Login

ऑपेरेशन सेफ हार्ट भाग -१

Operation Safe Heart
भाग -१

रात्र अधिकाधिक गडद होत चालली होती. समुद्रावर तरंगणाऱ्या लाटा चंद्रप्रकाशात चमचमत होत्या. मुंबईचा गजबजाट काही मैल मागे सोडून समुद्रकिनाऱ्यावर उभं असलेलं जुनं पोलीस प्रशिक्षण केंद्र मात्र आज हि दिमाखात उभे होतं. जोराचा वारा आणि त्यात खारट पाण्याचा गंध तर दूरवरून जहाजाचा हॉर्नच आवाज, कधी लाटांचा धडका हेच सर्व कानी पडत होते.

त्या शांततेत काळ्या टॅक्टिकल सूटमध्ये एक तरुणी  चालत होती. तिच्या बूटांचा जमिनीवर आदळणारा ठोका कठोर शिस्त आणि आत्मविश्वासाचं प्रतिक वाटत होते. तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता, डोळ्यांत धार, आणि पावलांमध्ये निर्धार यावरूनच तिची पर्सनॅलिटी उठून दिसत होती.

ती होती उर्वी देशमुख.
फक्त पंचवीस वर्षांची. पण तिच्या व्यक्तिमत्त्वातली कणखर झलक बघून तिचं खरं वय कुणीही ओळखू शकणार नव्हतं. उंच बांधा, तीक्ष्ण नजर, आणि चालण्याच्या प्रत्येक हालचालीत एका सैनिकाची शिस्त ओतप्रोत दिसत होती.

ती सरळ रेषेत चालत मुख्य इमारतीच्या दारापाशी पोहोचली. थोडा श्वास घेतला, मग दार उघडलं. समोर एक केबिन होती. ती पाऊल टाकत आत शिरली.

“ब्राव्हो रिपोर्टिंग, सर.”
तिने कडक आवाजात सॅल्युट ठोकला.

टेबलामागे बसलेले ए.सी.पी. उदय राणे काही क्षण तिच्याकडे निश्चल नजरेने पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यांत कठोर जबाबदारीचं वजन होतं, पण त्यामागे अभिमानाची एक हलकीशी झलकही होती.

“देशमुख,” ते हळूवार म्हणाले,
“तुझ्या बाबांचा वारसा फक्त नावापुरता नाही. तुझ्या शिरांमध्ये सैनिकाचं रक्त वाहतंय म्हणून या मिशनसाठी माझ्या मनात दुसरं कोणाचंही नाव आलं नाही आणि तुला तातडीने इथे बोलावलं.”

क्षणभर उर्वीच्या श्वासाचा ठोका चुकला. तिच्या डोळ्यांसमोर वडील उभे राहिले कर्नल देशमुख. रणांगणावर शौर्याने लढताना देशासाठी प्राण देणारे ते वीर. त्यांच्या आठवणीने उर्वीच्या अंगात पुन्हा एकदा तोच जाज्वल्य उत्साह संचारला.

तिच्या मनातला अभिमान आणि जबाबदारी यांचं मिश्रण डोळ्यांत चमकलं.
ती एक पाऊल पुढे सरसावली.

तिने कसलीही शंका न ठेवता उत्तर दिलं
“सर, मी तयार आहे. मिशन कितीही कठीण असो, मी आता मागे हटणार नाही.”

तिच्या आवाजात असा निर्धार होता की, खोलीतल्या भिंतीसुद्धा ऐकू लागल्या असाव्यात.

दाराचा लॉक हलक्या आवाजाने क्लिक झाला. दार उघडलं आणि आत येणाऱ्याकडे नजर गेली क्षणभर तिला धक्का बसला. अश्वेत!

मनात प्रश्नांची गर्दी चालू झाली "हा इथे काय करतोय? बेसवर? ते हि ऑफिसर राणेंच्या रूममध्ये? साधा इंजिनियर असलेला माझा भाऊ इथे कसा?"

तिने चेहऱ्यावर कठोरपणा कायम ठेवला, पण मन मात्र आतून हादरलं होते.

"अश्वेत, तू माझा भाऊ आहेस. लहानपणापासून माझ्या प्रत्येक पावलावर तू सोबत होतास. पण आज… आज तुझ्या डोळ्यांत काहीतरी वेगळं जाणवत आहे. जणू मला न सांगता तू वेगळं आयुष्य जगतो आहेस."

तिच्या नजरेत त्याचा नेहमीचा साधेपणा कमी, आणि काहीतरी दडपून ठेवलेलं जास्त दिसत होते.

