Login

कृतकृत्य

कृतकृत्य
ईरा – चॅम्पियन्स ट्रॉफी – २०२५
ग्रुप ४ – (संघ – कामिनी)

लघुकथा : शीर्षक – कृतकृत्य


“धीस इज अमेझिंग, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, शी इज रिकव्हरिंग फास्ट. अशीच प्रगती राहिली तर पेशंटला दोन दिवसांत डिस्चार्ज करायला हरकत नाही.” डॉक्टर साळुंके हातातल्या रिपोर्ट्सकडे बघत बोलत होते. “फक्त ह्यापुढे सांगितलेलं पथ्य पाळायचं आणि काळजी घ्यायची, काय?”

‘सुश्रुषा नर्सिंग होम’च्या स्पेशल रूम नंबर पाचमध्ये आपल्या पेशंटची व्हिजिट घ्यायला ते आले होते. डॉक्टरांचं बोलणं ऐकून पेशंट आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या आप्तांच्या जीवात जीव आला नसता तरच नवल. बेडवर शांत झोपलेल्या त्या तरुणीच्या शेजारी तिचे वडील बसले होते. डॉक्टरांचं बोलणं ऐकता ऐकता ते भूतकाळात गेले. त्यांना तिच्या जागी पाळण्यातली त्यांची छोटीशी परी दिसू लागली.

पेशाने बिल्डर असलेल्या जयराज दिवाणांच्या घरी पंचवीस वर्षांपूर्वी लक्ष्मी जन्माला आली. किमया त्यांची एकुलती एक मुलगी. दुर्दैवाने जन्मतःच आईच्या मायेला पारखी झालेली. तिच्या जन्माच्या वेळी डिलिवरी दरम्यान काहीतरी कॉम्प्लिकेशन्स झाल्या. त्यात संगीताचं म्हणजे जयराजच्या बायकोचं निधन झालं होतं; पण जयराजने पत्नीच्या निधनाचा किंचितही दोष त्या नवजात अर्भकाला दिला नाही. उलट किमयाला आई आणि बाप बनून तळहाताच्या फोडासारखी जपली. तिला उत्तम संस्कार आणि दर्जेदार शिक्षण दिलं. किमयाच्या इच्छेनुसार तिला अहमदाबादच्या नावाजलेल्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ दिला. तसं तर सगळंच किमयाच्या मनासारखं होत होतं, फक्त वडिलांचं दुसरं लग्न सोडून...

किमया बारा वर्षांची असताना जयराज यांनी जान्हवीशी लग्न केलं. जान्हवी त्यांची कॉलेजमधली मैत्रीण. घटस्फोटित होती. तिच्या पहिल्या लग्नात सुरुवातीला ती खूप सुखी होती. नंतर तिच्या लक्षात यायला लागलं कि तिच्या नवऱ्याचं त्याच्याच ऑफिसमधल्या एका मुलीबरोबर सूत जुळलंय. जान्हवीने जाब विचारल्यावर त्याने निर्लज्जपणे आपल्या नव्या नात्याची कबुली दिली. इतकी वर्षं त्याच्या संसारात गुंतलेली, त्याच्या आई-बापाच्या खस्ता खाणारी, त्याच्या दोन मुलांच्या संगोपनात स्वतःला पूर्णपणे अडकवून घेतलेली जान्हवी त्याला आवडेनाशी झाली होती. आपला आत्मसन्मान जपत जान्हवीने कायद्याची दारं ठोठावली. त्याच्याकडे घटस्फोट मागितला होता. तेव्हा दोन्ही मुलांनी आईसोबत घर सोडून न जाता वडिलांची निवड केली होती. मुलांची वणवण नको म्हणून जान्हवीनेसुद्धा आपल्या मायेला आवर घातला आणि स्वाभिमानाने नवऱ्याचं घर सोडलं. आपली फसवणूक करणाऱ्या माणसाकडून तिने पोटगीदाखल एक दमडीही घेतली नव्हती.

