चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा फेरी
शीर्षक: आक्का
लघुकथा फेरी
शीर्षक: आक्का
आक्का कॉटवर पडून होत्या. गेली दोन वर्षं त्या हेच आयुष्य जगत होत्या. खोलीत खूप वेगानं अंधार पसरत चालला होता. घरात माणसं असूनही कोणाचीच जाग नव्हती. दोन डोळ्यात न मावणारा काळोख, आक्कांना उठता येत नव्हतं, उठवावं लागत होतं. पराधीन जगणं त्यांच्या नशिबी आलं होतं. त्या जगण्याचंच त्यांना आता ओझं वाटायला लागलं होतं.
डोळे मिटले तरी काळोख, डोळे उघडले तरी काळोख.
मिटल्या नयनी स्वर्गही बहरे
अजाण त्याची निर्भय होडी
फसला मासा पाहत राही
प्रतिबिंबातील अनंत कोडी
अजाण त्याची निर्भय होडी
फसला मासा पाहत राही
प्रतिबिंबातील अनंत कोडी
आक्कांना आज खूप जुने दिवस आठवायला लागले. मिटल्या आणि उघड्या डोळ्यांसमोर मागची वाट त्यांना जास्तच ठळक वाटायला लागली आणि त्या खूप खूप मागे जाऊन स्वतःला पाहू लागल्या.
वय जेमतेम सोळावं, धड साडीही नेसता येत नव्हती. त्या वयात लग्न करून इथे सून म्हणून आल्या. माहेरी गरिबी, वडील लवकर गेलेले. पाठची चार भावंडं आणि त्या मोठ्या. सगळ्यांच्या आक्का.
लग्न होऊन सासरी येताना नऊवारी साडी नेसायला लावली होती. धड ओढणी सावरता येत नव्हती. धड पदर सांभाळता येत नव्हता. फक्त लहान भावंडांचं मायेनं करत होत्या. आता इथं येऊन दीर-नणंदांचं करायला सुरुवात केली.
इथं ती सगळ्यांची वहिनी. दादा आणि वहिनी, ते रेल्वेत नोकरीला होते. महिन्याला पगार येत होता घरात. शिवाय जुनं का असेना स्वतःचं घर होतं. एकंदर इकडे तशी श्रीमंतीच होती. खायला, प्यायला कमी नव्हतं. नवी नवी नवरी, सगळ्यांची लाडकी झाली. हसरा चेहरा, बोलणं गोड, कामाची सवय असलेली. शरीरानं भारदस्त.
पुढे संसारात रमणं काय असतं त्याचा पुरेपूर अनुभव घेतला. नणंदांची लग्नं, दिरांची लग्नं, सासऱ्यांच्या जेवणाच्या वेळा सांभाळणं, शिवाय स्वतःला झालेल्या दोन मुली आणि एक मुलगा, या तिघांना मोठं करताना दिवस असाच संपून जायचा.
मुलगा फारच मस्तीखोर होता लहानपणी. शिवाय अभ्यासात कमीच. धड शहाणा नाही, धड खुळा नाही. पण आक्का आई होत्या. त्यांना त्याला वठणीवर आणणं जमलंच नाही. खायला लागला की खूप खायचा. खेळायला लागला की खेळत बसायचा. एखादं काम सांगितलं तर तेच तल्लीन होऊन करत राहायचा. राग आला की खूपच रागवायचा. आरडाओरड, आदळआपट करायचा.
दोघी मुली मात्र शांत होत्या. अभ्यासात हुशार नव्हत्याच, जेमतेम दहावीपर्यंत शिकल्या. दिसायला वाईट नव्हत्या. साधारणशी स्थळं पाहून दोघींची लग्नं करून दिली. त्या आपापल्या संसारात रमल्या.
मुलगा मेहनती होता. बालबुद्धी होता, पण कामाला दणकट होता. असंच ओळखीनं वशिल्यानं किर्लोस्कर कंपनीत अंगमेहनतीचं काम करायला त्याला त्यांनी नोकरीला लावला. खरंच काही माणसं नशिबवान असतात. त्यातलाच तो होता. चांगली बायको मिळाली, लग्न झालं. दोन मुलं झाली.
हिशोब देणं-घेणं, व्यवहार यात त्याला फारसं काहीच कळत नव्हतं. आक्का संपूर्ण घर सांभाळत होत्या. काटकसरी स्वभावाने त्यांनी चार पैसे जमवलेले होते. खायला कमी नव्हतं. साधं राहायचं, पोटभर खायचं, अंगभर काम करायचं. सूनही तशीच होती, फारशी हुशार नव्हती, पण “दगडापेक्षा बीट मऊ” असं म्हणून आक्का सगळ्यांशीच जमवून घेत होत्या.
आधी परिस्थितीशी जमवून घेतलं, नंतर माणसांशी जमवून घेतलं आणि आता म्हातारपणी नशिबाशी जमवून घ्यावं लागतंय.
नवऱ्यानं फक्त अमुक अमुक पगार हातात द्यायचा आणि तेवढ्यात आक्कांनी भागवायचं. देणं-घेणं, मुलं-बाळं, औषधं, सणवार... सगळं सगळं त्याच बघायच्या. संध्याकाळी तुळशीपाशी निरांजन लावायचं, सकाळी अंगणात आणि उंबरठ्यावर रांगोळी घालायची. वर्षाची लोणची, पापड करायचे. आजच्या या आधुनिक युगातही हे खूप जुनं वळण असलेलं घर होतं.
