Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग १०

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग १०

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ आवरून आर्यव्रत आणि श्रेयसा तिच्या माहेरी जाण्यासाठी घरातून निघाले. रेवती ने फोन करून ते येणार असल्याची कल्पना आधीच दिली होती म्हणून त्या घरातही उत्साहाचे वातावरण होते. आपल्या घरचा जावई आणि आपली लेक लग्ना नंतर पहिल्यांदाच माहेरी येत होते म्हणून घरात ही छान तयारी चालू होती...

काही वेळातच ते लोक श्रेयसा च्या घरी पोहोचले. श्रीकांत आणि सुरभी दोघेही बाहेर असलेल्या झोपाळ्यावर बसूनच त्या दोघांची वाट पाहत होते.

" या... या जावईबापू... या घरात तुमचे स्वागत आहे.. " त्यांची गाडी थांबलेली पाहून श्रीकांत लगेच आपल्या जागेवरून उठून पुढे आले..

आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेही गाडीमधून खाली उतरले आणि पुढे येऊन श्रीकांतच्या पाया पडले.

" सदा सुखी रहा... " श्रीकांतने त्या दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिले. बाजूलाच सुरभी उभी होती. आपल्या मुलीच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होती. जेव्हा या लग्नाबद्दल तिला सांगितले होते तेव्हा तिचा तो मलुल झालेला चेहरा अजूनही त्यांच्या नजरेसमोर फिरत होता. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यांनाही बरं वाटलं.

त्या दोघांनी पुढे येऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले. सगळे घरात आले. सुरभीने खास रेवतीला विचारून सगळे पदार्थ आर्यव्रत च्या आवडीचे बनवले होते. आत हॉलमध्ये बसून सगळ्यांच्या गप्पा आणि नाश्ता झाला.

" मम्मी,  मी माझ्या रूम मध्ये जाते...  मला थोडे सामान घ्यायचे आहे. " श्रेयसा बोलून तिकडून रूमच्या दिशेने जायला निघाली होती की,  सुरभीने आवाज देऊन तिला थांबवले.

" अगं,  अशी एकटीच काय जात आहे. जावईबापू पण पहिल्यांदाच घरी आले आहे त्यांना आपले घर तरी दाखव आणि मग तुझ्या रूममध्ये घेऊन जा... त्यांना ही थोडावेळ आराम करू दे.. " सुरभी तिच्याकडे पाहून तिला म्हणाली.

" पण मम्मी... " श्रेयसा ला तिच्या रूममध्ये निवांत असा वेळ घालवायचा होता... खूप दिवसानंतर ती स्वतःच्या घरी स्वतःच्या रूममध्ये आली होती आणि त्यातही आता जर आर्यव्रत तिच्यासोबत तिच्या रूममध्ये आला तर तिला मनसोक्त असं आपल्या रूम मध्ये बसता येणार नव्हतं.. सध्या तरी तिला तिचा प्रायव्हेट असा टाईम पाहिजे होता...

" तुझी मम्मी एकदम बरोबर बोलत आहे.. मी पहिल्यांदाच तुमच्या घरी आलो आहे तर मला तुमचे घर तरी दाखवा आणि हो, मलाही माझ्या बायकोची रूम बघायला आवडेल. त्याच निमित्ताने तिच्या आवडीनिवडी तरी समजतील. मी जातो हा तिच्यासोबत. " सुरभी काही बोलायच्या आधीच आर्यव्रत पुढे बोलून मोकळा झाला. आज पहिल्यांदाच तो त्यांच्या घरी आलेला असतो त्यामुळे कोणासोबत काय बोलावे हेच त्याला समजत नसते. सगळे व्यवस्थित बोलत असताना देखील एक वेगळाच ऑकवर्डनेस त्यांच्यामध्ये जाणवत होता म्हणून त्यालाही थोडा वेळ आरामासाठी वेगळ्या रूम मध्ये जाऊन बसण्याची इच्छा होती. सुरभीने अगदी त्याच्या मनातली गोष्ट त्याला बोलून दाखवली होती.

" हो... जा ग जावईबापूंना घेऊन जा... " सुरभी हसून त्या दोघांकडे पाहून म्हणाली.

" चला... " श्रेयसा तोंड वाकडं करत त्याच्याकडे पाहून म्हणाली आणि पुढे चालू लागली.

" आपली लेक त्यांच्या घरात सुखाने नांदत आहे. त्या घरातले सगळे तिच्यासोबत व्यवस्थित वागत असतील म्हणून तर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं ? " श्रीकांत त्या दोघांना गेलेल पाहून सुरभी ला विचारतात.

" हो sss म्हणजे बघा ना ज्या दिवशी आपण तिला लग्नाची बातमी दिली होती त्या दिवसापासून तिचा चेहरा उदास झाला होता, पण आज मात्र असे काही वाटत नाही. काल तिच्या सासूचा फोन आला होता आणि ते  ज्या प्रकारे बोलत होते मला ऐकून बरं वाटलं आणि आज तिचा चेहरा पाहून तर खात्री पटली की, आपली मुलगी तिकडे आनंदात आहे. " सुरभी आनंदाने त्यांच्याकडे पाहून म्हणाली आज तिच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होते.