तर अशा रीतीने नकोशा झालेल्या नात्यातून जान्हवी मोकळी तर झाली; पण आता तिच्यासमोर खूप आव्हानं होती. तिच्या सर्वायवलचा प्रश्न होता. तेव्हा जयराज आणि जान्हवीच्या एका कॉमन फ्रेंडने जयराजकडे जान्हवीच्या जॉबसाठी शब्द टाकला. त्याचाही व्याप वाढत होता. नवीन माणसांची गरज होतीच. जान्हवीने जयराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब जॉइन केला.

त्या दरम्यान जयराजचा बिझनेस चांगलाच नावारुपाला येत होता. त्याला घराकडे, खासकरून किमयाकडे पहिल्यासारखं लक्ष द्यायला जमत नव्हतं. किमया पौगंडावस्थेत येत होती. आडनिड्या वयात मुलींना बापापेक्षा आईचा आधार हवा असतो असा विचार करून जयराजनी जान्हवीला लग्नासाठी विचारणा केली. तिनेही खूप विचार करून त्यांना होकार दिला आणि दोघांनी पुन्हा एकदा संसाराचा डाव मांडला. जान्हवी माप ओलांडून दिवाणांच्या घरची सून झाली. जयराजच्या म्हाताऱ्या आई-वडिलांनासुद्धा त्यांच्या ह्या निर्णयामुळे आनंदच झाला होता. कारण आता त्यांना किमयाची काळजी उरली नव्हती; पण किमयाने कधीच जान्हवीला आपली आई मानलं नाही. सुरुवातीला ह्या गोष्टीचं जयराजना वाईट वाटायचं. तेव्हा जान्हवीच त्यांची समजूत घालायची.

“तुम्ही इतका विचार करू नका, किमया आत्ता अर्धवट वयात आहे. ना धड लहान, ना धड मोठी. आमचं नातं स्वीकारायला आपण तिला थोडा वेळ देऊ या.”

जान्हवीने किमयाला भरपूर वेळ दिला, थोडी थोडकी नाही, चांगली तेरा वर्षं दिली. तिला माया लावायचा प्रयत्न केला. तिच्या आवडीनिवडी जपल्या. तिच्या संगोपनात कसलीही कसर राहू दिली नाही. नातं जपण्याच्या जान्हवीच्या सततच्या पुढाकाराला किमयाकडून कधीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने जान्हवीपासून कायमच अंतर ठेवलं. त्याला तिच्या आत्यानेही जमेल तसं खतपाणी घातलं. कोमलला जान्हवी आवडत नव्हती. जान्हवी ज्या मुलांना मागे सोडून आलीय, आज ना उद्या ती त्यांच्यासाठी किमयावर अन्याय करणार असा कोमलचा ठाम विश्वास होता.

“तिने कितीही लाडीगोडी लावली तरी तू सावध राहा. तिच्या जाळ्यात फसू नकोस. नाहीतर एक दिवस ही बया तुझ्या बापाची सगळी इस्टेट त्या पोरांच्या घशात घालेल,” कोमल येताजाता किमयाच्या मनात विष पेरायची.

म्हणूनच बारावी झाल्यावर किमयाने आर्किटेक्चरचं शिक्षण घेण्यासाठी लांबचं कॉलेज निवडलं. त्यात उत्तम प्रगती केली. दिसायला चारचौघींत उठून दिसणारी, शिक्षणात हुशार, मनमिळाऊ आणि करीअरच्या बाबतीत अतिशय ॲम्बिशियस अशा आपल्या लेकीकडे बघून जयराजची छाती गर्वाने फुलायची. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्वत:ची फर्म सुरू करायचं ठरवलं होतं आणि जयराजनी सर्वतोपरी तिच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं; पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

परीक्षा, त्या पाठोपाठची इंटर्नशिप, ती करता करताच स्वत:चं स्टार्टअप सुरू करण्याच्या व्यापात किमया पुरती बुडून गेली होती. तिला अलिकडे थकवा येत असे. थोडा वेळ जास्त उभं राहिलं तर पायांना सूज येत होती. अन्नावरची वासना उडू लागली होती, त्यामुळे वजनही झपाट्याने कमी व्हायला लागलं होतं; पण कामाच्या धावपळीत तिचं ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. एक दिवस किमया चक्कर येऊन बेशुद्ध पडली. जयराजनी तातडीने तिला त्यांचे बेस्ट फ्रेंड आणि फॅमिली डॉक्टर विनोद शहा यांच्या सुश्रुषा नर्सिंग होममध्ये ॲडमिट केलं. तिच्यावर वेळेत उपचार सुरू झाले आणि ती शुद्धीवर आली; पण दरम्यान तिच्या ज्या तपासण्या करण्यात आल्या त्यातून एक भयंकर सत्य समोर आलं.

“किमयाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत जयराज.” डॉक्टर विनोद यांचं बोलणं ऐकून जयराजच्या पायाखालची जमीन सरकली. अवघी पंचविशीत असलेली आपली एकुलती एक मुलगी इतक्या भयंकर आजराची शिकार झालीय ह्या जाणिवेनेच ते हादरून गेले. हे पाहून त्यांच्या डॉक्टर मित्राने त्यांना धीर दिला.

“घाबरू नकोस, माझ्या ओळखीचे एक खूप हुशार नेफ्रोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर साळुंके. आपण त्यांचा सल्ला घेऊ आणि त्यांच्याकडेच किमयाची पुढची ट्रीटमेंट लगेच सुरू करू.” डॉक्टर विनोद म्हणाले.

साळुंकेंच्या सांगण्यानुसार किमयाच्या आणखी काही तपासण्या झाल्या. तिला डायलिसीसवर ठेवण्यात आलं. आपल्या आजाराचं नाव ऐकूनच किमया खचून गेली होती. तिला तिचा अकाली अंत दिसू लागला होता. तिचा जगण्याचा उत्साह मावळला. हे सगळं जयराज उघड्या डोळ्यांनी बघत होते. तेही कणाकणाने संपत होते.

“अहो, तुम्हीच खचून गेलात तर किमयाला जगण्याची उभारी कोण देणार?” जान्हवीने नवऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. “मी तिच्याशी काही बोलायला गेले तर ती धड बोलणार नाही आणि ह्या परिस्थितीत तिला ज्यामुळे त्रास होईल असं काहीही मी करणार नाही. निदान तुम्ही तरी तिला धीर द्या. सावरा स्वत:ला. ह्यावेळी तिला तुमच्या आधाराची गरज आहे.” जान्हवीने त्यांचा हात हातात घेत म्हटलं.

“सगळं संपलं जान्हवी. किमयाला काही झालं तर मी जगू शकणार नाही.” जयराज पुरते हताश झाले होते.

“काहीही संपलेलं नाहीये. डॉक्टर साळुंके म्हणालेत ना, किडनी ट्रान्सप्लांट केली तर किमया वाचू शकते. आपण त्यासाठी प्रयत्न करू या.”

“इतकं सोप्पं नाहीये ते.” एकुलत्या एक मुलीला गमावण्याच्या अनामिक भीतीने जयराजना काहीच सुचत नव्हतं.

“काय अवघड आहे त्यात? तिच्या ट्रीटमेंटसाठी कितीही खर्च येऊ द्या आपण करू. देवाच्या दयेने आपल्याकडे इतकं नक्की आहे कि आपण आपल्या मुलीचा जीव वाचवू शकू.”

“नुसता पैसा फेकून माझ्या मुलीचा जीव वाचणार असेल, तर मी तिच्यावरून सगळं वैभव ओवाळून टाकायला तयार आहे. किमयाला किडनी देऊ शकेल असा डोनर मिळायला हवा, तोही लवकरात लवकर.” शब्दागणिक त्यांची हतबलता वाढत होती.

“डॉक्टर साळुंके म्हणत होते कि डोनर्ससाठीची वेटिंगलिस्ट मोठी आहे. आपला नंबर येऊन किमयाला मॅच करणारा डोनर मिळायला किती दिवस, महिने, वर्षं लागतील काही सांगता येत नाही.” जयराजनी ओंजळीत चेहरा लपवत अश्रूंना वाट मोकळी केली.

“देवावर विश्वास ठेवा. तोच ह्यातून मार्ग दाखवेल; पण तोवर आपल्याला खंबीर राहायला हवं. तिला जगण्याची उमेद द्यायला हवी. आता ऑफिसचं सगळं टेन्शन माझ्यावर सोडा आणि डोनर मिळेपर्यंत तुम्ही फक्त ह्या एका गोष्टीचा पाठपुरावा करा, कराल ना एवढं आपल्या लेकीसाठी?” जान्हवीच्या बोलण्याने जयराजच्या मनातही आशेचे किरण डोकावू लागले.

जयराजच्या कामाची सगळी सूत्रं जान्हवीने आपल्या हातात घेतली. जयराज किडनी डोनर्ससाठी जमतील ते प्रयत्न करत होते; पण पदरी निराशाच येत होती. अशावेळी जान्हवी त्यांना धीर द्यायची. नवी उमेद द्यायची. एक एक दिवस एकेका युगासारखा वाटत होता जयराजना. किमयाच्या आयुष्याची दोर बळकट होती म्हणा किंवा जयराज-जान्हवीची इच्छाशक्ती, अखेरीस देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि किमयासाठी डोनर मिळाला.

त्यानंतरचे पुढचे सगळे सोपस्कार घाईने पार पडले. किमयाच्या ऑपरेशनसाठी जयराजनी कोमलला बोलवून घेतलं. यथावकाश तिचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि किमयाच्या जीवाचा धोका टळला असल्याचा निर्वाळा डॉक्टर साळुंकेंनी दिला. तेव्हा कुठे जयराजच्या जीवात जीव आला. किमयाकडे बघता बघता त्यांना हे सगळं आठवलं आणि डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या. कोमलच्या बोलण्याने ते भानावर आले.

“सगळं आलबेल असताना माझ्या पोरीला कोणाची नजर लागली पांडूरंगालाच माहीत!” कोमल म्हणजेच किमयाची आत्या डोळ्याला पदर लावत आपल्या भावाला बोलली.

“ताई, ऑपरेशन व्यवस्थित झालंय, आता किमयाच्या जीवाला कसलाही धोका नाहीये. डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलंस ना?” जयराज आपल्या बहिणीला शांत करत म्हणाले.

“हो, पण जीवावरचं दुखणं तर उद्भवलंच ना? मी सांगते तुला, त्या अवदसेची नजर लागली किमयाला.” कोमलची तणतण सुरूच होती.

आता मात्र जयराजच्या कपाळावर नाराजीची आठी दिसू लागली.

“जान्हवी बायको आहे माझी!” ते जरा चढ्या आवाजात बोलले.

इतक्यात जवळच्या बेडवर शांतपणे झोपलेल्या आपल्या लेकीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी आपल्या बोलण्याला आवर घातला; पण गप्प बसेल तर ती कोमल कसली? आपल्या लहान भावाने आपल्याशी वरच्या पट्टीत बोलणं तिला सहन झालं नाही.

“तेच तर, ती फक्त तुझी बायको आहे. माझ्या किमयाची आई होणं तिला कधी जमलं नाही आणि जमणारही नाही.” कोमल आपला हेका सोडायला तयार नव्हती.

“ह्या गोष्टी आत्ता बोलायलाच हव्यात का?”

“मला का गप्प करतोयस? तुझ्या बायकोला समज दे त्यापेक्षा. किमयाचं ऑपरेशन झालं; पण इतक्या दिवसांत ती एकदा तरी इकडे फिरकली?” कोमलला तिची तक्रार रास्तच वाटत होती.

“तिला एका प्रोजेक्टच्या कामाच्या संदर्भात चिपळूणला जावं लागलं. आमच्या दोघांपैकी एकाने तिकडे जाणं गरजेचं होतं, तुला बोललोय मी हे.”

“कशाला बायकोच्या चुकांवर पांघरूण घालतो आहेस? किमयाच्या जागी तिचा मुलगा असता आणि त्याच्यावर अशी वेळ आली असती, तर तेव्हाही ती बया कामासाठी गेली असती? मी पण काय प्रश्न विचारतेय? दगडाच्या काळजाची आहे ती म्हणून तर स्वत:च्या मुलांनाही टाकलंच होतं तिनं.” कोमल तोंडाला येईल ते बरळत होती.

“तुला काय हवा तो अर्थ काढ तू ताई, मी ह्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही आणि किमयाला डिस्चार्ज देणार आहेत दोन दिवसांत. मला त्याकडे पण लक्ष द्यायला हवंय.” जयराजनी विषय टाळण्यासाठी डॉक्टरांना भेटून येतो सांगत काढता पाय घेतला.

