कामा पुरता मामा भाग एक

Selfish Mothet In Law कामा पुरता मामा
कामापुरता मामा भाग एक


“सुनबाई मला अजून एक पोळी हवी.” स्वयंपाक घरामध्ये सगळ्यांना गरम पोळ्या करून वाढणाऱ्या सुनेला सासऱ्यांनी जेवताना आणखी एक पोळी मागितली.

“हो बाबा, देते. आणखीन कोणाला पोळी हवी आहे का?” सुनेने जेवायला बसलेल्या सासू, नणंद, दिर सगळ्यांना विचारलं.

“मला एक, मला एक.” नणंद आणि दीर एक साथ बोलले.

“आज अचानक पोळ्या कशा काय कमी पडत आहेत? आज परत तुझा अंदाज चुकला की काय? पोळ्या का कमी केल्या?” जेवता जेवता सासू वैतागून सुनेला विचारत होती.

“अगं आज पाटवडीची भाजी छान झाली आहे. रोजच्यापेक्षा दोन पोळ्या मीच जास्त खाल्ल्या.” सासरे दिलगिरी व्यक्त करत बोलले. “सुनबाई आजकाल स्वयंपाक छान करायला लागली आहे.” सहा महिन्यानंतर सुट्टी मिळाली, म्हणून घरी आलेल्या आपल्या मुलाला सासरेबुवा सुनेचं कौतुक सांगत होते.

तेवढ्यात सासूबाईंना जोरदार ठसका लागला आणि त्यांनी सुनेला पाणी मागितलं. “बापरे ही इतकी तिखट भाजी? आणि हे एवढं मोठं तेल? रोज जर इतक्या मसालेदार भाज्या खाल्ल्या तर सगळ्यांच्या पोटाची वाटच लागेल, आणि तुम्ही भाजी थोडी कमीच खा, ऍसिडिटीचा त्रास आहे तुम्हाला!” सासुबाई ने जेवता जेवता सुनेला टोमणा तर मारलाच पण स्वतःच्या नवऱ्याला आदेश वजा सूचनाही केली.

एवढ्या दिवसानंतर घरी आलेला तिचा नवरा सगळ्या गोष्टी निमुटपणे बघत होता. डोळ्याने सारं काही टिपत होता. कुठल्याच गोष्टीवर तो काहीच प्रतिक्रिया देत नव्हता. तीही अगदी गप्प-गप्पच होती. तिला माहिती होतं की ती कितीही चांगली वागली तरीही त्या घरात तिचं कुणीही कधीही कौतुक करणार नव्हतं. आणि चुकून जर एखाद्याने कौतुक केलंच, तर कौतुक करणाऱ्याला आणि तिला दोघांनाही सासूबाईंच्या रोषाला सामोरे जावे लागे.

आपलं आयुष्य असंच दिवस रात्र घरकाम करण्यात जाणार आहे. धुणी-भांडी, झाडू-पोछा, निवडण, कांडण हे सगळं करता करता सकाळी उगवलेला सूर्य कधी अस्ताला जाई हे तिचं तिलाच समजेना.

लग्न झाल्यावर तिनेही सुखी संसाराचं, जोडीदारासोबत आनंदी सहजीवनाचं एक छान चित्र मनात रेखाटलं होतं. पण सासूबाईंचा अति स्वार्थी आणि ‘माझंच खरं’ हा स्वभाव, सासरेबुवांचं अगदीच मावळ धोरण, यामुळे सासरी सगळी सत्ता तिच्या सासूच्या हातात होती. आईच्या सतत नजरेखाली असल्याने तिचा नवरा तिच्याशी मोकळेपणाने कधी वागलाच नव्हता. सासूची करडी नजर नेहमीच त्या नवपरिणीत जोडप्यावर असल्याने, तिचा नवरा तिच्याशी नेहमी अंतर ठेवूनच वागे.

एखाद वेळी तरी त्याने आपलं कौतुक करावं, आपण छान तयार झाल्यावर, “तू छान दिसतेस.” असं तोंड भरून म्हणावं, किंवा केलेल्या एखाद्या पदार्थाला त्याने तोंडभरून दाद द्यावी असं तिला वाटते. पण तसं कधी झालं नव्हतं. मनातल्या गोष्टी तिने आईला सांगितल्या होत्या, तर तिने सबुरीने घ्यायचा सल्ला दिला होता.

तिचे बाबा तर तिला नेहमीच म्हणायचे, “अगं लोणचं मुरायला जरा वेळ जाऊ द्यावा लागतो. जरा धीर धर, होईल सगळं तुझ्या मनासारखं.” पण हे मनासारखं व्हायला आयुष्य खर्ची पडणार हे तिला आता कळून चुकलं होतं. तरीही मनाशी खुणगाठ बांधून ती सगळी कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करत होती.

आज जवळपास सहा महिन्यानंतर नवरा घरी आला होता. पण खोलीत जायची तिला घाई नव्हती. जेवणानंतरची झाकपाक, दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी, कपड्यांना प्रेस, आणि इतर अनेक छोटी, मोठी कामं ती तिच्या लईत करत होती.

काही कारणानिमित्त एक-दोनदा खोलीत गेल्यावर नवरा पुस्तक वाचताना तिला दिसला. एक क्षण तिला वाटलं, की हा आपल्यासाठीच जागा आहे की काय? पण तरीही तिला खोलीत जायची घाई नव्हती.

तिने मनाशी विचार केला, लग्न झालं तेव्हा ती नवऱ्याच्या सहवासासाठी, त्याच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी किती आसुसलेली होती. स्वयंपाक घरातली कामं भराभरा आटपून, तिला खोलीत जायचं असे. पण सासूबाई काही ना काही काम किंवा कारण सांगून तिला खोलीत जायला कसा वेळ होईल याकडेच नजर ठेवून असायच्या. त्यावेळी तिची चिडचिड व्हायची, पण नवरा मात्र आईचीच बाजू घ्यायचा.

“एवढी काय घाई असते तुला खोलीत यायची? इथेच तर आहे ना मी! आईचं आता वय झालयं, तिचं ऐकत जा, घरकामांमध्ये तिला मदत करत जा.”

त्यावेळी ती पुर्ती हिरमुसून जायची. पण आता तिने मनाला समजावलं होतं. नवऱ्याला आपली ओढ नाही हे तिला कळलं होतं.

“अगं अजून किती वेळ आहे तुला? रात्रीचे अकरा वाजलेत, झोपायचं नाही का?” नवऱ्याच्या आवाजाने ती भानावर आली. तिचा नवरा खोलीत तिची वाट पाहत होता

आज मात्र नवरा आपली वाट पाहतोय हे बघून तिला आश्चर्य वाटलं होतं. मनोमन ती कुठेतरी सुखावली होती.

पुढच्या भागात बघूया तिचं हे सुख क्षणभंगुर आहे की निरंतर.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all