलल्या.
" तुला त्या का नकोत आणि मी का रहायला हवी, हे मला चांगलेच ठाऊक आहे. हल्लीच्या मुली तुम्ही, जरा शिकल्या सवरल्या, चार पैसे जास्त कमवायला लागल्या की डोक्याला शिंग फुटल्यासारख्या वागत असता. …. अपवाद असतीलही ….. पण टक्केवारी काढली तर तुझ्या सारख्याचं जास्त भेटतील.
ऑफीसमध्ये दिवसभर राब राब राबालं .… ऐनवेळी आलेला कामाचा डोंगरही, कितीही त्रास झाला तरी, हसत हसत पार पाडाल. पण घरी मात्र आपल्या माणंसासाठी काही थोडफार करायची वेळ आली की, तुमच्या डोक्याला शॉट लागतो.", वत्सलाबाईंनी आज वेगळाच सूर लावला होता.
" आई तू बरी आहेस नं गं ? काही काय बोलतेस ? ", वैभवीने आश्चर्य व्यक्त केले.
" खरे तेच बोलतेय … या वयात ते दोघे, सून आणि मुलगा असूनसुद्धा एकटेच राहतात. मुलीचा तर प्रश्नचं येत नाही. तिच्या नवऱ्याबरोबर ती बाहेरगावी सेटल झाली आहे.
तुझ्या सासूबाईंना कंबर दुखीचा त्रास कायम असतो. डायबेटीसमुळे डोळ्याचे ऑपरेशन होऊनही नीटसे त्यांना दिसत नाही. सासऱ्यानांही बीपी दम्याच्या त्रास आहे. अशा अवस्थेतही त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे, याची तुम्हाला जाणीव का होत नाही?", वत्सलाबाईंनी, सरळ सरळ मुद्द्यालाच हात घातला.
आई, तिला सासू-सासऱ्यांवरून, असे काही बोलेल याची वैभवीला यत्किचिंतही शंका आली नव्हती. अचानक बदलेल्या आईच्या पवित्र्याने, तिला काही उत्तर द्यायला सुद्धा सुचत नव्हते.
तिचं डोकं सुन्न होेत चाललं होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा