Login

कार्यकर्ता २

सुबोधचे उमेदवारीचे स्वप्न पूर्ण होते का ?
खासदार साहेबांच्या बैठकीला जेमतेम आठवडा उलटला होता. स्वतः साहेबांनी सुबोधच्या नावाची शिफारस पक्ष निरीक्षकांकडे केली होती. यंदाच्या पालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 22 चे तिकीट सुबोधला देण्यात येणार यावर सर्वांचे एकमत झाले.

दोन दिवसात पक्षनिरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक उमेदवाराचे नाव जाहीर करणार होते. त्यादृष्टीने वॉर्ड क्रमांक 22मध्ये देखील काम सुरू झाले.

सुबोधने मोठ्या उत्साहाने तयारी केली . लांबून लांबून लोकं येणार होती त्यांना बसायला खुर्च्या , ताडपत्री , सतरंज्या, यांची व्यवस्था तसेच खासदार साहेबांच्या जवळच्या लोकांना निमंत्रण देणे , साहेबांना भेटी देणाऱ्या लोकांचे बघणे , शिवाय बंगल्यावरही साहेबांच्या आणि रेवताईबाईंच्या नात्यातील जवळची लोक आली होती. त्यांना काय हवं नको ते बघणे ,रेवतीबाईंनी दिलेली कामे करणे अशा गोष्ट ीतो एकहाती सांभाळत होता. बंगल्यात इतरही नोकरचाकर होते पण सुबोध म्हणजे हक्काने काम सांगून फुकटात करून घ्यायची सोय होती

ठरल्याप्रमाणे सभेच्या दिवशी पक्षनिरीक्षकांनी जाहीर केले वॉर्ड क्रमांक 22 मधून आपण निवड करत आहोत एका तरुण पिढीच्या चेहऱ्याची. ..साहिल जोशी यांची. कोण बरं हा साहिल? सभेला जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली आणि तेवढ्यात स्टेजवर तिशीतला एक ऐसपैस सुटबुट आणि गॉगल घातलेला दिमाखदार तरुण पुढे आला.


हे पाहून सुबोधला धक्का बसला. असं कसं होऊ शकत? हा तर रेवतीबाईंचा भाचा . दोन दिवसांपूर्वी तर आलाय आपल्या शहरात. कशी काय उमेदवारी दिली याला काहीही अनुभव नसताना?
स्टेजवर साहिल आपण कसे उच्चशिक्षित आहोत,लोकांसाठी काय काय योजना करू शकतो याबद्दल भरभरून बोलत राहिला पण सुबोधच्या कानाला त्याचे बोलणे ऐकूच आले नाही. आणि मग सभा संपल्यानंतर तो आणि त्याचे सहकारी मागचं आवरत बसले.

रात्री साहेबांशी या मुद्द्यावर बोलायचे असा विचार करून तो त्यांच्या खोलीजवळ जाणार तेवढ्यात त्याला रेवतीबाईंचा आवाज ऐकू आला...

रेवतीबाई....नशीब माझं तुम्ही त्या सुबोधला उमेदवारी दिली नाहीत ..किती घाबरले होते मी हा गडी हातचा जातोय की काय..?

साहेब.... अगं काहीही काय बोलतेस? उमेश साहेबांनी जरी सुचवले तरीअसं कसं होऊ देईल मी? या कालच्या सांभाळलेल्या पोरासाठी मी का म्हणून राजकीय मदत करायची ? उद्या पुढे जाऊन त्याने माझ्या विरोधात काही केले तर? एवढी वर्षे सोबत आहे म्हणजे बारीकसारीक गोष्टी पण त्याला माहित आहेत त्यापेक्षा कशाला उगाच विषाची परीक्षा घ्यायची. कार्यकर्ता म्हणून आहे तेच बरं..

म्हणून मी उमेश साहेबांकडे सुबोधच्या लोकप्रियतेचा आणि एकनिष्ठतेचा कसा आपल्याला धोका होऊ शकतो हे सांगितले आणि तुझ्या भाच्याला पुढे करायला सांगितलं.

रेवतीबाई....हो ना शिवाय मुलाच्या तिकिटासाठी म्हणून भावानेही तब्बल ५० लाख मोजले आहेत आपल्यासाठी.

कशाला उगाच ह्या गडी माणसाला पुढे करायचं त्यापेक्षा आहे तिथे बरा आहे .
चला आता उद्यापासून साहिलच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे ही कामाची यादी उद्या सकाळीच सुबोधला देते.

साहेब आणि रेवतीबाईंचे हे बोलणे ऐकून सुबोधला रडूच कोसळले. आपला वापर कामापुरताच आहे हे सत्य समजल्यामुळे त्याने आज रात्रीच हे घर सोडायचा निर्णय घेतला.
0

🎭 Series Post

View all