Login

आपलेपण-२

आपलेपण
आपलेपण-२

त्या संध्याकाळी आद्वैत आणि आलिशा कॉलेजच्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. तिथं त्यांच्या अनेक सायंकाळं गेल्या होत्या कधी असाईनमेंट्स करत, कधी निवांत गप्पा मारत, तर कधी फक्त एकमेकांच्या शांततेत.

पण आजची संध्याकाळ काहीतरी वेगळी होती. दोघंही तसंच बसले होते, पण आलिशाच्या मनात कुठलंतरी हलकंसं थरथरतं वादळ होतं. ती खूप वेळ काही बोलायचं टाळत होती, पण अखेरीस शांत आवाजात म्हणाली,

“तुला वाटतं का, आपण कायम असं राहू?”

आद्वैत थोडा अचंबित झाला. तिच्याकडे पाहून विचारलं, “म्हणजे काय असं?”

ती हलकं हसली, पण ते हसू तिच्या डोळ्यांत पोचत नव्हतं.

“म्हणजे ही आपली वेळ, मैत्री, सगळं कायम राहील का असं वाटतं तुला?”

आद्वैतच्या चेहऱ्यावर एक क्षणभर हसू उमटलं. पण ते हसू वरवरचं होतं त्याच्या आत एक छोटासा काळजीचा सूर दबा धरून होता.

“काही नाती तशीच राहतात. बदलत नाहीत, फक्त थोडी खोल जातात,” तो म्हणाला, थोडा थांबून.

पण दोघंही मग गप्पच झाले. त्या संध्याकाळी शब्द कमी आणि नजरा अधिक बोलक्या होत्या.

काही दिवसांनी, एकदा सहज गप्पांमध्ये आद्वैत म्हणाला,
“माझं ना, गुलाबजाम खूप आवडतं.”

तेव्हा आलिशा फक्त हसली होती. त्यानं ते सहज बोललं होतं, पण तिनं ते लक्षात ठेवलं.

आठवडाभरानंतर तिनं त्याच्यासाठी डब्यात गुलाबजाम आणले स्वतः करून. डबा उघडताच आद्वैत क्षणभर स्तब्ध झाला.

“हे तू केलंस?” त्यानं विचारलं, थोडं अचंबित होत.

“हो वाटलं तुला surprise द्यावं,” ती म्हणाली, नजर थोडीशी खाली घालत.

आद्वैत काही बोलला नाही. फक्त तिला बघत राहिला. गुलाबजाम खाल्ला आणि पुन्हा एक नजर तिच्याकडे टाकली त्यात कितीतरी भावना होत्या.

त्या क्षणात आलिशाच्या लक्षात आलं, की आद्वैतसाठी ती फक्त एक मैत्रीण राहिलेली नव्हती. त्या काळजीच्या मागं आता काहीतरी अधिक होतं नुसतं प्रेम म्हणायचंही थोडं अपुरं वाटावं असं काहीतरी.

कॉलेजचा शेवटचा दिवस आला. सगळीकडे एक वेगळीच धावपळ होती कोणी फेअरवेल फोटो घेत होतं, कोणी व्हिडिओ करत होतं, शेवटच्या आठवणी साठवत होतं. पण त्या गडबडीत आद्वैत आणि आलिशा मागे एका बाकावर निवांत बसले होते.

ते दोघंही फारसं बोलत नव्हते, पण नजरा मात्र खूप काही सांगत होत्या.

रात्री, कॅम्पसच्या बाहेरच्या लॉनवर दोघं पुन्हा भेटले. हवेत गारवा होता. चंद्र डोकावत होता, आणि दोघांचं मन मात्र थोडं धूसर, थोडं अस्पष्ट वाटत होतं.

काही क्षण शांततेत गेले. मग आद्वैत हळूच म्हणाला,

“मी मुंबईला जातोय पुढच्या शिक्षणासाठी.”

त्याच्या शब्दांनी आलिशाच्या छातीत थोडं सळसळलं. पण चेहऱ्यावर काही दाखवलं नाही.

“छान आहे तुला तिथे जायचंच होतं ना,” ती म्हणाली.
हसली, पण त्या हसण्यात काहीतरी हरवलेलं होतं हे आद्वैतच्या नजरेतून सुटलं नाही.

तो तिच्याकडे वळून म्हणाला,
“पण जर तुला नको असेल, तर मी नाही जाणार.”

ती क्षणभर काहीच बोलली नाही. त्याचा आवाज स्थिर होता, पण त्यामागची भावना नितळ होती.

ती म्हणाली, “तू तुझं स्वप्न पूर्ण कर. माझ्यासाठी नाही स्वतःसाठी. मला आनंद होईल. खरंच. शप्पथ.”

त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं जणू तिच्या शब्दांमधून त्याला त्याचं उत्तर सापडलं होतं.

“मग आपण आजपासून एक नवीन नातं सुरू करू? नाव नसलं तरी दोघांनाही माहीत असलेलं?”

ती काही बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांत एकदम स्पष्ट उत्तर होतं. पाणीही होतं, आणि हसूही.

हात आपसूक हातात गेले.

कोणी काही ठरवलं नाही, कबूल केलं नाही पण एक नातं तिथंच, त्या रात्री, नजरांमधून जन्माला आलं. क्रमशः

सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती
-सौं.जान्हवी साळवे.(मुंबई)

🎭 Series Post

View all