Login

कुंकू-1

मराठी कथा
कुंकू...
डॉ. नयनचंद्र सरस्वते

दचकून जाग आली तर आजूबाजूचा काहीच संदर्भ लागत नव्हता. उठून बसताना एक कळ सावकाश पाठीतून वर सरकायला लागली तसतसं संदर्भ पण मेंदूत जागे व्हायला लागले. पहिला संदर्भ होता, अजून उठण्याची वेळ झाली नाही. अंधार अजून गडद आहे. मग प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखं हाताने चाचपडत चष्मा शोधला, त्यानंतर मोबाईल शोधला, चष्मा डोळ्यावर चढवून मोबाईलमध्ये पाहिलं तर साडेतीन वाजले होते. म्हणजे उठायला बराच अवकाश होता, अर्थात, उठून तरी कोणता कामाचा डोंगर उपसायचा होता ?
दुसरा संदर्भ मेंदूने केव्हाच जुळवला होता, पण त्याचा विचार करण्याची अजिबात इच्छा नव्हती. इच्छा असो अथवा नसो कृती करावी लागतेच की...!! उजव्या हातात धरून मोबाईलची बॅटरी लावली, गडद अंधारात तेवढा उजेडदेखील जीवघेणा वाटत होता. इलाज नव्हता, मोबाईल काहीसा उंचावत माझ्या डाव्या बाजूला पाहिलं. खाली अंथरलेल्या अंथरुणावर एक कृश देह जवळजवळ निपचित पडला होता. अंगावर चादर होती, छातीपर्यंत ओढलेली... दोन्ही हात छातीवर जुळवून ठेवलेले होते...म्हणजे आत्ता दिसत नव्हते, चादरीखाली झाकलेले होते. पण मला ठाऊक होतं, हात नक्की तिथंच होते, मीच रात्री झोपताना ते जुळवून ठेवले होते. कृश देहात तेवढी पण ताकद नव्हती.
मोबाईल तसाच हातात धरून मी हळूहळू त्या अंथरुणाकडे सरकू लागले. माझ्यासोबत मोबाईल आणि त्याचा उजेड पण तिकडं सरकत होता. मी त्या कृश देहाच्या जवळ पोहोचले. पाठीतली कळ आता सणक होऊन मेंदूला हादरे देत होती. तिच्याकडे दुर्लक्ष करत मी मोबाईल किंचित तिरका करत त्या देहाला न्याहाळू लागले. छातीपासून वरवर जात नजर त्या देहाच्या चेहऱ्यावर स्थिरावली. डोळे मिटलेले होते. देह झोपेत होता की बेशुद्ध अवस्थेत..? का फक्त देहच आहे इथं...? मी अजून वाकले, बॅटरीचा प्रकाश थेट चेहऱ्यावर पडला, बंद
पापण्या किंचित आकुंचित झाल्या. होता...होता...देहासहित आत्मा पण होता. मी माझ्याही नकळत एक सुस्कारा सोडला. उगाचच त्याच्या अंगावरची चादर नीट केली. पुन्हा मागे-मागे सरकले आणि माझ्या अंथरुणावर आले. या सगळ्या हालचालींमुळे अंथरुणाला पडलेल्या सुरकुत्या हात फिरवून, फिरवून नीट करू लागले. मन लावून नीट करू लागले...पाठीतली सणक टाहो फोडेपर्यंत नीट करू लागले. मग सावकाश चष्मा काढून ठेवला. घाई कशाला करावी ? कुठं किल्ला सर करायला जायचं होतं ? मोबाईल खाली ठेवला. डोक्यापाशी ठेवलेली पाण्याची बाटली उचलली, हळुवार हाताने फिरवत-फिरवत झाकण काढलं, दोन घोट पाणी प्यायले. हो, रात्रीतून मरण आलं तर तहान शिल्लक नको. काहीच शिल्लक नको. झाकण लावून बाटली ठेवली. मोबाईलची बॅटरी सावकाश बंद केली. फोन बाजूला ठेवला आणि आडवी पडले.
क्रमशः

🎭 Series Post

View all