अस्तित्व भाग 13

अस्तित्व मराठी कथा
अस्तित्व भाग 13

मागच्या भागात आपण वाचले माधवराव दिलीप रावांना फोन करून लग्नाची तारीख काढण्यासाठी बोलवतात आणि एकीकडे आकाश च्या निर्णयावर शंका उपस्थित करतात. आता पुढे

माधवरावांनी शंका उपस्थित केल्यावर आकाश त्यांना समजावत म्हणाला,
“ नाही हो बाबा, तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त लग्नाची लवकरात लवकर तारीख काढा; म्हणजे सगळं वेळेत होईल.”

“ठीक आहे, सगळे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल.उशीर झाला आहे,जा जाऊन झोप.मीही जातो झोपायला.”

एवढे बोलून माधवराव झोपायला गेले. आकाशही त्याच्या रूममध्ये जायला निघाला. जाता जाता त्याच्या मनात एक विचार येऊन गेला,
‘मनालीला कॉल लावू का? नको उशीर झालाय झोपली असेल. उद्या ऑफिसला जाण्याच्या आधी बोलतो.’
****
दुसऱ्या दिवशी सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने आणि खिडकीतून येणाऱ्या मंद सूर्यप्रकाशाने मनालीचे डोळे उघडले. समोर बघितले तर कांचन ताई तिच्या खिडक्यांचे पडदे बाजूला सरकवत होत्या.
मनु ने जागेवरच दोन-तीन आळोखे-पिळोखे दिले आणि पुढच्या क्षणी उशी तोंडावर घेऊन आईला म्हणाली,
“आई कशाला पडदे बाजूला केलेत झोपू दे ना ग अजून थोड्यावेळ.”

“वा ग माझी लाडाची लेक! म्हणे झोपू दे ना ग थोडा वेळ. वाजलेत बघ किती.”
कांचन ताई तिला दरडावत म्हणाल्या.

तेवढ्याच लाडाने मनु ने आईला उत्तर दिले
“कितीही वाजू दे मला अजून थोडा वेळ झोपायचे आहे.”

कांचन ताई हळूच लेकी जवळ गेल्या तिच्या तोंडावरची उशी काढत तिच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या
“मनु खूप थोडे दिवस आहेस ग तू इथे. आत्तापर्यंत काही जाणवले नाही बघ पण आज तुझ्या लग्नाची तारीख पक्की होणार आणि काही दिवसांनी तू हे घर सोडून तुझ्या संसारात रममान होणार. त्यानंतर तुझ्याबरोबर किती वेळ मिळेल घालवायला कोणास ठाऊक? म्हणून आत्ता झोपण्यात वेळ न घालवता जरा आई बरोबर वेळ घालव.”

मनु ही हळूच आईच्या कुशीत शिरली
“आई एवढी इमोशनल होऊ नको,मी रोज तुला भेटायला येणार आहे.

“हो ग राणी रोज ये पण आत्ता माझा ऐक ना.”

“हं…बोल”

“संध्याकाळी तारीख काढायला जायचे आहे तर म्हटलं आधी आपण दोघी गणपतीच्या मंदिरात जाऊन येऊया का?”

“आज? आई ग मला खूप काम आहे.”

“म्हणूनच म्हणते लगेच उठ आणि आवर.आपण लगेच मंदिरात जाऊन येऊ.”

आई आता आपल्याला मंदिरात नेल्याशिवाय काही राहणार नाही हे लक्षात आल्यावर मनू उठली आणि फ्रेश व्हायला गेली. दोघी आवरून गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्या. कांचन ताईंनी मनोभावे आपल्या लेकीसाठी गणपती बाप्पा कडे प्रार्थना केली. मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली येताना शेजारीच हात बघणारा एक ज्योतिषी होता. त्याला बघून कांचन ताई म्हणाल्या,
“मनू चल आपण त्यांना तुझा हात दाखवूया. बघू तरी तुझ्या भविष्यात काय लिहिले आहे.”

“आई काहीतरीच काय माझा काही विश्वास नाही त्याच्यावर.”

“अग माझा ही नाही पण बघायला काय हरकत आहे.”

हे ऐकून मनाली च्या चेहऱ्यावर नाराजी पसरली होती. तिला हाताला धरून ओढत कांचन ताई म्हणाल्या” अगं गंमत म्हणून बघू.”

आईच्या आग्रहा खातर मनालीनेही त्या ज्योतिषा समोर आपला हात पुढे केला.
एक दोन मिनिट त्या ज्योतिषाने तिचा हात व्यवस्थित न्याहाळला. त्यानंतर आपल्या चष्म्यातून एकदा मनुच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि परत एकदा तिच्या हातावर
ज्योतिषी काहीच सांगत नाहीये हे पाहून कांचन ताईंना राहवले नाही.

“ काका भविष्य सांगताय ना.”

