Login

आमच्या लग्नाची गोष्ट

लग्न झालं. या नंतर एखादा महिना उलटला असेल, तिच्या माहेरी चर्चा सुरू झाली होती की लग्न तर झालंच आ??

आमच्या लग्नाची गोष्ट

माझ्या मित्राचं किराण्यांचं दुकान होतं. सुटीचा दिवस असल्याने, त्या दिवशी दुपारी चार वाजले असावेत, मी आणि एक दोन मित्र त्याच्या दुकानात गप्पा मारत बसलो होतो. दुपारची वेळ असल्याने दुकानात गर्दी नव्हती. अश्या वेळी दुकानात एक सुंदर मुलगी आणि तिची आई दुकानात आल्या, त्यांनी सामानाची यादी दिली आणि सामान बांधून ठेवा आम्ही बाजारातून जाऊन येतो असं सांगून गेल्या. १९७८ सालातली गोष्ट आहे. त्या वेळेस मुलींवर कमेन्ट किंवा चर्चा करणं, इतके आम्ही पुढारलेले नव्हतो. संस्कारच वेगळे होते. मुलगी दिसली की जरा घाबरायलाच व्हायचं. असो. थोड्या वेळाने मी घरी आलो आणि पुस्तक वाचत बसलो.

थोडा वेळ गेला आणि फाटक वाजलं. मी मान वर करून बघितलं आणि सर्द झालो. त्या बाई आणि ती सुंदर मुलगी फाटक ओलांडून आत येत होत्या. तक्रार करायला आल्यात की काय? असा विचार करून जाम घाबरलो. मनातल्या मनात उजळणी करत होतो की दुकानात काही उणा दुणा शब्द बोलल्या गेला का याची. पण तसं काही बोलल्याचं आठवेना. शेवटी जो होगा देखा जाएगा असा विचार करून गप्प बसलो. त्या काळात बंद दाराची प्रथा नव्हती. दार उघडच होतं. दोघी घरात आल्या. दोघींच्या  हातात भाजी आणि सामानाच्या पिशव्या.

“शांताताई आहेत का?” – त्या अनोळखी बाईंनी विचारले.

मी नुसतीच मान हलवली.

हुश्श करून त्यांनी पिशव्या खाली ठेवली आणि मुली कडे वळून म्हणाल्या,

“तू बस इथेच मी शांताताईंशी बोलून येते.”

आईशी वाद घालण्याची त्या काळात कोणाची प्राज्ञाच नव्हती. ती बसली खुर्चीवर.  आता ती आणि मी समोरा समोर. काय बोलायचं सुचेचना. शेवटी धीर करून विचारलंच.

“माझी तक्रार करायला आला आहात का?” – मी

“तुमची तक्रार?” कशाकरिता?” – मुलगी.

“नाही, आम्ही दुकानात बसलो होतो म्हणून मला वाटलं” – मी

“तुमच्या दुकानात तुम्ही बसणारच ना? यात तक्रार करण्या सारखं काय आहे? माझ्या आईचं तुमच्या आईशी काही काम आहे म्हणून आलो.”- मुलगी

“असं होय? दुकान माझ्या मित्राचं आहे, आणि आम्ही तिथे गप्पा मारत बसलो होतो, म्हणून मला वाटलं की काही चुकलं की काय माझं?” – मी

आणि ती दिलखुलास खळखळून  हसली. एकदम वातावरणात मोकळेपणा आला. सर्व दडपण निघून गेलं. आता मी मान वर करून बघितलं. गोऱ्या मुलींमद्धे सुद्धा उठून दिसणारा गोरापान रंग, हसरा चेहरा, नाकी डोळी रेखीव थोडक्यात आकर्षक मुलगी होती. निळ्या रंगाची त्यावेळेस फेमस असलेली सॅटिन पट्टा साडी नेसून आली होती. तिच्या गोऱ्या रंगावर खूपच खुलून दिसत होती. मला तर काय बोलावं हेच सुचत नव्हतं. शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं.

“काय करता तुम्ही?”

“काहीच नाही.” – मुलगी.

“म्हणजे?” – मी

“शिक्षण पूर्ण झालं.” – मुलगी.