" ठीक आहे... तुम्ही जावईबापू च्या जेवणाची तयारी करा तोपर्यंत आम्ही गावात एक फेरफटका मारून येतो... " श्रीकांत बोलून बाहेर निघून जातात.

श्रेयसा त्याला आपले पूर्ण घर फिरून दाखवते त्यानंतर ते दोघेपण तिच्या बेडरूम मध्ये येऊन बसतात.

श्रेयसा ची बेडरूम त्याच्या बेडरूम एवढी मोठी नसली तरी अगदी टाप टीप होती. तिच्या स्वभावात असलेली चंचलता बेडरूम मध्ये असलेल्या डेकोरेशन वरून दिसून येत होती. तिच्या बेडरूमच्या प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या रंगाच्या छटा होत्या, फुलांचे शोपीस, काही अँटिक कलेक्शन तिच्या बेडरूम मध्ये दिसून येत होते.

" तुझी बेडरूम ही खूप छान आहे. " आर्यव्रत तिच्या बेडवर बसून सगळीकडे नजर फिरवत म्हणाला.

" हो , पण तुमच्या बेडरूम एवढी मोठी नाही.. " श्रेयसा त्याला बेडवर बसलेले पाहून शांत आवाजात म्हणाली. तिच्या बेडवर त्याने असे येऊन बसलेलं तिला आवडले नव्हते परंतु ती काही बोलूही शकत नव्हती. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कपाटात असलेले डॉक्युमेंट्स एका बॅगमध्ये भरू लागली.

" मोठी नसली तरी खूप सुंदर आहे. तुझ्या या रूम कडे पाहून असे जाणवते की, तुझा स्वभावही असाच चंचल असावा.. त्या घरात त्या रूममध्ये राहायला तुला आवडत नसेल ना ? " अचानक आर्यव्रत ला काही आठवते आणि तो तिच्याकडे पाहून तिला विचारतो...

" असे काही नाही.. " ती एक नजर त्याच्याकडे पाहून उत्तर देते..

" मला पहिल्यापासूनच अशा वेगवेगळ्या रंगांची सवय नाही त्यामुळे माझ्या रूममध्ये तुला सगळं सिम्पल आणि सोबर दिसेल... मला पुस्तक वाचण्याची सवय आहे त्यामुळे मी बेडरूम मध्ये छोटा स्टडी रूम बनवला जेणेकरून जेव्हा कधी मला इच्छा झाली की , मी तिकडे बसून वाचन करतो. त्याच्या बाजूलाच अजून एक छोटा रूम आहे तिकडे जिम इक्विपमेंट्स आहेत. सकाळी लवकर उठल्यावर तासभर जिम मध्ये कसरत केल्यानंतर मग पुढची काम करण्याची माझी सवय आहे. " आर्यव्रत तिला सगळे आपल्या आवडीनिवडी सांगू लागतो.

श्रेयसा आपली बॅग भरत शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते.. आज पहिल्यांदाच तो इतक्या मोकळेपणाने तिच्या सोबत बोलत होता त्यामुळे तिलाही आश्चर्य वाटत होते आणि छानही वाटत होतं...

" माझी बॅग भरून झाली आहे... आपण खाली जाऊया का ? " श्रेयसा

" तू जा... मी इकडेच थोडावेळ आराम करतो.. तसेही मला ऑफिसमध्ये एक दोन कॉल करायचे आहे... " आर्य म्हणाला.

" ओके... मी खाली मम्मीकडे जाते... " श्रेयसा बोलून तिकडून खाली आपल्या आईजवळ किचन मध्ये येते...

आर्य आपला मोबाईल घेऊन तिच्या रूम मध्ये असलेल्या बाल्कनी मध्ये जाऊन बसतो आणि त्याचे महत्त्वाचे फोन अटेंड करतो...

" मम्मी, अगं हे काय ? एवढ सगळं बनवण्याची काय गरज होती ? " श्रेयसा स्वयंपाक घरात आल्याबरोबर बनवलेले पदार्थ पाहून आश्चर्याने आपल्या आईला विचारते...

" अगं , जावईबापू आज पहिल्यांदाच आपल्या घरी आले आहेत..  मग हे सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले आहे... त्यांना ही ते आवडले पाहिजे. " सुरभी काळजीने म्हणाली...

" अगं तुझा जावई पण आपल्यासारखाच माणूस आहे... तोही आपल्या एवढच जेवण खातो... त्याच्यासाठी एवढं सगळं बनवण्याची काही गरज नव्हती... " श्रेयसा आपल्या आईच्या चेहऱ्यावर असलेली चिंता पाहून म्हणाली...

" मी त्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ थोडे थोडे बनवून ठेवले आहे...  त्यांना जे खाण्याची इच्छा असेल ते खातील... आज पहिल्यांदाच ते आपल्या घरी आले आहेत त्यामुळे इकडेही त्यांना स्वतःच्या घरासारखे वाटावे एवढीच अपेक्षा आहे...  " सुरभी आपल्या हातात असलेले काम करत तिला सांगते...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all