Login

तिचं वर्चस्व! भाग १

कर्तुत्ववान स्त्री ही फक्त स्वतःच भविष्य घडवत नाही तर समाजाला ही नवी दिशा दाखवते.
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद कथालेखन

तिचं वर्चस्व!  भाग १

©® एकता माने

गावच्या वेशीवरून चालत येणाऱ्या धुळकट रस्त्यावर सकाळच्या उन्हाची सोनसळी किरणं पडत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या चिंच-वडाच्या झाडाखाली गावकरी आपापली कामं उरकून बसलेले. गाव लहानसं होतं; पण त्या गावातलं एक नाव सगळ्यांच्या तोंडावर होतं - सुमित्रा देशमुख!

सुमित्रा वयाच्या तिशीच्या आत असलेली, साधी दिसणारी पण डोळ्यांत ठामपणा आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक घेऊन जगणारी स्त्री होती. घरगुती परिस्थिती सामान्य; पण स्वभावाने ती हट्टी, धाडसी आणि न्यायप्रिय होती. कुठल्याही विषयावर आपलं मत स्पष्ट बोलायचं धाडस तिला होतं. म्हणूनच गावकरी नेहमी म्हणायचे,

“या गावात काही चुकीचं घडलं, तर ती थांबवेल. तिचं वर्चस्व आहे इथं!”

गावातील सगळ्या लोकांना तिच्यावर तेवढा विश्वासही होता.

एकदिवशी सकाळी चौकात ग्रामपंचायतीची सभा भरलेली. गावातल्या विहिरीवरून नेहमीचा पाण्याचा वाद पुन्हा उफाळला होता. काही श्रीमंत शेतकरी विहिरीवर हक्क सांगत होते आणि गरीब कष्टकरी स्त्रियांना पाणी भरू देत नव्हते.

सुमित्रा तिथे आली. हातात पाणी भरायचा हंडा होता. चेहऱ्यावर राग ओसंडून वाहत होता.

“तुम्हां सगळ्यांचे हे काय चाललंय पुन्हा?” तिने चौकातल्या लोकांना विचारलं.

रामभाऊ, गावातला एक श्रीमंत शेतकरी उभा राहिला.

“काय नाही चाललं! ही विहीर आमच्या शिवारातली. आमचं पाणी आम्ही वापरू. बाहेरच्यांना काय अधिकार?” त्याने थेट तिच्याकडे पाहत उत्तर दिले.

सुमित्रा डोळ्यांत डोळे घालून म्हणाली,
“ही विहीर गावाची आहे. गावकऱ्यांनी श्रमदान करून खोदलेली. तुझ्या पैशांनी एकटी उभी राहिली नाही ही! आणि गावातल्या बायका तासन्‌तास रांगेत उभ्या राहतात, त्यांना पाणी नको म्हणायचं असा तुझ्या बापाने कोणता हुकूम दिला?”


चौकात कुजबुज सुरू झाली. काही जणांनी टाळी वाजवली. काहींनी मात्र रामभाऊकडे पाहत गप्प बसणं पसंत केलं.

सगळ्यांसमोर आपला झालेला असा अपमान पाहून रामभाऊच्या मनातही आग पेटली.

रामभाऊ चिडून म्हणाला,
“जास्त मोठं तोंड चालवू नकोस सुमित्राबाई. बाईने आपलं घर बघावं. पुरुषांच्या कामात डोकं घालू नये.”

सुमित्रा जोरात हसली.

“अरे बाईचं घर कोणतं? ही माती माझं घर आहे, हे गाव माझं आहे. मी स्त्री आहे म्हणून गप्प बसेन? नाही रामभाऊ. तुझ्यासारख्या बळकटांना कुणीतरी थांबवणारच आणि आज ती जबाबदारी मी घेतलीये.”

त्यावेळी तिकडे असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी तिची साथ दिली आणि तिच्या मागे जाऊन उभे राहिले. सगळ्या कष्टकरी स्त्रिया तिच्या बाजूने होत्या. काही पुरुषांनाही तिचं बोलणं पटत होतं. त्यामुळे रामभाऊंनी यावेळी गप्प बसणं पसंत केलं आणि तो रागातच तिच्याकडे पाहत तिकडून निघून गेला.

घरी आल्यावरही रामभाऊ सुमित्राचा विचार करत होता. सगळ्यांसमोर त्याचा असा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही. त्याने ही गोष्ट सभेमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. त्याचं घराणं श्रीमंत असल्यामुळे सरपंचाचा निर्णय आपल्याच बाजूने येईल असा त्याला विश्वास होता.

रामभाऊ यांनी सरपंचासमोर आपलं म्हणणं मांडलं. त्यांचं बोलणं ऐकून सरपंचांनी सभा बोलावली. सभेमध्ये सगळे गावकरी जमा झालेले. गावच्या सगळ्या बायकाही या सभेसाठी हजर होत्या. सुमित्राबाईंना सगळ्यांच्या समोर बोलवण्यात आले.

रामभाऊ यांनी सभेमध्ये आपले मत मांडायला सुरुवात केली. तेव्हा मात्र तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्या बायका त्याच्याविरुद्ध बोलत होत्या.

क्रमशः
© एकता माने
0

🎭 Series Post

View all