Login

अस्तित्व - एक प्रवास भाग 1

अहो सासरेबुवा, आशीर्वाद द्या कि आम्हाला.. -- सावकार सरूला घेऊन त्यांच्या पुढ्यात उभा राहून क्रूर हसत म्हणाला..तिचे वडील भानावर आले.. सरू तिच्या भरल्या डोळ्यांनी मदतीची याचना करत होती.. पण सावकारापुढे कोणाचं काही चाललं नाही..

ए सरे, अग उठ कि आता.. सूर्य डोइवर आला बघ.. -- आई


उठतोय ग आये.. लय झ्याक सपान पडलेलं मला.. तुझ्यामुळे मोडलं बघ..  -- सरू 


हो तर, म्हणे सपान मोडलं.. चल उठ शेतावर जायचंय.. -- आई 


हो उठतो.. असं अंथरुणात पुटपुटत सरू उठली.. 


सरू, एक 15 -16 वर्षांची चुणचूणीत मुलगी.. दिसायला चार चौघीसारखीच.. पण वागायला, बोलायला मात्र तशी हुशार.. 


सरूच्या वडलांची छोटीशी शेतजमीन.. त्यात जे पिकेल त्यावरच त्यांच्या पोटापाण्याची सोय व्हायची.. 


सरूला एक लहान भाऊ आणि एक बहीण.. कमावणारे दोन हात आणि खाणारी तोंड चार.. असं असलं तरी आहे त्यात ते सगळे खुश होते..


पण एकदा पाऊसच पडला नाही आणि दुष्काळाचं संकट ओढवल.. सावकाराने त्याचा फायदा घेतला आणि गावातल्या लोकांना त्याच्या शेतात, घरात राबवू लागला.. त्यात सरूच कुटुंबही होतं.. सावकाराने काहींच्या जमिनी बळकावल्या.. 


सरूच्या वडलांनी खूप विरोध केला जमीन द्यायला.. सावकार तयार झाला पण त्याने काळीज पिळवटणारी एक अट घातली.. 

सरूशी लग्न करण्याची.. 


सरूच्या वडलांना काय कराव कळत नव्हतं.. जमीन दिली तर आयुष्यभर सावकाराकडे चाकरी करावी लागेल आणि नाही दिली तर पोटच्या लेकराला जन्माचा फास.. 


सरूच्या वडलांनी खूप विचार केला.. आणि सावकाराला जमीन दिली.. आता दिवसरात्र ते सावकाराच्या शेतात राबत होते.. 


एक दिवस सरूच्या भावाला ताप येत होता म्हणून तिच्या आईने तिच्या बहिणीला त्याच्याजवळ थांबायला सांगितलं.. सावकाराला ही गोष्ट कळली..


त्याने मुद्दामून सरूच्या वडलांना बाजूच्या गावात माल घेऊन पाठवलं.. आणि सरूची आई मध्ये येईल म्हणून तिलाही डांबून ठेवलं.. 


इकडे भट बोलावून त्याने लग्नाची तयारी सुरु केली.. सरूला जबरदस्ती लग्नाला उभ केल.. चाललेल्या प्रकारामुळे ती सुन्न झाली होती.. रडून रडून डोळे सुकले होते.. पण आज तिच्या मदतीला धावून येणार कोणीच नव्हत.. 


तिने आरडाओरड केली पण काहीच उपयोग झाला नाही.. इतक्यात तिचे वडील तिथे आले.. समोर चाललेला प्रकार बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.. 


अहो सासरेबुवा, आशीर्वाद द्या कि आम्हाला.. -- सावकार सरूला घेऊन त्यांच्या पुढ्यात उभा राहून क्रूर हसत म्हणाला..


तिचे वडील भानावर आले.. 


सरू तिच्या भरल्या डोळ्यांनी मदतीची याचना करत होती.. पण सावकारापुढे कोणाचं काही चाललं नाही.. 


सावकाराने त्याच्या माणसांना सांगून तिच्या वडलांनाही डांबून ठेवलं.. 


सरूला तो राबराब राबवायचा.. तिच्याकडे त्याच ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता.. तिने थोडा जरी विरोध केला तर आईवडलांच्या जीवाला धोका होता.. ती निमूटपणे सगळं सहन करत होती.. 


आणि इकडे तिचे भाऊ बहीण तरी या सगळ्यातून सुटावेत म्हणून तिचा मामा त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला.. एकदिवशी तिच्या भावाला तिची खूप आठवण येत होती.. तो कोणालाही न सांगता तिला भेटायला आला आणि त्याच्या मागोमाग तिची बहीणही आली.. दोन - तीन महिन्यानी ते एकमेकांना भेटले.. कोणालाच रडू आवरत नव्हत.. सरूने त्यांना सावकाराच्या भीतीने जायला सांगितलं.. 


तेवढ्यात तिथे सावकार आला आणि त्याने रागाने त्या दोघांनाही विहिरीत ढकलून दिल.. सरूच्या काळजाच पाणीपाणी झालं.. पण बिचारी काही करू शकली नाही.. 


तिच्या आईवडलांना हे कळलं.. आपल्या लेकरांची आपल्या हयातीत ही दशा व्हावी, हा धक्का न सहन होणारा होता त्यांना.. जेवणाखाण्याचे हाल आणि त्यात आपल्या तरुण मुलांची डोळ्यादेखत झालेली परवड या सगळ्यात एक दिवस तेही हे जग सोडून गेले.. 


आता सरू फक्त म्हणण्यासाठी जिवंत होती..


क्रमश :

0

🎭 Series Post

View all