दोन दिवसांनी किमया डिस्चार्ज होऊन घरी परत आली. कोमलसुद्धा काही दिवस तिच्यासोबत दिवाणांच्या बंगल्यावर थांबणार होती.

किमयाचं ऑपरेशन झालं, घरी आली तरी जान्हवीचा अजून पत्ता नव्हता. ह्याचा कोमलला चांगलाच राग आला होता.

“फरगेट इट आत्तू, ती बाई असली काय किंवा नसली काय, मला काहीच फरक पडत नाही.” किमया निर्विकार सुरात बोलली. त्यामुळे जान्हवीबद्दल तिच्या मनात आणखी विष कालवण्याचा कोमलचा प्रयत्न अयशस्वी झाला. इतक्यात बाहेरून कोणाच्या तरी जोरजोरात बोलण्याचे आवाज त्यांच्या कानावर पडू लागले.

“हा प्रश्न विचारण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये.” जयराज कोणाला तरी चढ्या आवाजात समज देत होते.

“पप्पा कोणाशी शइतक्या मोठ्याने बोलतायत? सगळं ठीक आहे ना आत्तू?” किमयाने काळजीने विचारलं.

“तुझं ऑपरेशन झाल्यापासून जयराज घरीच आहे. कामाच्या संदर्भात काहीतरी वाद सुरू असतील. तू आराम कर, मी बघते.” कोमल तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेत बाहेर गेली. बघते तर काय, एक वयस्क गृहस्थ आणि दोन तरुण जयराजबरोबर वाद घालत होते.

“अधिकार कसा नाही? आमची जन्मदाती आई आहे ती.” दोघांतला एक तरुण रागाने बोलला.

“तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तुम्ही तिची फसवणूक केलीय; पण आम्ही गप्प बसणार नाही.” त्या वयस्क गृहस्थाने दात विचकत तरुणाची री ओढली. कोमलला त्यांच्या बोलण्यावरून ते कोण आहेत ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता.

“तू तर बोलूच नकोस!” जयराजने त्याच्यापेक्षा वरचा आवाज लावला. “सालस बायकोचं पायपुसणं करून तू बाहेर शेण खात होतास, तेव्हा तिची फसवणूक करतोय ह्याची जाणीव झाली नाही तुला? आता आलायस मला जाब विचारायला.” जयराजने आरसा दाखवल्यावर तो इसम गप्प झाला. आता जयराजने त्या मुलांकडे आपला मोर्चा वळवला.

“आणि तुम्ही रे, त्यावेळी तुम्हाला बापाचा पैसा हवा होता. म्हणून आईची कास सोडून बापाचा हात धरलात तुम्ही. इतक्या वर्षांत आपली आई कशी आहे ह्याची एकदा तरी चौकशी केलीत?”

“ते आम्ही आमचं बघून घेऊ.” दुसऱ्या तरुणाने जयराजचं बोलणं मधेच तोडलं.

“तुम्ही तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आमच्या आईला फूस लावलीत. तिला तिची किडनी द्यायला वेठीस धरलं. आम्ही तुमच्यावर केस करू.” त्याने जयराजला धमकी दिली आणि कोमल आ वासून सगळं ऐकत होती.

‘किमयाला किडनी देणाऱ्या कुठल्याशा बाईची मुलं आणि नवरा दिसतायत.’ कोमल स्वतःशी पुटपुटली.

‘पण तिच्याबद्दल जयराजला इतकी सगळी माहिती कशी? माझ्या माहितीनुसार अवयव दान करणाऱ्यांची आणि ती घेणाऱ्यांची नावं गुप्त ठेवतात.’ तिचं स्वगत सुरूच होतं.

“आणि कोर्टाची पायरी चढायची नसेल तर मुकाट्याने आम्हाला तिच्या किडनीचे पैसे मोजा.” समोरची लोकं जयराजला उघड उघड धमकी देतायत हे पाहून कोमल पुढे आली.

“जयराज, कोण आहेत हे लोक? आपल्या घरी येऊन असा गोंधळ घालायची ह्यांची हिंमत कशी झाली?”

