आदानप्रदान-1

आई नसलेलं माहेर

केक कापत असतांना आत्याबाईंचा हात थरथरत होता. माहेराच्या जुन्या आठवणी वर डोकावू लागल्या,

"असंच... अगदी असंच नाना माझ्यासाठी गावात गोडधोड आणत, आसपासच्या मुला मुलींना बोलवत आणि सर्वांना भेळ भत्ता खाऊ घालत"

लहानपणीचा मनात असणारा तो भाव आज पुन्हा उमाळून येत होता. आत्याबाईंचा खरं तर विश्वासच बसत नव्हता, इतक्या वर्षानंतर त्यांच्या लाडक्या भावाने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. बाजूला भाऊ, वहिनी अन भाचेमंडळी टाळ्या वाजवत होती.

आत्याचा केक भरवता भरवता अश्रूंना बांध फुटला आणि आत्याने मनसोक्त रडून घेतलं.

3 वर्षांपूर्वी आजी सोडून गेली तेव्हापासून आत्याचं घरी येणं कमी झालं होतं. आजी घरात असायची तेव्हा तिच्या ओढीने आत्याचं सारखं येणंजाणं असे. श्रीकांत कामानिमित्त बाहेरच असायचा त्यामुळे बहीण घरी आली काय अन केव्हा गेली त्यात त्याचा फारसा संबंध येत नसे, पण जेव्हा जेव्हा भेट होई तेव्हा श्रीकांत मात्र बहिणीचे पुरेपूर लाड करे.

पण या सगळ्यात फरफट व्हायची ती श्रीकांतच्या बायकोची. आत्याबाई आल्या म्हणजे त्यांच्यासाठी आजी सगळं साग्रसंगीत करवून घेत असे. थोडं सुदधा इकडचं तिकडे चालत नसे. आजी डोळ्यात घालून श्रीकांतच्या बायकोकडे लक्ष ठेवायची, ही आपल्या लेकीसाठी सगळं नीट करतेय की नाही.. तिला दडपण यायचं या सगळ्याचं. घरात आजीबाई मोठ्या, सासरे बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून गेलेले..त्यामुळे घरात आजीबाईंचा शब्द अंतिम असे. त्याच जोरावर आत्याबाई टेचात माहेरी येत आणि सगळे लाड पुरवून घेत.

पण आता आजीबाई जाऊन तीन वर्षे झाली होती, आई गेल्यावर माहेर उरत नाही म्हणतात त्याच हिशोबाने आत्याबाईंचं भावाकडे येणं कमी झालं. श्रीकांत त्याच्या कामात व्यस्त असायचा आणि त्याची बायको आता जवळपास या दडपणातुन मोकळी झाली होती..

एके दिवशी अचानक श्रीकांतच्या बायकोला फोन आला आणि तिच्या हातातून फोन गळून पडला..

तिच्या आईला अटॅक आलेला, ताबडतोब गावी बोलावणं आलं..

"दादा, मी येतेय..आई कशी आहे सांग ना दादा..डॉक्टर काय म्हणताय सांग ना.."

"ताई तू निघून ये फक्त.."

यावरूनच तिला काय बातमी समजायची ती समजली, तो चार तासांचा प्रवास तिच्यासाठी खूप अवघड होता..

क्रमशः

🎭 Series Post

View all