Login

आनंदाचा क्षण: विंडो शॉपिंग!

ही कथा आहे दोन मैत्रिणींची आणि त्यांच्या विंडो शॉपिंगच्या आवडीची!
#लघुकथालेखनस्पर्धा

विषय:- विंडो शॉपिंग

शीर्षक:- आनंदाचा क्षण:विंडो शॉपिंग!


"आज काय मग कुठे जायचे ?" नमा तिची मैत्रीण स्वप्नाला फोनवर विचारत होती.

"तूचं ठरव कुठे जायचे?"

"असे करूया का, आधी आपण ना थोडे काहीतरी खावूया मग तसेच समोरच्या त्या मोठ्या शोरुममध्ये जावू."

वयाची साठी पार केलेल्या ह्या मैत्रीणी दररोज संध्याकाळी फेरफटका मारायला जायच्या.

"काय गं, कसला विचार करतेस?" स्वप्ना चालत म्हणाली.

"अगं, ती परवा हिरव्या रंगाची साडी नाही का पाहिली होती बघ, त्यावर सोनेरी रंगाचे बुट्टे होते."

"हा त्याचे काय?" स्वप्नाने विचारले.

"आमच्या सुनबाईने ती ऑनलाईन विकत घेतली आणि मला दाखवत होती."

"तिचं का गं ती साडी, ज्याची किंमत अडीच हजार होती?"

"हो, पण हिला महागच मिळाली असणार." नमा सांगत होत्या.

"तुला कसे माहीत?" स्वप्ना ताईंना जरा जास्तच कुतूहल वाटत होते.

"मी त्या दिवशीच ऑनलाईन ती साडी कितीला असेल म्हणून किंमत पाहिली तर चक्क पाच हजार रुपये!" डोळे मोठे करून त्यांनी सांगितले.

"काय सांगतेस काय? एवढे? हे तर दुप्पट पैसे झाले ना. तसे तर त्यांनी पैसे कमी घ्यायला हवे ना. ऑनलाईन खरेदीत एकतर दुकानात दाखवण्यात जेवढा वेळ जातो तेवढा तर जात नाही पुन्हा त्यांना दुकानाचे भाडे किंवा ते लाईटबिल भरायची पण गरज नसते." स्वप्ना जरा तक्रार करतच म्हणाल्या.

"आता सुनबाईला पसंत पडली तर आपण काय करणार? त्या स्वतः कमवतात आणि त्या स्वतःच घेतात. आपल्या सारखे थोडीच आहे त्यांचे." नमा म्हणाल्या.

"नाहीतर काय, आपल्याला लहानपणी दिवाळीत कपडे म्हणजे मोठ्या बहिणीचे वापरलेले कपडे, त्यातही फराळ आणि सर्व साहित्य हेच खूप महाग असायचे म्हणून खूप काटकसर करायला लागायची." मध्यवर्गीय कुटुंबाचे अनुभव सांगत स्वप्ना म्हणाल्या.

"हो तर, लग्न झाल्यावर नवरा किंवा सासरचे जे म्हणतील तिचं साडी आपण घ्यायची मग हे पसंत नाही ते पसंत नाही असे बोलण्याची हिंमत कुठे होती. त्यात आपल्याला घरखर्चासाठी पैसे द्यायचे त्याचा पण हिशोब द्यावा लागायचा. साठवून ठेवलेले पैसे कधी उपयोगात येतील काही सांगता यायचे नाही." जुन्या आठवणींना उजाळा देत नमा म्हणाल्या.

दोघी चालतच एका पाणीपुरीच्या गाडीजवळ आल्या. आपापल्या आवडीनुसार गोड तिखट प्रमाण सांगून खायची पुरी ज्यात रगडा आणि चिंचेचे किंवा पुदिन्याचे पाणी होते त्यात तुडूंब भरलेली पुरी खायला सुरुवात केली.तसेच समोर नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या लावलेल्या दुकानातील साड्या पाहायचे दुसरे कामही त्यांनी त्यांच्या नयनांनी चालू केले.

त्यांचे पुरीने पोट भरले आणि डोळ्यांनी त्या नवीन साड्या पाहून मन भरले. आता त्याची किंमत पाहण्याची इच्छा त्या दोघींना पण झाली म्हणून पटकन पैसे देवून त्या मोठ्या शोरुमजवळ गेल्या.

दुरून डोंगर सर्वांना साजिरेच दिसते पण जवळ गेल्यावर सत्य परिस्थिती दिसते असेच दोघींचे झाले.