“काय शिकलात?” -मी

“मी B.Sc. केलं. मग B. A. केलं. मग B.LIB.Sc. केलं.” – मुलगी

“B.LIB.Sc? हे काय असतं.”- मी

“लायब्ररी सायन्स मधली डिग्री आहे.” – मुलगी.

“आपण लायब्ररी मधे जातो पुस्तक घेतो, वाचून झाल्यावर वापस करतो. यात सायन्स कुठे आलं? – माझा भाबडा प्रश्न

“खूप मोठा विषय आहे. मोठ्या लायब्ररी मधे जर तुम्ही गेलात, तर ते तुम्हाला कॅटलॉग  मधून नंबर आणायला सांगतात.” – मुलगी

“हो यूनिवर्सिटी लायब्ररी मधे असतं असं.” – मी

“आता समजा तुम्हाला पू.ल. देशपांड्यांचं अपूर्वाई पाहिजे आहे, तर तुम्ही काय कराल? ऑथर कॅटलॉग बघाल त्यात पू.ल. देशपांड्यांचं नाव शोधाल, त्यात अपूर्वाई शोधाल आणि त्या कार्ड वरचा नंबर काऊंटर वर द्याल. आता समजा तुम्हाला लेखकाचं नाव माहीत नाही, मग तुम्ही प्रवास वर्णन हा कॅटलोंग बघू शकता, ललित वाङमय यात सुद्धा अपूर्वाई तुम्हाला मिळू शकेल.” – मुलगी.

“बस? एवढ्या साठी डिग्रीचा विषय?” – मी

“असं कसं खूप विभाग असतात. एक कथा हा विभाग. त्यांचे पोट विभाग पडतात. कथा, लघु कथा, दीर्घ कथा, अति लघु कथा विनोदी, भय, विचित्र, रहस्य वगैरे. असेच सर्व विषयांमध्ये पोट विभाग असतात. जसं फिज़िक्स हा विषय घेतला तर अप्लाइड फिज़िक्स, न्यूक्लियर फिजिक्स अॅस्ट्रो फिजिक्स, आणि अनेक . असंच सर्वच विषयांमध्ये असत. आता तुम्ही कॅटलॉग मधून नंबर काढून आणला, तर तो  काय असतो? समजा H1/3R/5L/T6/11. आता याचा अर्थ काय? तर हा पुस्तकाचा पत्ता आहे. हॉल नंबर १, थर्ड रो, फिफ्थ लाइन, सिक्स्थ रॅक फ्रॉम टॉप, आणि डावीकडून ११ नंबरचं  पुस्तक.” – मुलगी.

‘बापरे माझं तर डोकच गरगरायला लागलं. आमच्या वेळेच्या सर्व कथा कादंबऱ्यामधे  सुंदर मुलींचं वर्णन म्हणजे “वरचा मजला रिकामा” असंच असायचं. पण हे प्रकरण भलतंच तिरपागडं दिसत होतं.’

तेवढ्यात माझे वडील आले, त्यांनी खुणेने विचारलं की कोण? मी सांगितलं की आई कडे यांच्या आईचं काही काम आहे म्हणून आल्या आहेत. खरं म्हणजे मला एका मुली बरोबर बोलतांना पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाबा आत गेले आणि थोड्या वेळाने  त्या मुलीची आई हसत हसत  बाहेर आली. म्हणाली,

“बरय येतो आम्ही. आता हे नागपूरला आले की दोघंही येऊ.” आईने हसून मान डोलावली. ते लोकं गेले. ते गेल्यावर आईने विचारलं.

“काय रे एवढा वेळ बोलत होतास, कशी वाटली? पसंत आहे का मुलगी?”

“म्हणजे? हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता का?” - मी

“नाही, सगळं अचानकच घडलं. गाठी देवच बांधतो हेच खरं.” – आई.

