आयत्या पिठावर रेघोट्या अंतिम भाग

काही लोकांना दुसऱ्यांच्या कामात खोड काढायची सवयच असते

आयत्या पिठावर रेघोट्या अंतिम भाग

मागच्या भागात आपण पाहिलं की सासुबाईंना शनी प्रदोषाची पूजा करायची आहे आणि पूजेच्या पूर्वतयारी करिता त्या सुनेला एकसारख्या हाका मारत आहेत.

“गौरी! अग ए गौरी! अगं देवघरातली घंटी कुठे आहे? दहीभात, चांदीच्या वाटीत लोणी खडीसाखर ठेवायला सांगितलं होतं, इथे कुठे मला ते दिसत नाही. हे बघा या आज कालच्या मुलींचं असं असतं. कालच रात्री म्हटलं होतं, उद्या माझी प्रदोषाची पूजा आहे, तर तांब्याचा गडवा, ताम्हण, आचमनाची पळी, देवाचा पाण्याचा गडू, घंटी, ही सारी देवाची तांब्याची भांडी घासून स्वच्छ करून ठेव. ती भांडेवाली चार घरी जाते. दहा घरी खाते, तिच्याकडून कशाला देवाची भांडी घासून घ्यायची? देवाची सेवा आपण स्वतःच नको का करायला? पण नाही! आपण कितीही कानी कपाळी ओरडा या घरात कुणालाही काहीही फरक पडत नाही.” सासुबाईंचा वैताग त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. सासूबाईंनी देवाची सगळी भांडी उचलली आणि त्या स्वयंपाकघरात चिंच शोधू लागल्या.

पुजेकरिता त्यांना देवाची सगळी भांडी अगदी लख्ख चमकलेली हवी असायची.

“या गौरीच्या हाताला ना नीट वळणच नाही! एक वस्तू या स्वयंपाक घरात सापडेल तर शपथ! अग गौरी चिंच कुठे ठेवली आहेस? निदान तांब्याची भांडी घासायची पावडर किंवा लिंबू तरी दे बाई!” सासूबाईंचा संयम हळूहळू सुटत चालला होता.

तेवढ्यात रुद्र तिथे आला. “काय झालं आई? काय पाहिजे तुला? कशासाठी इतकी गडबड सुरू आहे?” रुद्रने सासूबाईंना विचारले.

“बरं झालं तू आलास ते! अरे आज माझं शनि प्रदोषाचे व्रत आहे ना! पण हे बघ गौरीने ही पूजेची भांडी स्वच्छ केलीच नाही! तुला माहिती आहे ना माझ्या या व्रतामध्ये मला कुठलीही उणीव चालत नाही. तिला, मी कालच सांगून ठेवलं होतं, की बाई पूजेची सगळी व्यवस्थित तयारी करून ठेव. पण आता मला आधी ही देवाची भांडी घासावी लागतील, त्यानंतर महादेवाला अभिषेक आणि मग बेल वाहायला तर रात्रीचे नऊ वाजतील.” सासुबाईंनी आवाजात शक्य तितका संयम ठेवून रुद्रला स्वतःची अडचण सांगितली.

“आई काल एकादशी होती. विठ्ठला करिता एकशे आठ मंजुळा, विष्णुसहस्त्रनामाची पोथी, आणि इतर बरीच बारीक सारीक पूजेची तयारी तू गौरी कडूनच करून घेतली होती. आणि गौरीने तुला दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं, की पिहूची तोंडी परीक्षा सुरू झाली आहे. आजही तिने पूजेची सगळी तयारी केली, आहे तरीही तुझं समाधान होत नाही. आज-काल पहिल्या वर्गातही मुलांना पुष्कळ अभ्यास असतो. पण तरीही तुला गौरी सतत हाताखाली लागते. इतर वेळी ठीक आहे पण निदान परीक्षेच्या वेळी तरी गौरीला पिहूचा अभ्यास घेऊ देत जा. तुझ्याच्याने जेवढी झेपेल तेवढीच पूजा आणि व्रतवैकल्य कर. उगीच गौरीच्या जीवावर आयत्या पिठावर रेघोट्या मारू नकोस.”

रुद्रचे हे कडक शब्द सासूच्या जिव्हारी लागले होते. पण आता वय झाल्याने, त्याना घरातली फारशी कामं होत नव्हती. अगदी पूजेची तयारीही गौरीच करून द्यायची. त्यातही पंधरवडी एकादशी, संकष्ट चतुर्थी, आणि इतर अनेक व्रते आणि पूजा त्या करायच्या. इतक्या वर्षांचा शिरस्ता त्यांना मोडवत नव्हता आणि गौरीला बोलल्यावल्या शिवाय त्यांची पूजा सुफळ संपूर्ण ही होत नव्हती.

काही दिवसानंतर गौरीच्या कानावर परत शब्द पडले. “अग गौरी आज संकष्ट चतुर्थी अथर्वशीर्ष कुठे ठेवलं आहेस? माझी जपाची माळ दिसत नाही आहे, माझ्या गणूल्याला एकवीस मोदक करायचं विसरू नकोस हो! आज एकही लाल फुल, फुलांच्या परडीत दिसत नाही आहे! अंगणातल्या जास्वंदाचं तोडून आण पटकन. दुर्वा तरी एकवीस काढल्या आहेस की नाही?” रुद्र आणि गौरीने एकमेकांकडे बघून मंदस्मित केले. आणि गौरी अंगणात जास्वंदाचे लाल फुल आणि दुर्वा काढायला गेली.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून, लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.



 

🎭 Series Post

View all