खरे तर पन्नास टक्के सूट लिहिलेल्या बाजूच्या फलकावर त्यांचे लक्ष पहिले गेले होते. जवळ जावून त्यांनी काचेच्या आतमध्ये उभे असणाऱ्या त्या साडी घातलेल्या स्त्री पुतळ्यांना न्याहाळले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की एका साडीची किंमत ही वीस हजार नंतर तीस हजार आणि जास्तच सुंदर असलेली साडी त्याची किंमत ही पन्नास हजार आहे. लगेच त्यांनी तिथल्या तिथे गणिती आकडेमोड करून त्याच्या अर्धे किती किंमत होते हे मोजून पाहिले.

"छ्या.. मला काय वाटतं नाही की आपल्याला घेता येईल." स्वप्ना उदास होत म्हणाल्या.

नमा, "मला तर वाटते त्यापेक्षा आपण ड्रेस पाहूया. कारण ह्याच्या किंमती खूप जास्त आहेत. तसेच पुढे लिहिले आहे की एकदा घेतलेली साडी पुन्हा बदली करून मिळणार नाही. उगाच त्यात काही फाटलेले असेल तर ते परत पण घेणार नाहीत. "

एखादी गोष्ट माणसाला आवडली तर त्याबद्दल गुणगान गाण्याचा असलेला मनुष्य स्वभाव जेव्हा तिचं वस्तू विकत घेवू शकत नसतो तेव्हा त्याबद्दल चुका किंवा त्याबद्दल वाईट बोलायला लागतो असेच त्यांचे झाले होते.

"मॅडम, आतमध्ये जावून पाहा. इथे जास्त वेळ तुम्हाला थांबता येणार नाही. तुम्ही मध्येच उभे आहात त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होतोय." तिथला एक कर्मचारी जो बाहेर उभा होता तो म्हणाला.

"नाही, आम्ही सहज पाहत होतो. आम्हाला आतमध्ये जायचे नाहीये." असे म्हणून त्या दोघी तिथून निघून गेल्या.

पुढे गेल्यावर पुन्हा एक दुकान लागले. त्यात घराला सजवण्यासाठी विविध शोभेच्या वस्तू ठेवल्या होत्या. वेगवेगळे निसर्ग चित्र असलेल्या फुलदाणी आणि काही तर खूप सुंदर असे भिंतीना लावणारे चित्र पाहून त्या पुन्हा थांबल्या.

काचेच्या बाहेरून पाहताना त्यांना हे आपण घरात कुठे ठेवू शकतो ह्याचे मनातच मनोरे रचायचे काम करत होत्या.

अचानक नमा एका आठवणीत गेल्या होत्या.

"हे काय? हे एवढ्या खालच्या दर्जाचे तोरण तुम्ही का आणले आणि ते पण कोणाला विचारून?" राधा , नमा ह्यांची सुनबाई रागाने विचारत होती.

"अगं, मला आवडले म्हणून मी आणले. त्यात काय एवढं?" नमा म्हणाल्या.

"उद्या दिवाळीनिमित्त माझे आणि तुमच्या मुलाचे सहकारी इथे फराळासाठी येणार आणि तुम्ही त्यांना ह्या अशा तोरणाने स्वागत करणार? आमची काय इज्जत राहील ? तुम्हाला काही कळत नसेल तर कृपया तुम्ही ह्यात पडत जावू नका." चिडून ती खोलीत निघून गेली.

नमा सुन्न होऊन सोफ्यावर बसल्या. त्यापासून त्यांनी कधीच शोभेच्या काय कोणत्याच वस्तू घरासाठी विकत घेतल्या नव्हत्या.

म्हणून विंडो शॉपिंग करून त्या आपला आनंद त्यात शोधत असतं. सोबतच समदु:खी असलेल्या स्वप्ना ह्यांची त्यांना सोबत होत असे.

"चल गं, आज आपल्याला जास्त वेळ झाला. घरी लवकर गेलो नाहीतर माझा मुलगा खूप ओरडतो." स्वप्ना म्हणाल्या.

त्यांचे बोलणे ऐकून नमा कटू आठवणीतून बाहेर आल्या.

"उद्या तू ठरव बरं. कुठे जायचे ते. " त्या काहीच झाले नाही असे दाखवून स्वप्ना ह्यांना म्हणाल्या.

"हो, उद्या आपण साडी प्रदर्शनात जाणार आहोत. तिथे म्हणे फुकटच आपल्याला साड्यांची कशी काळजी घ्यायची हे सांगणार आहेत." त्या म्हणाल्या.

"चालेल. उद्या निघताना फोन करते." नमा हसतच म्हणाल्या.

विंडो शॉपिंग हा काहींचा आनंदाचा क्षण असतो हे ह्या दोघींकडे पाहून समजत होते.

समाप्त.

© विद्या कुंभार.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
0

🎭 Series Post

View all