डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
दीर्घ कथालेखन स्पर्धा.
अनिश्चित बंधन... लग्न! भाग ३
श्रेयसा ची गाडी मंडपात जवळ येऊन पोहोचली... गावातील बायकांकडून विधिवत त्यांचे स्वागत करण्यात आले. तिकडे नववधू साठी असलेल्या एका खोलीमध्ये तिला नेऊन बसविण्यात आले. शांत मनाने श्रेयसा त्या खोलीमध्ये बसली होती. तिच्या मेकअप करण्यासाठी असलेल्या त्या दोन मुली आणि तिच्या मैत्रिणी ही त्या खोलीमध्ये तिच्यासोबत बसल्या होत्या.
बाहेरून येणाऱ्या ढोल ताशांचा आवाज जसा तिच्या कानावर पडू लागला तशी तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली.
" नवऱ्या मुलाची वरात आली आहे. चला आपणही बघायला जाऊया. " तुझ्या एका मैत्रिणीचा आवाज तिच्या कानामध्ये घुमला. जवळ बसलेल्या तिच्या मैत्रिणी अति उत्साहाने नवऱ्याची वरात पाहण्यासाठी बाहेर निघून गेल्या. श्रेयसा मात्र तिकडेच बसून स्वतःच्या शरीराची होणारी थरथर थांबवण्याचा प्रयत्न करत होती.
श्रेयसा ची आई सुरभी नवरदेवा चे स्वागत करण्यासाठी मंडपाच्या दारापाशी येऊन उभी राहिली. नवरदेवाचे विधिवत स्वागत करण्यात आले. आर्यव्रत आणि त्याची फॅमिली स्टेज च्या दिशेने चालत येत असताना आजूबाजूला बसणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांकडून त्यांच्यावर पुष्पृष्टी झाली. गावचे प्रतिष्ठित गुरुजी लग्नाच्या सगळ्या विधी करण्यासाठी स्टेजवर आधीच येऊन बसले होते.
आर्यव्रत च्या समोर मोठा पांढऱ्या रंगाचा कपडा धरण्यात आला आणि गुरुजींनी मंगलाष्टक म्हणण्यात सुरुवात केली. श्रेयसा ला तिच्या मैत्रिणी त्या खोलीमधून बाहेर घेऊन आल्या आणि ती स्टेज च्या दिशेने पुढे जात असताना तिच्यावरही सगळ्या गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी केली. श्रेयसा मात्र खाली मान करूनच आपल्यासमोर येणाऱ्या अनिश्चित बंधनाच्या वाटेवर चालत होती. तिला पडद्याच्या अलीकडे उभे करण्यात आले. दोघांच्याही हातामध्ये फुलांच्या वरमाला देण्यात आल्या.
गुरुजी मोठ्या आवाजात मंगलाष्टक म्हणत होते परंतु त्या दोघांच्याही कानावर कोणतेच शब्द पडत नव्हते.
’ आज आपल्या आयुष्यात असा दिवस कसा आला आणि उद्यापासून आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत. ’ याबद्दल असत्या दोघांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू होते.
अचानक त्या दोघांच्या मध्ये असलेला पांढऱ्या रंगाचा कापड बाजूला झाला आणि दोघांनीही आपली नजर फिरवत एकमेकांकडे पाहिले. आज त्यांनी प्रत्यक्षपणे आणि पहिल्यांदा एकमेकांना इतक्या जवळून निरखून पाहिले होते. ते ही रागाने!
" चला, एकमेकांना वरमाला घाला... " ते दोघे फक्त शांत उभे आहे हे पाहून शेवटी गुरुजी म्हणाले. आर्यव्रत ने एक पाऊल पुढे करून तिच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. श्रेयसा अजूनही रागाने त्याच्याकडे पाहत होती.
" बाळा, तू ही नवरदेवाच्या गळ्यामध्ये वरमाला घाल. " तिला अजूनही तशीच उभा पाहून तिची आई हळूच पुढे आली आणि तिच्या हात पकडून हलकाच उंचावला. श्रेयसा ने ही मनात नसताना त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. त्याचबरोबर बाहेर पुन्हा एकदा मोठमोठे आवाजात ढोल ताशा वाजू लागले. सगळ्या गावकऱ्यांनी त्या दोघांच्या अंगावर अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या टाकायला सुरुवात केली.
हळूहळू त्या मंडपामध्ये त्या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी पार पडत गेले. आर्यव्रत ने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. ते पाहून तिचे मन भरून आले. डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहू लागले. तिच्या माथ्यावर आर्यव्रत च्या नावाचे कुंकू लावण्यात आले.
आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेपण नवरा बायकोच्या वेशामधे वर स्टेजवर उभे होते आणि त्यांच्या लग्नासाठी आलेले सगळे गावकरी एक एक करून त्या दोघांची भेट घेत होते आणि त्यांच्या हातात त्यांच्यासाठी आणलेली भेट वस्तूही देत होते.
त्यांच्या लग्नाचा सोहळा अगदी बराच वेळ चालला होता. दोन्ही गावच्या सगळ्या गावकऱ्यांसाठी जेवण असल्यामुळे जेवणाच्या बराच पंगती बसल्या होत्या. अजूनही स्टेजवर त्या दोघांना भेटण्यासाठी गावकऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ते दोघे ही स्टेज वर उभे राहून वैतागले होते.
