Login

आत्म्यांचं ग्रंथालय.भाग १

एक भयंकर स्वप्नं
आत्म्याचं ग्रंथालय भाग १


सुशांत आईचा लाडका राजकुमार असतो. कालच दहावीची परीक्षा संपली असल्यामुळे आज सकाळी सूर्य डोक्यावर आला तरी सुद्धा महाशय मस्त अंथरूणावर लोळत होते. आणि आई सुद्धा त्याला उठायला गेली नाही.
“आई सुशांत झोपलाय अजून. दहा वाजून गेले तरी!” सुशांतची मोठी बहिण कविता म्हणाली.
यावर आई म्हणाली,

“ जाऊ दे ग बिचारा रात्र रात्र जाग्रण करून अभ्यास करत होता. झोपू दे बाळाला.”
कविता म्हणाली,

“ हो तो पन्नास वर्षाचा झाला ना आई तरी तुझा तो बाळच राहणार आहे. कसला बाळ? रिझल्ट बघू. मी नाही दिली वाटतं दहावीची परीक्षा? मी पण अशीच रात्र रात्र जाग्रणं केली होती ना? पण परीक्षा संपल्यावर मला झोपू दिलं का कोणी ?सात वाजताच गदागदा हलवून उठवलं. आई मी विसरले नाही.”

यावर आई म्हणाली,

“ नको ग असं बोलू ग. बिचारा शहाणा मुलगा आहे. तो झोपू दे त्याला “

.इकडे या दोघींचा असा संवाद चालू असतो पण तिकडे सुशांत अचानक घाबरून दचकून जागा होतो. त्याच्या अंगाला दरदरून घाम सुटलेला असतो. चेहरा घाबरलेला असतो. हाता पायाची थरथर चालू असते. त्याला कळत नाही नेमकं काय झालं? जे आपण बघीतलं ते खरंच होतं की स्वप्न होतं? त्याला समजत नाही. त्याची अशी अवस्था असतानाच नेमकी आई त्याच्या खोलीत आली. म्हणाली,


“ अरे काय झालं तुला? असं का घाबरलेला दिसतोयस ? “


यावर सुशांत पटकन आईला बिलगला. एरवी त्याला जरा जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर म्हणतो,


“ आई मी मोठा झालोय. आई असं करू नको आणि आज असं काय झालं? याचा चेहरा घाबरलेला का दिसतोय?”

मनात साठलेले हे प्रश्न शेवटी आईने विचारलेच.

“ सुशांत काय झालं?”

तेव्हा तो म्हणाला,

“ आई मला खूप भयंकर स्वप्न पडलं. ”

“भयंकर !असं काय पडलं रे ?बाळा स्वप्न पडतच असतात. ती विसरून जायची.”

“आई ते विसरून जाण्यासारखं स्वप्नच नव्हतं.”

“काय पडलं स्वप्न सांग बर मला.”

सुशांत बराच वेळ गप्प राह्यला.

“ सुशांत सांगणार आहेस ना मला काय स्वप्न पडलं ते ?”

हतबल झाल्यासारखे त्यांचे डोळे दिसत होते.

“आई मला हिम्मत होत नाही स्वप्न सांगायची.”


“ असं इतकं भयंकर काय पडलं? तुला तुझे स्वप्न सांगायची पण भीती वाटतेय.”

त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत हळूच आई म्हणाली. तसं तिचा हात घट्ट पकडून तो म्हणाला,

“ आई मला जे स्वप्न पडलं ना ते खूपच विचित्र होतं. खूप म्हणजे खूपच विचित्र होतं. आई मला स्वप्नात एक ग्रंथालय दिसले.”

यावर आई हसायला लागली. म्हणाली,


“ ग्रंथालय म्हणजे लायब्ररी. तुला दिसली ना! मग विचित्र काय आहे त्यात? नाहीतरी तुला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे तुला तसं स्वप्न पडलं असेल.”

“नाही ग आई ती साधीसुधी लायब्ररी नव्हती.”


“ साधीसुधी म्हणजे छोटीशी नसेल खूप मोठी असेल. छान बांधकाम केलेली असेल.”


“ नाही आई. ती अशी नव्हती. ती वेगळीच लायब्ररी होती.”

“ म्हणजे कशी रे?”
“ आई तिथल्या त्या पुस्तकात कशाची माहिती होती माहितीय? आपण जी नेहमी पुस्तक वाचतो ना तशी ती पुस्तकं नव्हती. ती सगळी पुस्तकं आत्म्यांनी लिहिलेली पुस्तक होती. म्हणजे आत्म्यांचे ग्रंथालय होत.”

“काय सांगतो तू ?काहीतरी बरळतोय.असं कधी असतं का ?आत्मे कधी लिहितात का?”

“ नाही नं म्हणून तर मला भीती वाटली ते स्वप्न बघून.”

“ सांग बरं मला कसं होतं ते स्वप्न. अगदी पहिल्यापासून सविस्तर सांग.”

सुशांत घाबरलेल्या आवाजातच कसा बसा हो म्हणाला. तरी किती वेळ तो बोललाच नाही. शेवटी आई म्हणाली,

“ अरे सांगतोयस की मी जाऊ?”

“ नको नको थांब तू. आज काही काम करू नकोस. माझ्याजवळ बसून रहा. मला खूप भीती वाटते.”

“ स्वप्न तर सांग”

तेव्हा सुशांतने आईचा हात घट्ट पकडून ठेवला आणि सांगायला सुरुवात केली.

“ आई मी असाच कुठल्यातरी छोट्याशा गावात गेलो होतो. तिथल्या रस्त्यावर फिरत असताना मला एका बिल्डिंग वर ग्रंथालय असं लिहिलेलं दिसलं म्हणून मी तिथे गेलो पण ग्रंथालय पाटी असूनही तिथे कुलूप होतं. मला वाटलं असं कसं संध्याकाळी तर लायब्ररी सुरू असायला पाहिजे ! मी सहज त्या कुलपाला हात लावला आणि”


“ आणि काय रे बेटा? सांग तरी .”

“आई अगं वेगळच घडलं. विचित्रच घडलं.”

“काय घडलं सांग ना?”

“ सांगतो सांगतो “


असं म्हणत सुशांत बराच वेळ गप्प बसला. त्याच्या पलंगाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्यानी पाण्याची बाटली घेतली आणि घटाघटा पाणी प्यायला. पाणी पिऊन सुद्धा त्याच्या डोळ्यातील भीती जात नव्हती आणि तो कधी सांगतो याची आई वाट बघत होती.


“आई त्या ग्रंथालयामध्ये मी जे बघीतलं नं ते”

बोलता बोलता सुशांतने वाक्य अर्धवटच सोडलं आणि त्याचं अंग पुन्हा थरथरू लागलं.

नेमकं काय बघितलं सुशांत ने त्या ग्रंथालयात बघू पुढील भागात
—---------------------------------------

0

🎭 Series Post

View all