Login

आणि तिने लढाई जिंकली भाग- पाच

शेवटी ती स्वतःसाठी घरी येते आणि तिच्या पायावर उभी राहून इतर निराधार महिलांसाठी आधार बनते
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा

शीर्षक आणि तिने लढाई जिंकली (अंतिम )भाग पाच


मागील भागात आपण पाहिलं कि, हातभार लावून देखील अस्मिताची वाहिनी तिला नावे ठेवायची. आता पाहूया पुढे;


आता मात्र शिवणकामाच्या पैशातून ती थोडं थोडं करून बचत करू लागली. कधी कमी, कधी जास्त. पण प्रत्येक रुपया ती बाजूला ठेवत राहिली.

“हे आपल्या घरासाठी आहेत.”
ती समीरला हळूच सांगायची.समीरही त्या पैशांच्या डब्यात हळूच आपली खाऊचे उरलेले पैसे टाकायचा.

काही वर्षांनी तिच स्वप्न पूर्ण झालं. तिच्या मेहनतीच्या पैशातून आणि थोड्या कर्जातून तिने स्वतःचं छोटंसं घर घेतलं. तिचं छोटंसं घर असल तरी तिच्यासाठी ते खूप किंमती होतं. कारण ते तिच्या स्वतःच्या कष्टाचं फळ होतं. घराच्या अंगणात आता मशीनचा आवाज सतत घुमत राहायचा.

हळूहळू गावातल्या बायका तिच्याकडे येऊ लागल्या. त्यातली एक बाई तिला म्हणाली,

“आम्हालाही शिकव ना शिवणकाम. घरची परिस्थिती बरी नाही.”लगेच दुसरी पण म्हणायची,

“तुझ्यासारखं काहीतरी करून आम्हालाही पोटापुरता आधार हवा आहे. सासरचे पैशासाठी घालून पाडून बोलतात.”

ते ऐकून तिला जाणवलं, जशी ती कधीतरी एकटी झगडली, तशाच कितीतरी स्त्रिया अजूनही संघर्ष करत आहेत. त्या क्षणीच तिने ठरवलं,

“मी सगळ्यांसाठी उभी राहीन.”

तिने आपल्या घराच्या ओसरीवर छोटासा शिवणक्लास सुरू केला. सुरुवातीला दोनच बायका आल्या, मग चार, मग दहा. दिवसभर मशीनांचा आवाज, बायकांची गडबड, शिकताना होणाऱ्या गप्पा. तिचं घर आता माणसानी भरू लागलं, कधीकाळी माणसांनी तिला नाकारलं होत.


काळ पुढे सरकत होता. शिवणक्लासमुळे ती आता गावात नावाजलेली होती पण तिच्या माहेरात मात्र वेगळेच सुरू होते.

मोठी बहीण सुखी संसारात रमली होती. वाहिनी मात्र आईवडिलांना सतत त्रास द्यायची.

“सतत आजारी पडतात, माझं काम वाढवतात, आता या म्हाताऱ्यांचा सांभाळ कोण करणार?”

असे शब्द रोज ते ऐकायचे. अस्मिताचे आईवडील खूप दुःखी व्हायचे.तिने ते घर सोडल्यापासून एकदाही त्या घराची पायरी चढली नव्हती. एक दिवस असच तिच्या कानी तिच्याच क्लास मधल्या एका बाईने ह्या गोष्टी सांगितल्या तसं तिने एकही क्षण न दवडता समिरला गाडी काढायला सांगितली. तिच्या माहेरी पोहचून तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं,


“आई, बाबा, माझं घर लहान आहे, पण माझ्या मनात तुमच्यासाठी मोठं स्थान आहे. या… इथून पुढे मी च तुमचा सांभाळ करेन. तुम्ही माझ्यासोबत येणार ना? "
तसं तिच्या आईवडिलांनी लगेच होकार भरला. त्या दिवसापासून तिचं घर खरं गोकुळ झालं. आई, वडील, समीर आणि ती आणि क्लासला येणाऱ्या बायका.

समीर मोठा होत होता. अभ्यासात तो हुशार होता.
वर्षानुवर्षांच्या कष्टाच चिज झालं जेव्हा समीर डॉक्टर झाला. पांढरा कोट घालून जेव्हा तो आईसमोर आला, तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळत होते, पण चेहऱ्यावर मात्र हसू होत.


वर्षानुवर्षांचा संघर्ष मागे पडला होता. एकेकाळी अपमानाने घराबाहेर काढलेली ती स्त्री आता स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने उभी राहिली होती.

तिचं छोटंसं शिवणकेंद्र आता मोठं झालं होतं. गावातल्या महिला तिच्याकडून शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या होत्या. प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावरचं हसू तिला तिला आनंद द्यायचा. आई-वडील तिच्या छत्राखाली सुखाने दिवस घालवत होते.

गावात एक मोठा सत्कार समारंभ ठेवला होता. तिचा सत्कार करताना गावचे सरपंच म्हणाले,

“जिला ह्या समाजाने नाकारलं, तिनेच आज समाजाला दिशा दिली आहे. एक आई म्हणून, मुलगी म्हणून, बाई म्हणून ती यशस्वी झाली आहे.


सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. आईवडिलांचे डोळे आनंदाने पाणावले. समीर तिच्या जवळ येऊन म्हणाला,


“आई, तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस. आज मी डॉक्टर झालोय ते फक्त तुझ्या कष्टामुळे.”

तिने स्मितहास्य करत डोळ्यातले अश्रू पुसले. तिच्या मनात फक्त एकच विचार येत होता.

" ज्या डागामुळे मला नाकारलं गेलं, त्याच डागामुळे मला माझ्या जगण्याची दिशा मिळाली, आभार तुझे ही लढाई आपण जिंकली आहे. "