अस्तित्व भाग 9

Marathikatha
अस्तित्व भाग 9

मागच्या भागात आपण पाहिले आकाश आई नाराज असल्याने थोड्यावेळ तिच्याजवळ बसतो...आता पुढे

सुलभा तेलाची बॉटल घेऊन आली.
शालिनी ताईंनी थोडेसे तेल घेऊन हळूवार पणे आकाशच्या केसांमध्ये बोटं फिरवली.

"ओहो...हो ! आई किती रिलॅक्स वाटतय आता मला. किती दिवसांनी तू अशी मॉलिश करत आहे."

" मी रोज करून द्यायला तयार आहे रे पण तुला वेळ असतो का?"

" हो ना...या ऑफिस च्या कामाने सध्या निवांत वेळ मिळत नाही ."

"वेळ मिळत नसतो, काढायचा असतो."
शालिनी ताई म्हणाल्या.

आकाशने आईला आधीच सांगितले होते की लग्नाचा विषय सोडून सगळ्या विषयावर बोल पण शालिनीताईंना राहवत नव्हतं म्हणून त्याला डायरेक्ट न विचारता त्या म्हणाल्या,

"आकाश,घरच्या कामात मी स्वतःला एवढं गुंतून घेतलं की तू माझ्यापासून कधी लांब गेला ते कळलंच नाही रे."

"अग आई असं का म्हणतेस? मी लांब नाही गेलो तुझ्यापासून."

"हो... शरीराने नाही गेला पण मनाने तर खूप लांब गेला आहे."

"आई तू उगाचच इमोशनल होतीयेस. असं काही नाहीये."

"अरे मग सांग ना ज्या गोष्टी आत्याला सांगू शकतो त्या माझ्याशी का बोलू शकत नाही."

"बघ,तू पुन्हा तो विषय काढला .मी म्हणालो होतो ना हा विषय काढू नकोस म्हणून."
"का नको काढू; माझा स्वतःचा मुलगा मला काही सांगत नाही, माझ्या जीवाची किती घालमेल होत असेल याचा कधी विचार केला आहे का तू."

हे बोलताना शालिनीताईंचचें डोळे भरून आले होते.
आईचे केसात फिरणारे हात हातात घेत, आकाश तिच्या शेजारी बसला आणि म्हणाला,

"आई , तू खूप चुकीचा विचार करतेस. मी तुझ्या जवळच आहे. तू खूप इमोशनल आहेस, तुला जर मी कारण सांगितले तर तू त्याच्यावर अनेक प्रश्न विचारशील, शंका उपस्थित करशील, म्हणून तुला बोललो नाही. याउलट मी बरोबर असो नाही तर चूक आत्या नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते. नको त्या शंका उपस्थित करण्याऐवजी ती मला मदत करते म्हणून तिला सांगितले."

"मी नाही विचारणार तुला प्रश्न, मी ही तुला मदत करेल पण मला सांग ना खरं कारण."
शालिनीताई प्रेमाने आकाश च्या गालावर हात ठेवत म्हणाल्या.
आकाशला आता आईचा हट्ट मोडवत नव्हता. तिला अजून दुःखी करणे त्याला जड जात होते. तो म्हणाला,

" ठीक आहे पण नंतर, का ? कशासाठी हे प्रश्न तू विचारणार नाही.? प्रॉमिस!"

"प्रॉमिस!.."
शालिनीताई आनंदाने लेकाचा हात हातात घेत म्हणाल्या.

आकाश सांगायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली, मनाली चा फोन होता.
आईला मोबाईल दाखवत आकाश म्हणाला मला बोलायला पाहिजे, असे म्हणून तो उठला आणि आपल्या रूममध्ये गेला. फोन उचलेपर्यंत कट झाल्यामुळे त्याने पुन्हा फोन लावला, तिकडून मनालीने घाईनेच फोन उचलला
" हॅलो आकाश, सॉरी मी डिस्टर्ब तर नाही केलं ना!"

" हो केलं पण आता केलंच आहे तर ... बोलायला काहीच हरकत नाही."आकाश हसत म्हणाला.
"ऍक्च्युली, सॉरी पण... तुम्हाला कसं सांगू ते कळत नाहीये तुम्ही रागावणार तर नाही ना."

"अरे ,असं काय आहे ?अजून काही शंका आहेत का मनात? बिनधास्त बोला, कितीही प्रयत्न केला ना तरीही मी तुमच्यावर रागवू शकत नाही."

"आकाश,तुम्ही खूप खूप चांगले आहात."

" अच्छा हेच सांगायचं होतं का? "
आकाश हसून म्हणाला.

" नाही, ऍक्च्युली आता थोड्या वेळापूर्वी मला एक अन्नोन नंबर वरून एका व्यक्तीचा कॉल आला होता, त्याने त्याचे नाव सांगितले नाही पण तो म्हणाला..."

पुढे बोलताना मनाली जरा अडखळली.त्यामुळे आकाशने परत विचारले

" काय म्हणाला तो.."

"तो म्हणाला हे लग्न करू नका? तुमचा केवळ उपयोग केला जातोय."

मनालीचे हे बोलणे ऐकून आकाश दोन मिनिट स्तब्ध झाला. तो एकही शब्द बोलत नाही म्हणून मनाली परत म्हणाली,

"मला खूप टेन्शन आलं आहे हे ऐकून .कोणी केला असेल हा कॉल?"

मनालीचे हे शब्द ऐकून आकाश भानावर आला आणि हसायला लागला..
त्याचा हसण्याचा आवाज ऐकून मनाली ने विचारले,
"आकाश, काय झाले तुम्ही का हसताय."

"ओह.. सॉरी.. सॉरी..
ऍक्च्युली हा माझ्या कंपनी मधल्या मित्राने कॉल केला असेल. अजिबात घाबरू नको.काल गमतीने आमच्यामध्ये एक पैंज लागली होती की, तो हे लग्न मोडून दाखवेल. मला वाटलं तो गंमत करत असेल पण तो खरंच तुला कॉल करून असं काही सांगेल असं वाटलं नव्हतं "

"काय? आकाश तुम्ही पण काहीही पैज लावतात. बापरे मी किती घाबरले होते. तुम्ही आणि तुमचे मित्र अशक्यच आहात!"
एवढे बोलून मनाली ने फोन कट केला.

'मनालीला तर हे सांगितलं पण कोण असेल तो फोन करणारा?.. आदित्य... नाही तो असं नाही करणार...मग दुसरं कोण?.. त्यानेच केला असणार. उद्या त्याच्याकडे बघतो.'
आकाशच्या डोक्यात विचार चालू झाले होते.
तेवढ्यात शालिनीताईंनी आकाशला जेवणासाठी खाली बोलावले,
आईचा आवाज ऐकून डोक्यातल्या विचारांना थांबवत आकाश खाली गेला. जेवताना आकाशच्या डोक्यात फोन बद्दलचे विचार चालू होते. शालिनीताईंना आपण सांगण्याचे प्रॉमिस केले आहे हे तो विसरला होता.
शालिनीताईंना मात्र आज ना उद्या आकाश आपल्याला सगळं सांगेल असा विश्वास निर्माण झाला होता.
क्रमशः

कोण असेल फोन करणारी व्यक्ती,आकाशला समजेल का?... वाचू पुढील भागात

सुजाता इथापे


🎭 Series Post

View all