त्यांचे शब्द कानावर पडताच ज्योतिषी काका म्हणाले,
“प्रसिद्धी, ऐश्वर्य, सुख-सुविधा सगळं काही मिळणार आहे पण…”

हे ऐकून क्षणाक्षणाला आनंदित होणाऱ्या कांचन ताई मध्येच पण आला म्हणून अधीरतेने म्हणाल्या

“पण… पण काय काका?”

“याचं आयुष्य कमी आहे.”

हे ऐकून एवढा वेळ आनंदीत असलेल्या कांचन ताई रागाने लाल झाल्या.
“काहीतरीच काय सांगताय. चल ग मनू, हे ना आपले काहीतरी सांगत असतात विनाकारणच यांना विचारात बसलो आणि आपला वेळ घालवला. बाबा वाट पाहत असतील. हे घ्या तुमचे पैसे.”

झटकन त्यांच्या हातातून मनू चा हात ओढत तावातवाने कांचन ताई उठल्या आणि चालू लागल्या.
दोन मिनिटात आईचे हे बदललेले विचार आणि रूप पाहून मनूला हसू आले. पण आत्ता जर आपण काही बोललो तर आईचा राग आपल्यावरच उलटेल हे ओळखून मनू शांत बसली.दोघीही घरी पोहोचल्या तशा तन - तन करतच कांचन ताई किचनमध्ये गेल्या. त्यांना असं चिडलेले पाहून

“मंदिरात गेल्यावर मन शांत होत असते ही का अशी चिडली आहे.”
मनू च्या हातातील प्रसाद घेत दिलीप रावांनी विचारले.

मनू ने घडलेला प्रकार सांगितला आणि दोघेही हसायला लागले. कांचन ताईंना समजवण्यासाठी दिलीपराव किचनमध्ये गेले आणि इकडे मनूला आकाशचा कॉल आला

“हॅलो मनाली…गुड मॉर्निंग”

“गुड मॉर्निंग…..”
मनू अतिशय सौम्य आवाजात म्हणाली.

तिच्या आवाजातील सौम्यता आकाशने हेरली
“काय झालंय…मूड ठीक नाही का आज?”

“नाही ..असे काही नाही.”

“मला तर वाटले आपल्या लग्नाची तारीख काढणार आहे म्हणून माझ्यासारखीच तू ही खूप खुश असशील; पण कदाचित मी चुकीचा आहे.”

“असे काही नाही मी ही खुश आहे. काल आपला फोन झाला त्यावेळेस तुम्ही याबद्दल माझ्याशी काहीच बोलले नाही याचे फक्त वाईट वाटले.”

“अच्छा असे आहे तर..”

“खरंच, आपला कॉल झाला त्यावेळेस असे काहीही ठरले नव्हते.घरी आल्यावर बाबांनी अचानक हा विषय काढला.”
मनालीची समजूत काढत आकाश म्हणाला.

मनाली यावर काहीच बोलत नाही हे पाहून तो पुन्हा तिला म्हणाला,
“तुझा विश्वास आहे ना माझ्यावर.”

“हो आहे.”
मनाली ही स्वतःच्या मनावरचे शंकेचे मळभ दूर करत म्हणाली.

“ तू येणार आहेस ना संध्याकाळी.”

“तुम्ही असाल तर येईल.”

“हो ..मी आज लवकरच येणार आहे ऑफिसमधून संध्याकाळी भेटूया.”

एवढे बोलून आकाशने फोन ठेवला.
मनालीने ही डोक्यातले सगळे विचार बाजूला ठेवून रियाजाला सुरुवात केली.
*****
इकडे आकाश ही ऑफिस ला निघाला होता.त्याला जाताना पाहून शालिनी ताईंनी विचारले,
“ आकाश,तुझे मनालीशी काही बोलणे झाले का? नाही म्हणजे कोण कोण येणार आहेत काही म्हणाली का?”

“हो…ते तिघे येणार आहेत.राकेश ला वेळ नाहीये.”

“आज तु ही जरा लवकर ये.”
पेपर वाचत बसलेले माधवराव म्हणाले.

“हो…. येतो.”
एवढे बोलून आकाशही ऑफिसला गेला.

माधवरावांचा मूड पाहून शालिनीताई त्यांना म्हणाल्या,
“अहो, ताईसाहेब तुम्हाला काही म्हणाल्या का?”

“कशाबद्दल?”
एकदम रूक्ष आवाजात माधवरावांनी विचारले.

“हेच की आकाश आणि त्यांच्यात काय बोलणे झाले?”

हे ऐकून माधवरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि म्हणाले,
“शालिनी शेवटचं सांगतो नसत्या चौकशा करत बसू नको.संध्याकाळची तयारी करायला घे.आम्ही ही निघतो उशीर होतोय.”

शालिनीताईंनी माधवरावांकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. जणू काही माधवरावांचे हे बोलणं त्यांना अपेक्षित होतं पण तरीही न राहून त्यांनी विषाची परीक्षा घेतली. रागाने हात झटकत त्याही किचनमध्ये गेल्या.

क्रमशः
********
सुजाता इथापे

🎭 Series Post

View all