“हा काय प्रकार आहे? मला समजेल असं सांग.”- मी

“अरे आज आपल्या कडे यायची त्यांची तिसरी वेळ आहे. प्रथम आल्या तेंव्हा तुला नुकतीच नोकरी लागली होती म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की जरा स्थिर स्थावर झाल्यावर बघू. दुसऱ्या वेळेस तुझी कंपनीच बंद पडली होती आणि तू नोकरीच्या शोधात होतास. म्हणून नाही म्हंटलं. आता आज सगळं व्यवस्थित आहे म्हणून हो म्हंटलं. तसं या लोकांना मी नेहमीच अहल्या मंदिर मधे पाहिलं आहे. एक दोन वेळी बोलले पण आहे. उत्तम स्थळ आहे. आणि तुझी अट पण पूर्ण होते आहे. हो म्हणून टाक.” – आई.

अहल्या मंदिर म्हणजे RSS च्या महिला शाखेचे प्रधान कार्यालय. माझी अट म्हणजे मी फक्त एकच मुलगी पाहीन आणि तिलाच  होकार देईन, अशी होती. तिनेच नकार दिला तर लग्नालाच बाय बाय. मुलींच्या मान सन्मानाशी खेळणं मला मान्य नव्हतं. ही गोष्ट कोणालाच पटली नव्हती, पण शेवटी सगळ्यांनी ऐकलं. आता ही मुलगी पहिलीच आणि या मुलीला नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. पण एक गोष्ट होती ती मी विचारली.

“गेली तीन वर्ष या गोऱ्या आणि देखण्या मुलीचं लग्न कसं जमलं नाही?” – मी.

“मंगळ, तिला मंगळ आहे. म्हणून. आम्हाला पत्रिका बघायची नाहीये, तू ला काही अडचण आहे का?” -बाबा.

“नाही. अजिबात नाही. जाऊया पुढे. पण ती एवढी देखणी, तिन तीन डीगऱ्यां आहेत तिच्या जवळ. मी सामान्य. माझ्या जवळ फक्त इंजीनीरिंग ची डिग्री, नोकरी सामान्य, आपली परिस्थिती सामान्य, हे जुळणार कसं?” – मी

“जाता जाता फाटकातच तिच्या आईने तिला विचारलं. आणि तिने पण होकार दिला आहे मला दिसत होतं ना खुश दिसत होती.” – आई.

लग्ना आधी एकदा मी तिला विचारलं की,

“मला बिझनेस करायचा आहे, तेंव्हा सुरवातीची एक दोन वर्ष जम बसायला लागतात, तेंव्हा तू नोकरी करायला तयार आहेस का? म्हणजे दोन वेळेच्या जेवणाची चिंता नसेल. तेंव्हा ती म्हणाली,

“मला आवडेल नोकरी करायला.” - मृदुल (बायकोचं  माहेरचं नाव.)

पण जेंव्हा मी नोकरी सोडून व्यवसायात प्रवेश केला तेंव्हा तिने नोकरी करायला साफ नकार दिला. म्हणाली,

“मला सुखात राहायचं आहे. नोकरीची कट कट करायची नाही.” असं उत्तर दिलं. मी तिला आठवण करून दिली तेंव्हा म्हणाली की,

“ज्या दिवशी आपण प्रथम भेटलो, तेंव्हापासून तुम्हीच माझ्या डोळ्या समोर आहात, नोकरी करणार नाही असं म्हणून तुम्हाला गमवायचं नव्हतं. आपण पिठलं भात खाऊन राहू, मी मुळीच तक्रार करणार नाही.” – मृदुल.

लग्न झालं. या नंतर एखादा महिना उलटला असेल, तिच्या माहेरी चर्चा सुरू झाली होती की लग्न तर झालंच आहे पण एकदा पत्रिका बघू, काय आहे मुलीच्या आयुष्यात ते तरी कळू दे. पत्रिका बघितल्या, आता गुरुजींनी काय सांगितल?

“हे लग्न झालंच कस? मेष कन्या षडाष्टक आहे मुलगी केंव्हा माघारी येईल हे सांगता येत नाही. अतिशय कष्ट आहेत मुलीच्या वैवाहिक जीवनात.” – गुरुजी.

मंडळी आज आमच्या सहजि‍वनाला पंचेचाळीस वर्ष झाली आहेत. आणि कुठल्याही सुखाची कमतरता नाहीये.

धन्यवाद.

दिलीप भिडे