घरात फोन नाही. टी.व्ही. नाही. मोबाईल नाहीत. फ्रीजही नाही. फक्त जगण्यापुरत्या सुविधा. हेही आक्कांच्या आपणहून लक्षात आलेलं नव्हतं. त्यांना एकदा भावजय म्हणाली, “आक्का, तुम्ही अशा कशा राहू शकता आजच्या युगात?” तेव्हा त्यांनी मग गॅस आणि कुकर घेतला होता. घरात ओटाही नव्हता. खाली बसून त्या कितीतरी दिवस स्वयंपाक करत होत्या. काही कमी आहे म्हणून घराला खंत नव्हती.
पण मग मुलं मोठी झाली. नातवंडं कॉलेजमध्ये जाऊ लागली तेव्हा त्यांना घरातल्या कमतरतेची जाणीव होऊ लागली.
पुढं मग नातू चांगला शिकला. जुनं मळकं मोडकं घर पाडून नवीन घर बांधलं. पण तेवढ्यात आक्कांच्या नवऱ्याचं, म्हणजेच दादांचं निधन झालं आणि त्यांच्यावर पहिला आघात झाला.
नंतर हळूहळू आक्कांच्या पायातली शक्ती कमी होऊ लागली. चालणं अशक्य व्हायला लागलं. शरीर काम करेनासं झालं आणि मग हळूहळू सुनेनं घराचा ताबा घेतला.
भाकरी, चटण्या, लोणची असं चवीचवीनं जेवणाऱ्या आक्कांना एका भांड्यात आमटी-भात कालवून दिला जायचा. अगदी त्यांना खाता आला नाही तर कुणी भरवायचं. पण त्याला ‘चव नाही’ म्हणायचं नाही.
आणि मग तर त्या मनानं तुटत चालल्या. पिंजरा सिनेमातल्या संध्याशी तुलना होणाऱ्या आक्कांची अवस्था खूपच बिकट झाली. प्रत्येक जण आपल्या कामात, अभ्यासात, आपल्यात मग्न. कुणालाच त्यांच्याशी बोलायला वेळ नाही, अशी गत झालेली.
मनानं त्यांना वाटत होतं उठावं, घरातले दिवे लावावेत. लख्ख प्रकाश खोलीभर यावा. देवापाशी समई लावावी. शुभंकरोती म्हणावं. पण त्यांना उठताच येत नव्हतं. सकाळी कसंबसं ओढत ओढत त्यांना आंघोळीला नेलं जायचं.
डोळे उघडले तरी काळोखच होता. रात्र बरीच वाढत चालली होती. आक्का मनातल्या मनात खूप मोठा प्रवास करून आल्या होत्या. मन मारून जगण्याची त्यांना आता सवयच लागली होती.
त्यांच्या मनात विचार आला, घरातल्या एकालाही वाटत नाही का मी एकटी आहे म्हणून? एवढा काळोख झालाय, कुणी परतत कसं नाही? त्यांना आज खरंच खूप वाईट वाटलं. प्रत्येकाच्या वेळा त्या पाळत होत्या, डबे करून देणं, आल्यावर खायला करणं, याला हे आवडतं, त्याला ते आवडतं म्हणून करत राहाणं आणि शेवटी ते काय.
एवढ्यात खुडखुड आवाज झाला. दार उघडलं आणि शेजारची राधा घरात आली. दिवा लावला आणि म्हणाली, “आज सगळी गावी लग्नाला गेली आहेत. उद्याला येणार परत. मला तुमच्याबरोबर थांबायला सांगितलंय, पण मला घरची कामं करून यायला उशीर झाला.”
दिव्याचा प्रकाश पसरल्यानं मनातला काळोख दूर झाला. राधा बोलत बसली. तिनं आणलेली पोळी आमटीत कुस्करून खायला दिली आणि म्हणाली, “वैनी म्हणत होत्या, तुम्हाला सांगून गेलं तर तुम्ही ‘नको जाऊ’ म्हणालात असता. म्हणून तुम्हाला न सांगताच सगळी लग्नाला गेलीत.”
“होय का?” आक्कांच्या मनातून दूर गेलेला काळोख पुन्हा मनात साठू लागला. उजेड असतानाही. राधा खूप बोलत होती, पण त्या बोलण्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. त्यांनी आमटीत कुस्करलेली पोळी तशीच बाजूला ठेवली आणि डोळे मिटून घेत त्या म्हणाल्या, “मला झोप येतेय राधा, झोपते मी.” पण डोळे मिटून घेतले तरी डोळ्यातून पाणी वाहात होतं. झोप लागतच नव्हती. देवाला नमस्कार करावा असंही त्यांना झोपताना वाटलं नाही.
आता मात्र काळोखातूनच वाट काढताना त्या चाचपडत राहिल्या. नशिबाला दोष देत, “कसा निभवायचा आयुष्याचा शेवटचा अंक?” हाच प्रश्न त्यांच्या मनात घोळत राहिला.
काळोखातल्या वाटा दात विचकून हसत असल्याचा आक्कांना भास झाला...