हळूहळू मंडपातल्या माणसांची वर्दळ कमी होऊ लागली. नवरा नवरीला स्टेजवरून खाली बोलावून जेवणाच्या पंगतीमध्ये बसवण्यात आले. ती पंगतही अगदी भली मोठी होती. त्या दोघांचीही फॅमिलीतले माणसं, गावातील सरपंच, गावातील इतर मुख्यमंडळी असे सगळे मिळूनच त्या पंगतीला बसले होते.
सगळेजण अगदी आनंदाने एकमेकांशी गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होते परंतु आर्यव्रत आणि श्रेयसा मात्र समोर वाढलेले अन्न जबरदस्ती आपल्या पोटामध्ये ढकलण्याचे काम करत होते. त्या दोघांनाही इच्छा तर अजिबात नव्हती पण इतक्या सगळ्या माणसांसमोर काही बोलताही येत नव्हते.
शेवटी वेळ आली ती विदाईची!
आज मनामध्ये आपल्या आई-वडिलांच्या विरुद्ध कितीही राग असला तरी लहानपणापासून त्यांनी जीव लावला होता. आता त्यांना सोडून एका अनोळखी घरामध्ये जायचे या विचारानेच तिचे मन भरून येत होते आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते.
" बाळा, सावर स्वतःला. तुझ्या आई वडील कायम तुझ्या सोबत असतील. तुला कधीही गरज वाटली तरी आम्ही लगेच तुझ्याजवळ येऊ. पण आता यापुढे तुला समजदारीने सगळी पावलं उचलायची आहे. हे लग्न जरी तुझ्या मनाविरुद्ध झालं असेल तरी पुढे जाऊन असे काही करू नको की जेणेकरून तुझ्या आई वडिलांना मान खाली घालावी लागेल. " तिची आई सुरभी तिच्या गळ्यामध्ये पडून रडक्या स्वरात म्हणाली.
" इनामदार साहेब ! आमची एकुलती एक पोर आम्ही तुमच्या पदरात घालत आहे. मागच्या सगळ्या गोष्टी विसरून तिला मोठ्या मनाने स्वीकारा. तुझ्याकडून काही चूक झाली तरी आपली लेक समजून तिच्या सगळ्या चुका पदरात घ्या. " श्रीकांत हात जोडून हळव्या स्वरात म्हणाले.
" तुम्ही काहीही काळजी करू नका. आता ती फक्त तुमची पोर नाही आमच्या घरची लक्ष्मी आहे. आज पासून आमच्या घरात सगळ्यात जास्त मान तिला दिला जाईल. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आमच्या घरात तिला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही याची काळजी आम्ही स्वतः घेऊ. आमच्या घरामध्ये लेकीची कमी होती. तुमची मुलगी आमच्या पदरात टाकून तुम्ही आमच्यावर उपकार केले आहे. आम्ही तिला अगदी आमच्या लेकी प्रमाणे ठेवू... ” आदित्य राज त्यांच्या हातावर आपला हात ठेवून त्यांना आश्वासन देऊ लागले.
नवरदेवासाठी आणि नवऱ्या मुलीसाठी एक गाडी अगदी सुंदर फुलांनी सजवण्यात आली होती. त्या गाडीवर त्या दोघांचे नावही लिहिण्यात आले होते. गाडीमध्ये ड्रायव्हर येऊन आधीच बसला होता. आर्यव्रत आणि श्रेयसा दोघांनाही त्या गाडीमध्ये बसवण्यात आले. गाडीच्या पुढे ढोल ताशा वाले उभे होते तर गाडीच्या मागे डी जे चे स्पीकर चालू होते. गावातील बहुतेक मंडळी त्या वरातीमध्ये नाचण्यासाठी शामिल झाली होती. गाडीच्या मागे पुढे दोन्ही बाजूला नाचणाऱ्यांची गर्दी असल्यामुळे गाडी हळू स्पीड मध्ये इनामदाराच्या वाड्याच्या दिशेने निघाली होती.
आर्यव्रत आणि श्रेयसा दोघेही गाडीमध्ये एकमेकांच्या बाजूला मध्ये काही अंतर ठेवून बसले होते. अशावेळी एकमेकांसोबत काय बोलावे हे त्या दोघांनाही सुचत नव्हते. दोघांच्याही मनामध्ये शब्दांचे वादळ उठले होते परंतु मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता.
बराच वेळ गाडीमध्ये एकमेकांच्या बाजूला बसूनही दोघांनी एक शब्दही एकमेकांसोबत बोलला नाही की, नजर वर करून एका नजरेने ही एकमेकांना पाहिले नाही.
गाडी थांबली तशी श्रेयसा ने आपली नजर खिडकी मधून बाहेर फिरवली. तिच्यासमोर इनामदारांचा मोठाच्या मोठा वाडा दिसत होता. वाडा वेगवेगळ्या रंगाच्या मुलांच्या माळांनी आणि दिव्यांनी सजलेला होता. ती गाडीमध्ये बसूनच समोरच्या वाड्याकडे पाहत होती.
" बाळा, खाली उतर... " बाजूने तिला एक नाजूक आवाज ऐकू आला तशी तिने नजर वळवली. आर्यव्रत ची आई रेवती गाडीच्या बाहेर उभी राहून तिला प्रेमाने पाहत होती. आदित्य राज यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि श्रेयसा गाडीमधून बाहेर येऊन उभी राहिली.
" आज पासून हे तुझं घर आहे... तुझ्या हक्काचं! " आदित्य राज यांचा आवाज तिच्या कानामध्ये घुमला आणि तिने पुन्हा एकदा समोर असलेल्या वाड्यावर आपली नजर फिरवली.
" हे... माझं घर! "
क्रमशः
" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा