Login

आम्ही एकत्र राहतो

एकत्र कुटुंब नेहमी सुखी नसते
आम्ही एकत्र राहतो!

“शुभांगी अगं मला जरा आलं घातलेला चहा देते का? तुझ्यासाठी केलाच असेल ना तू त्यातलाच घोटभर दिला तरी चालेल. म्हटलं सकाळी तू लवकर उठते मी पण आता उद्यापासून काकडा आरतीला जाणार आहे तर आज पासूनच उठायची सवय करावी.” शुभांगीच्या सासुबाई मीनाताई सकाळी साडेपाच वाजताच उठून बसल्या होत्या आणि त्यांना चहा हवा होता.

“आई मी आत्ताच चहा संपवला, तुमच्यासाठी दुसरा करून देते.” आपण केलेला चहा सासूला देता आला नाही याची अपराधी भावना शुभांगीच्या मनात होतीच पण घड्याळाच्या काट्यामागे तिचे पायही पळत होते. दोन जुळ्या मुलींची शाळेची तयारी आणि बहुराष्ट्रीय बँकेमध्ये उच्चपदस्थ असणारा तिचा नवरा यांचे डबे आणि इतर तयारी तीला रात्र थोडी संगे फार वेळ कमी आणि काम जास्त अशी सतत सूचना देत होते.

शुभांगीने झटपट कुकरमध्ये आलू लावले दुसऱ्या शेगडीवर सासूसाठी चहाचं आंदण ठेवलं, तिसऱ्या शेगडीवर मंद आचेवर दूध गरम करून ती अंगण झाडायला गेली. सडा, रांगोळी करून परतल्यावर, तिने गवती चहा आणि आलं टाकून केलेला वाफाळता चहा सासूबाईंना नेऊन दिला.

मुलींसाठी आलूच्या पराठ्याची तयारी करतानाच सासूबाईंनी गुडघे आणि कंबर शेकायला गरम पाण्याची पिशवी मागितली. कणिक भिजवता भिजवता शुभांगीने हात धुतले आणि गरम पाणी गॅसवर चढवले. त्यातच नवरा आळस देत शुभांगीला मागून मिठी मारत होता पण कामाच्या घाई मुळे नवऱ्याचा हा अवेळीचा प्रणय इच्छा असूनही शुभांगीला नकोसा झाला. तेवढ्यात सासूबाईंनी परत आवाज दिला.

“शुभांगी पाणी गरम झालं असेल तर आणून देते का की मीच येऊ तिकडे?” सासुबाईंनी स्वतःच्या खोलीतून पुकारा केला.

शुभांगीने बळेच नवऱ्याची मिठी सोडवली आणि डोळ्यांनीच खूण करून गरम पाण्याची पिशवी नवऱ्याच्या हाती दिली. जाता जाता नवरा शुभांगीच्या कानात पुटपुटला “टिफिन मध्ये आज सँडविच देशील!”

शुभांगीने पटापट आलूचे पराठे केले. तोपर्यंत नवऱ्याने दोन्ही मुलींच्या आंघोळी उरकून घेतल्या होत्या. ब्रेडला टोमॅटो केचप, मेयोनीज, थोडासं तिखट मीठ लावून उकडलेला बटाटा कूचकरून शुभांगीने गरम पराठ्यांच्या तव्यावर, तिघांसाठीही सँडविच ठेवले आणि ती मुलींच्या तयारी करिता पळाली.

मुली तयार होऊन बाहेरच्या खोलीत बसल्या होत्या आणि आजोबा त्यांना शूज घालून देत होते. शुभांगीने टिफिन भरून, पाण्याच्या बॉटल बास्केट मध्ये टाकून, मुलींना शाळेचं दप्तर आणि टिफिन बॅग दिल्या.

मुली व्हॅन मध्ये बसून मुली शाळेत निघून गेल्यावर, नाश्त्या करिता डायनिंग टेबल वर नवऱ्याला आणि सासू-सासर्‍यांना तीने एकेक सँडविच दीलं पण सासूबाईंनी लगेच नाक मुरडलं.

“अग शुभांगी सकाळी सकाळी ब्रेड आणि आलू! इतकं जड जात नाही मला! एक काम करते का? तू मला पटकन ओट्स बनवून दे!” शुभांगीच्या सासूबाईंचं हे नेहमीच असायचं जे काही केलं आहे ते सोडून त्यांना वेगळच काहीतरी हवं असायचं. शुभांगीला आता याची सवय झाली होती. तिने लगेचच सासूबाईंना ओट्स करून दिले आणि आंघोळी करिता पळाली. जाण्यापूर्वी तिने वरण भाताचा कुकर लावला होता आणि कुकरच्या शिट्ट्यांकडे लक्ष ठेवा ही सूचना तिने मीनाताईंना दिली होती.

आंघोळ घेऊन आल्यानंतरही कुकरच्या शिट्ट्या वाजतांना बघून शुभांगीला आश्चर्यच वाटलं शेवटी न राहून तिने सासूला विचारलं “आई तुम्ही कुकरचा गॅस बंद नाही केला का?”

“शुभांगी मी देवपूजे करिता अंगणात फुलं तोडायला गेली तिथेच शेजारच्या दामले काकू भेटल्या त्यांच्याशी बोलण्यात माझं लक्षच नाही राहिलं की तू कुकर लावला आहेस! जाऊदे तू आता गॅस बंद करून टाक.” अगदी सहजपणे मीनाताई बोलून गेल्या.

शुभांगीने नवऱ्याचा टिफिन पॅक केला. तो ऑफिसमध्ये गेल्यानंतर शुभांगी नाश्ता करायला बसली. तेवढ्यात सासरेबुवांची कॉफीची फर्माईश आली. सासरेबुवांची कॉफी उकळेपर्यंत शुभांगीने सँडविचचे दोन-तीन घास तोंडात कोंबले आणि ती तिची खोली आवरायला गेली.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.


0

🎭 Series Post

View all