आदानप्रदान-3 अंतिम

मराठी हृदयस्पर्शी कथा
तिला आयुष्यात काही कमी नव्हतं, पण मनातला माहेर नावाचा कप्पा रिक्त झाला होता. ती पोकळी तिला सतत सलत असायची. त्यात आत्याबाईंचा फोन आला,

"बोला ताई, काय म्हणताय.."

"काही नाही, सहज फोन केलेला..दादा कुठे आहे..?"

"ते गेलेत एका मिटिंग साठी, यावेळी मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे म्हटले ते.."

"अरेवा..चांगली भरभराट होईल म्हणजे यावेळीही.."

"कमाई काय, येते अन जाते.. यावेळी फर्निचर करून घेऊ म्हटलं घरात, मला कधीची हौस होती.."

"अरेवा, छान.."

जुजबी बोलून तिने फोन ठेवला..पण क्षणात तिच्या काळजात चर्रर्र झालं..

हेच संवाद,

हेच बोलणं,

हाच रोख,

तिला तिच्या वहिनीशी बोलताना उमगला होता, आणि तेच ती आता आत्याबाईंसोबत करतेय...

तिला भरून आलं, आत्याबाईंमध्ये ती स्वतःला बघू लागली, आई नसलेलं माहेर किती खुणावतं हे तिला आता चांगलच कळलं होतं,

तिने लगेच फोन फिरवला,

"ताई, तुम्ही कधी येताय?"

हे ऐकून आत्याबाईंना आनंदाचं भरतं आलं..

"कधी येऊ वहिनी तू सांग.."

आत्याबाई तयारच होत्या..

"या लगेच, आम्ही वाट बघतोय.."

आत्याबाईंना माहेरची सल भासू द्यायची नाही असं तिने ठरवलं, त्यांचं पुरेपूर स्वागत, लाड केले. त्यांचा वाढदिवस जोरात साजरा केला. आत्याबाईंचा डोळ्यातला आनंद बघून तिला वेगळंच समाधान मिळत होतं. आत्याबाईंना तिने खास सोन्याची चेन भेट दिली तेव्हा आत्याबाई अक्षरशः गळ्यात पडून रडल्या..

आत्याबाईंची साग्रसंगीत बोळावण करण्यात आली. मुलांच्या सुट्ट्या अजूनही अर्ध्या बाकीच होत्या. अचानक तिचा फोन खनानला,

"हॅलो ताई, यावेळी काही वेगळं नियोजन आहे का?"

"नाही गं वहिनी, का?"

"यावेळी आला नाहीत तुम्ही..म्हणून म्हटलं.."

वहिनी प्रेमाने म्हणतेय की टोमणा मारतेय तिला कळत नव्हतं,

"तुम्ही कुठे बोलावलंत मला.."

"घ्या...माहेरी यायला आमंत्रण द्यायला लागतं होय? मला वाटलं आत्ता येतील, तेव्हा येतील..तुम्ही तर अमंत्रणाची वाट बघत बसल्या.. आम्ही तुमच्यासाठी खास दागिना करतोय, माप लागणार आहे तुमचं, या लवकर.."

हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं,

कर्म फिरून येतं म्हणतात ते हेच, तिला त्याक्षणी एक शिकवण मिळाली,

माहेरपण अनुभवायचं असेल तर,

माहेरपण द्यायलाही शिकावं...

समाप्त


🎭 Series Post

View all