Login

नव्याने ओळख... या नात्याची! भाग ३ (अंतिम भाग)

एका आई आणि मुलीच्या नात्याची नव्याने झालेली ओळख...
" आई हे तुझं स्वप्न आहे... जे तू कधी पाहिले होते, पण तुझा संसार, तुझं घर आणि मला सांभाळण्यासाठी तू त्या स्वप्नांचा त्याग केलास... लग्न झाल्यानंतर एक बायको, सून, आई म्हणून तू खूप काही शिकण्याचा प्रयत्न केलास पण या सगळ्यांमध्ये तुझं आधी एक स्त्री म्हणून जे स्वप्न होतं ते मात्र पूर्ण करू शकले नाहीस... आज तुझ्या त्या स्वप्नांना पंख देण्याचे काम मी केले आहे... " अन्वी आनंदाने आपल्या आईला मिठी मारत बोलते...

" अन्वी पण मी... " निहारिकाला मनातून इतका आनंद झाला होता की काय बोलावे यासाठी शब्द सुचत नव्हते...

" आई आता तू फक्त माझी आई नसून तर तू स्वतःही कोणीतरी आहे , जिच्याकडून धडे घेऊन मी माझं अस्तित्व निर्माण केले आहे...  हेही आता जगाला समजायला पाहिजे... " अन्वी मात्र आपल्या बोलण्यावर ठाम असते...


अन्वी आग्रह करून आपल्या आईलाही आपल्यासोबत पुढे घेऊन जाते... आता अन्वी आणि निहारिकाचं नातं हे केवळ आई-मुलगी न राहता आई-मैत्रीण-लेखक-सहकारी असं काहीसं झालं होतं... दोघी एकत्र ब्लॉग चालवत होत्या

                   “आईसारखं कोणी नाही”...

नव्या पिढीच्या मुलींसाठी, आणि जुन्या पिढीच्या आईंसाठी, संवादाचा सेतू म्हणून हे लेख वाचले जायचे.....

“आई, मी कधी तरी रडताना तुला बघितलं होतं, पण तू लगेच सावरलीस.. असं का गं?” प्रत्येक मुलीच्या मनात असलेला प्रश्न जेव्हा ती आपल्या आईला रडताना पाहते...

“कारण तू बघतेस म्हणून... आई म्हणजे भिंत नाही गं, पण पडू न देणारी सावली असते.... ” प्रत्येक आईचं आपल्या मुलीसाठी असलेले हे उत्तर, जिच्यासाठी ती स्वतःच्या मनातल्या वेदना विसरून पुन्हा खंबीरपणे उभी राहण्यासाठी समर्थ असते...

दोघी एकत्र मिळून जो ब्लॉग चालवत होते,  त्या ब्लॉगला खूपच रिस्पॉन्स येऊ लागले... या ब्लॉग मुळे अनेक घरातल्या आई आणि मुलीच्या संवाद ला चालना मिळाली... आई आणि मुलीच्या नात्यांमध्ये असलेल्या दरीला हा ब्लॉग भरून काढत होता... अन्वी आणि निहारिका या ब्लॉग मुळे खूपच प्रसिद्ध झाल्या होत्या.... आजूबाजूचे लोक आता त्यांना ओळखू लागली होती....

एका संध्याकाळी, दोघी टेरेसवर चहा घेत बसल्या होत्या.... अन्वी थोडी गंभीर होती...

"आई, मी आता अमेरिकेला फेलोशिपसाठी जाणार आहे ... दोन वर्षं... खूप लांब..." अन्वी ने गंभीरपणे आपल्या आईकडे पाहून सांगितले...

निहारिकाने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला...

“शिकणं थांबवू नको, प्रेम कमी होऊ देऊ नको... आणि आईची सावली दूर गेली तरी तिची ऊब आठवत रहा...” निहारिका कौतुकाने आपल्या लेकीकडे पाहत बोलली...

“आई... मी तुझ्यासारखी होईन का गं?” आपल्या आईचं उत्तर ऐकून अन्वी ने हळव्या स्वरात तिला विचारले...

निहारिकाने डोळे मिटून डोकं हलवलं आणि शांत सांगितले “तू माझ्याहूनही छान आई होशील...”


अन्वी परदेशात गेली, पण प्रत्येक आठवड्याला आईला एक इमेल यायचा.... त्यात शब्द असायचे

"तुझ्याशिवाय मजा नाही, पण तुझं अस्तित्व शब्दांमधून जगतेय... तूच तर माझ्या ओळखीची सुरुवात होतीस... आत्ता ही मी तुझी दिलेल्या विचारांसोबत राहतेय... "

निहारिका त्या प्रत्येक मेलमधून स्वतःला पुन्हा पुन्हा शोधत राहिली....
ती केवळ मुलीची आई नव्हती, ती एका लेखिकेची पहिली प्रेरणा होती..... प्रत्येक आई आणि मुलीचं नातं हे इतकच प्रेमळ असत.. फक्त त्या नात्यांमध्ये योग्य संवाद साधण्याची गरज असते... जर का तुम्ही आपल्या आई सोबत वेळोवेळी योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या आईने त्याला व्यवस्थितपणे समजावले तर तुमच्या दोघींमध्येही इतका सुंदर असा संवाद साधून तुमचे नाते हे केवळ एका आई मुलीचे न राहता एका चांगल्या मैत्रिणीचे नाते होऊ शकते...

अन्वी आणि निहारिका दोघींनी आपल्या मध्ये असलेली वयाची दरी मोडून आपले विचार एकमेकांसमोर मांडले आणि समोरच्याचे बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न केला... आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी एकमेकींसोबत शेअर करून त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला... हा प्रयत्न जर प्रत्येक स्त्रीने आपल्या या आई मुलीच्या सुद्धा नात्यांमध्ये करण्याचा विचार केला तर या नात्यासारखं असे सुंदर नाते आणि आपल्या जवळच असलेली एक जीवाभावाची मैत्रीण सगळ्यांना आपल्या घरातच सापडेल....