Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३२

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेमकहाणी
मागील भागात आपण पाहिले की विराज( प्रिशाचा एकतर्फी प्रियकर) प्रिशाला धमकावतो.प्रिशा मात्र त्याला खडे बोल सुनावते.त्यामुळे तात्पुरता का होईना तो हॉस्पिटल मधून निघून जातो.आता पाहुया पुढे..

प्रिशा आणि सुलभाताई ( समीरची आई) धावत समीरच्या रूमकडे गेल्या.

प्रिशाने दरवाजा उघडला.समीर पलंगावर बेशुद्ध पडलेला दिसला. डॉक्टर त्याच्या आजूबाजूला उभे होते. एका नर्सने सांगितलं,
“त्याच्या सलाईन लाईनमध्ये कोणीतरी छेडछाड केली आहे, पण बरं झालं अलार्म वाजला आणि वेळेवर लक्षात आलं. आम्ही इंजेक्शन दिलं आहे.आता तो सेफ आहे."

सुलभाताईंच्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी समीरचा हात धरून देवाकडे याचना केली,
“देवा, माझ्या लेकराला काहीही होऊ देऊ नकोस."

प्रिशा मात्र शांत उभी होती. तिच्या मनात विचारांचा ज्वालामुखी पेटला होता.
‘विराज इथे आलाय, म्हणजे तो शांत बसू शकणार नाही. यावेळी तो फक्त धमकी द्यायला नव्हता आला कारण त्याच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसलं.नक्कीच त्याचा काही तरी मोठा प्लॅन असणार.'

तेवढ्यात एका पोलिस अधिकाऱ्याने रूममध्ये प्रवेश केला.
“कोणीतरी सिक्युरिटी कॅमेरातून सर्व्हिलन्स बिघडवला आहे. तो व्यक्ती हॉस्पिटलच्या मागच्या गेटने पळून गेला.”

प्रिशाच्या डोळ्यात पुन्हा राग चमकला.
ती म्हणाली, “सर, मला त्याच्याबद्दल थोडी माहिती आहे. मी स्टेटमेंट देईन.”

पोलिस अधिकारी म्हणाला, “ठीक आहे, पण सध्या तुम्ही सावध राहा. तुमच्या आणि समीरच्या भोवतीचा धोका अजून संपलेला नाही.”


त्या रात्री प्रिशा जागीच होती. समीर शेजारी झोपलेला होता.सुलभाताईंना देखील डोळा लागला. समीरचा हात हातात घेऊन प्रिशा पुटपुटली,
“तू काहीही झालं तरी माझ्या आयुष्याचं केंद्र आहेस, समीर. या वेळी मी तुला कोणाचंही सावट लागू देणार नाही.”

रात्र संपून पहाट जवळ येत होती. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अजूनही सगळं स्तब्ध होतं. प्रिशा खिडकीजवळ उभी होती.तिच्या मनात अजूनही विराजचा चेहरा फिरत होता. तिच्या हातात अजूनही थरथर होती, पण डोळ्यांत ठाम निर्धार होता.

सुलभाताई झोपेतून उठल्या आणि खुर्चीत बसल्या.झाल्या प्रकरणाने त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्ण उडालेला होता.

त्यांनी नाजूक आवाजात विचारलं,
“प्रिशा, तो विराज कोण आहे? तुला त्याचं नाव कसं माहित?”

प्रिशा काही क्षण शांत राहिली. मग खोल श्वास घेत ती म्हणाली,
“काकू, तो आणि मी कॉलेजच्या दिवसात एकत्र होतो. एकेकाळी तो माझा चांगला मित्र होता, पण नंतर तो मला त्रास द्यायला लागला. एकदा तर त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला होता. त्या घटनेनंतर मी कॉलेज बदललं.मला वाटलं, तो माझ्या आयुष्यातून गेला पण तो परत आला.”

सुलभाताईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती आणि शंका एकाच वेळी उमटली.
“म्हणजे तू आणि तो..”

“नाही काकू!” प्रिशा थरथरत्या आवाजात म्हणाली,
“माझं त्याच्याशी काहीही नातं नव्हतं. मी फक्त समीरवर प्रेम करते.माझं प्रेम खरं आहे, निर्मळ आहे, एकनिष्ठ आहे.”

सुलभाताई काही क्षण शांत बसल्या. त्या म्हणाल्या,
“मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा का हे मी या क्षणी ठरवू शकत नाही, पण आत्ता आपल्याला समीरकडे तसेच तुझ्या बाबांकडे जास्त लक्ष द्यायला हवं ,जेणेकरून इथून आपण सर्व सुरक्षित ठिकाणी जाऊ शकू."

प्रिशाने सुलभाताईंना मिठी मारली आणि एक आश्वासक स्मितहास्य करून ती तिथून बाबांकडे जायला निघाली.

अचानक झालेल्या या थरारामुळे बाबा गांगरून गेले होते.त्यामुळे प्रिशाने आधीच सिस्टरला त्यांच्याकडे थांबायला सांगितले होते.त्यानुसार सिस्टरने बाबांना शांत करून झोपवले होते.

प्रिशा बाबांजवळ आली.त्यांनी अलगद डोळे उघडले.
" बेटा,काय प्रकार घडला इथे? कोण होता तो माणूस? तू ठीक आहेस ना? कोण काय म्हणत होते ते मला काहीच समजले नाही.मी तत्काळ बेशुद्ध पडलो."

प्रिशा म्हणाली,
" बाबा,तुमची मुलगी आहे ना.. तुम्ही काहीही टेंशन घेऊ नका.मी सगळं ठीक करेन.फक्त तुम्ही लवकर बरे व्हा म्हणजे आपण आपल्या घरी सुरक्षित राहू शकू."

दरम्यान, हॉस्पिटलच्या बाहेर काळोखात एक काळा एस.यू.वी.शांतपणे थांबलेला होता.एव्हाना पोलिसांची गाडी गस्त घालून तात्पुरती तिथून निघून गेली होती.

गाडीच्या आत विराज फोनवर बोलत होता,
“प्लॅन बी सुरू करू मित्रा. त्यांना वाटतंय खेळ संपला, पण खरी सुरुवात आता होतेय.मैत्रिणीचा शत्रू म्हणजे आपला मित्र म्हणजेच तू, हा..हा..हा.."

त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं.

विराजचे शेवटचे वाक्य नक्की कोणता गूढ अर्थ सांगतंय? कोण आहे आता प्रिशाचा शत्रू? प्रिशा विराजच्या या नवीन कटाविरुद्ध काय पाऊल उचलेल? सुलभाताईंचा तिच्यावरील विश्वास दृढ होईल का? समीर या सगळ्या घडामोडींना कसे सामोरे जाईल?

क्रमश:

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

( वाचकहो, तुम्हाला ही प्रेमकथा बोअर तर होत नाही ना? या कथेचे किती भाग असावेत असे तुम्हाला वाटते? समीर आणि प्रिशाचा प्रेमसोहळा पाहण्याची तुमची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे का? तुमचे उत्तर नक्की कमेंट करा.मी वाट पाहत आहे.)