"काय लपवतोयस तू माझ्यापासून? मला सुरक्षित ठेवायचं म्हणून? की मी समजू नये म्हणून? पण अश्वेत, मी तुझीच बहिण आहे. आणि माझ्यापासून खरं लपवणं इतकं सोपं नाही."क्षणभर छातीत हळवी ठिणगी उसळली.
"आपण दोघंही बाबांचा वारसा आपल्या आपल्या मार्गाने जगतोय. पण तरीही, आपल्यामध्ये आता काहीतरी बदललंय. तू कोण आहेस, काय करतोस, हे मी उघड करेनच. पण त्या आधी… माझा भाऊ म्हणून तुझं रक्षण करणं, हे माझं पहिलं काम असेल."

उर्वीने चेहरा निर्विकार ठेवला, पण मनात ठाम निर्धार रुजला होता "अश्वेत, मला तुझं खरं आयुष्य अजून समजलं नाही. पण ते कधीच जास्त काळ लपून राहणार नाही."

टेबलामागून उदय राणे उठले. त्यांच्या आवाजात लोखंडी धार होती “उर्वी लक्षात ठेव, हे फक्त मिशन नाही. हा तस्करांचा अड्डा मोडला नाही, तर शेकडो निरपराध लोक समुद्रमार्गे विकले जातील. तुझ्या निर्णयावर कित्येक जीव टांगले आहेत.”

खोलीतला हवेतला ताण जाणवण्याइतकं गडद होतं.

उर्वी स्थिरपणे उभी राहिली. डोळ्यांत समुद्रासारखं गूढ शांतं स्थैर्य. पण तिच्या अंतर्मनात तोच समुद्र वादळाच्या गर्जनेसारखा उसळत होता. तिने मान ताठ केली, श्वास नियंत्रित केला आणि फक्त दोन शब्द उच्चारले “येस सर.”

सलामी देऊन ती खोलीतून बाहेर पडली.

उर्वी बाहेर पडताच दार हलक्या आवाजाने बंद झालं. खोलीत थोडा वेळ शांतता पसरली. उदय राणे टेबलावरच्या फाईल्सकडे बघत होते, पण नजरेत वेगळाच विचार दाटलेला होता.

अश्वेतने हळूच फाईल्स बाजूला ठेवल्या. त्याने सरळ उदय राणेंकडे नजर केली.

“सर… तुम्हाला खात्री आहे ना, उर्वी तयार आहे या मिशनसाठी?” त्याच्या आवाजात काळजीवाहू सूर दडवला गेला होता.

उदय राणे खुर्चीत मागे रेलले. चेहऱ्यावरचा कटाक्ष कठोर, पण शब्द खोलवर भिडणारे “अश्वेत उर्वी फक्त तयार नाही आहे तर ती या मिशनसाठीच जन्मली आहे. तिच्या डोळ्यांत मी कर्नलची छबी पाहिली आहे. तिला थांबवलं, तर या देशाचं नुकसान होईल.”

अश्वेतचे डोळे किंचित निमुळते झाले.“पण सर, तुम्हाला माहिती आहे तिच्या भोवती कोणीतरी पाळत ठेवतंय. ही साधी मिशनची रिस्क नाही. हे काहीतरी मोठं आहे. उर्वीला सत्य सांगावं का?”

उदय राणेंचा आवाज कडक झाला.
“नाही, अजिबात नाही. तिला काहीही सांगायचं नाही. तिच्या मनात एकच गोष्ट असायला हवी मिशन पूर्ण करणं. उर्वीला तिच्या वडिलांची सावलीच पुरेशी आहे. बाकी सगळं आपण हाताळू.”

क्षणभर खोलीत पुन्हा शांतता पसरली. अश्वेतने ओठ घट्ट मिटले. त्याच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलची काळजी आणि गुप्तहेराचा शंकेखोर चेहरा एकत्र दिसत होता.

तो हळू आवाजात बोलला सर, उर्वी माझी बहिण आहे. तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे पण जर कुणी तिच्या आयुष्यात घुसलं, तर मी गप्प बसणार नाही.”

उदय राणे थोडंसं हसले, पण डोळ्यांत गंभीरता कायम होती.
“तेच तर अपेक्षित आहे तुझ्याकडून, अश्वेत. तिच्यावर नजर ठेव पण तिच्या वाटेवरील  अडथळा कधीच होऊ नकोस.”

अश्वेतने मान हलवली.दोघांनाही ठाऊक होतं पुढचे दिवस वादळ घेऊन येणार आहेत.

उर्वी दारातून बाहेर पडली होती, पण मनात अश्वेतचा चेहरा अजूनही तिच्या डोळ्यांसमोर येत होता.
“हा तोच आहे का? माझा साधाभोळा भाऊ,  जो माझा हात धरून चालायला शिकत होता?”जे काही असेल पण याचा मी छडा लावणारच.

बेसच्या क्वार्टर्समध्ये आरशासमोर उभी राहून उर्वी स्वतःकडे एकटक पाहत होती. काळ्या हिरव्या वर्दीतली ती आता फक्त उर्वी नव्हती. ती होती शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारं जिवंत शस्त्र होते हे.

आरशावर हात ठेवून ती हलक्या आवाजात कुजबुजली “बाबा… हे मिशन पूर्ण झालं, तर समजेन मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं.”

बाहेर समुद्र प्रचंड गर्जना करत होता. काळ्याकुट्ट आकाशाखाली पांढर्‍या फेसाळलेल्या लाटा एकमेकांवर आदळत होत्या. त्या तालबद्ध गजरात एक दडपणं होतं, आणि उर्वीला तो आवाज जणू तिच्या हृदयाच्या ठोक्याशी मिळत असल्यासारखा वाटत होता. प्रत्येक ठोक्यातून एकच शब्द घुमत होता“जिंकू किंवा मरू.”

दुसऱ्या सकाळी बेसच्या ग्राउंडवर बूटांचे ठोके घुमत होते. सकाळच्या धुक्यातून उमटणारा प्रत्येक आवाज वातावरणात काटेकोर शिस्तीचं प्रतिबिंब दाखवत होता. रनिंग संपलं होतं. श्वास फुललेले, अंग घामाने ओलीसावली झालेली कॅडीडेट्स दमलेले होते, तरीही चेहऱ्यावर जिद्दीचं हसू ठेवून उभे होते.

पण उर्वी मात्र वेगळीच दिसत होती. तिच्या डोळ्यांत थकवा नव्हता. तिथे एक वेगळंच तेज होतं जणू आतून कुठेतरी एक गुप्त वणवा पेटला होता.

ती लेस बांधण्यासाठी खाली वाकली, आणि त्याच क्षणी तिला जमिनीवर पडलेला एक छोटासा पांढरा कागद दिसला. अगदी साधा. शब्द नव्हते, पण काळ्या शाईने काढलेली वाकडी-तिकडी खूण होती. साध्या नजरेला ती एक ओढलेली रेघ वाटली असती, पण उर्वीच्या तीक्ष्ण नजरेला त्या खुणेत वेगळाच अर्थ दिसला.

क्षणभर तिच्या भुवया उंचावल्या.
“हे इथे कुणी टाकलं?” प्रश्न तिच्या मनात चमकून गेला.

तिनं तो कागद सावधपणे उचलला. क्षणभर मुठीत घट्ट दाबून मग शांत चेहऱ्याने तो खिशात सरकवला. बाहेरून ती इतरांप्रमाणेच रांगेत उभी राहिली, पण तिच्या डोक्यात एक वादळ आधीच उठलं होतं.

शिट्टीचा आवाज हवेत घुमला. कॅडीडेट्स आपापल्या रूमकडे परत वळले. सर्वत्र शांतता होती. पण उर्वीच्या पावलांखालील जमीनही तिला डळमळीत वाटत होती.

तो कागद… ती खूण… हा योगायोग नव्हता. कुणीतरी तिच्या मागे लक्ष ठेऊन होतं. आणि ती खूण फक्त एखादी रेघ नव्हती, ती एक संकेत होती. असा संकेत, जो तिचं आयुष्यच बदलवू शकतो.

उर्वीच्या मनात प्रश्नांचा महापूर उसळला “कोण आहे तो? माझ्यावर नजर का ठेवतोय? ही खूण नेमकं काय सांगते आहे? माझं मिशन तर अजून सुरूही झालं नाही… मग खेळ आधीच कोणी सुरू केला आहे?”

बेसवरची हवा बाहेरून स्थिर होती, पण उर्वीच्या आत वादळ घोंगावत होतं. समुद्राच्या कालच्या लाटांप्रमाणेच तिच्या मनात धडकी भरवणारी ताकद जमा होत होती.

त्या लहानशा पांढऱ्या कागदावरची काळी खूण उर्वीच्या पुढच्या प्रवासाचा पहिला इशारा ठरला होता.

क्रमश :


पुढील भागासाठी वाचत राहा – भाग २ लवकरच येतोय…

माझी नवीन कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
©®जान्हवी साळवे ला फोल्लो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!
तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम  माझ्यासाठी अमूल्य आहेत.

©️ कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

उर्वी देशमुख - नायिका 

अश्वेत-नायिकेचा भाऊ

कर्नल देशमुख -नायिकेचे वडील

ए.सी.पी. उदय राणे
0

🎭 Series Post

View all