“आमच्या हक्काचे पैसे घ्यायला आलोय इथे. तुमच्या ह्या भावाने माझ्या आईला फसवून तिची किडनी फुकटात लाटली.” त्या तरुणाने कोमलला माहिती पुरवली.

“तोंडाला येईल ते बरळू नका. माझ्या भावाने आजवर कोणाला एका नव्या पैशाला फसवलेलं नाहीये. तुमच्या आईने तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती दिली असेल.” कोमल म्हणाली.

“चुकीची माहिती द्यायला ती कुठे आहे हे आम्हाला माहिती असायला हवं ना? तिची किडनी काढून घेतल्यावर तुमच्या भावाने तिला कुठेतरी लपवून ठेवलंय.” त्या इसमाने पुन्हा दात विचकले. कोमल अविश्वासाने जयराजकडे बघू लागली.

“तू ह्यात पडू नकोस ताई आणि ह्यांच्या धमक्यांना घाबरायची काही गरज नाही. यांच्यासारख्या पैशासाठी हपापलेल्या लोकांबरोबर कसं डील करायचं मला चांगलंच माहितीये. तू जा, किमयाजवळ थांब.” जयराजनी तिला आश्वस्त केलं.

“आणि तुम्ही, मी तुमच्या आईला फसवून तिची किडनी मिळवलीय हे तुम्ही कोर्टात सिध्द करा, तुम्ही मागाल ती किंमत मी देईन; पण आत्ता माझ्या घरातून चालते व्हा. नाहीतर मी पोलिसांना फोन करेन.” जयराजची ही मात्रा चांगलीच लागू पडली. तिघांनी तिकडून काढता पाय घेतला. जयराज जरा हुश्श करणार इतक्यात तो इसम मागे वळला.

“ए दिवाणऽऽऽ” जयराज आणि कोमल त्याच्या आवाजाने दाराकडे वळून बघू लागले.

“जान्हवीला तू कुठे पाताळात लपवून ठेवलं तरी मी तिचा शोध घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, लक्षात ठेव‌.” एवढं बोलून तो आपल्या मुलांना घेऊन निघून गेला. कोमलला त्याच्या बोलण्याचा काहीच उलगडा झाला नाही.

“जान्हवी?” तिने जयराजकडे बघितलं. “हा जान्हवीचा पहिला नवरा आणि ती तिची मुलं होती?” आता तिच्यापासून सत्य लपवण्यात काहीही अर्थ नव्हता. जयराजने होकारार्थी मान हलवली.

“म्हणजे किमयाला जान्हवीने किडनी दिली?” कोमलच्या आवाजात अविश्वास डोकावत होता.

“होय ताई, डोनरसाठीच्या प्रतीक्षा यादीत किमयाचं नाव खूप मागे होतं. किमयाची अवस्था पाहून मी कणाकणाने तुटत होतो. हे पाहून मी आणि जान्हवी दोघांनी आपापली किडनी मॅच होतेय का ह्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं आणि देवाची करणी बघ, माझी किडनी मॅच झाली नाही; पण देवाने ते भाग्य जान्हवीच्या पदरात घातलं.” जयराज भरल्या गळ्याने सांगत होते.

“ही गोष्ट किमयाला समजू देऊ नका अशी जान्हवीचीच इच्छा होती. म्हणून ती ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जातेय असं तुम्हाला सांगायचं आम्ही ठरवलं. ज्या दिवशी किमयाचं ऑपरेशन झालं त्याच दिवशी आधी जान्हवीला ऑपरेट करून तिची किडनी काढण्यात आली होती आणि म्हणून मी किमयाजवळ थांबण्यासाठी तुला बोलवून घेतलं.”

“किमयाचं ठीक आहे; पण हे सत्य तू माझ्यापासून का लपवून ठेवलंस? इतकी परकी केलीस तू मला?”

कोमलच्या बोलण्यावर जयराज गप्प होते.

“मला जान्हवी तितकीशी आवडत नाही मान्य आहे. अरे पण सख्खी आई करणार नाही एवढा मोठा त्याग तिने केला आणि मी इतके दिवस मी तिलाच दूषणं देत राहिले. स्वतःचं वागणं आठवलं तरी मला माझी लाज वाटतेय जयराज.” कोमल चांगलीच खजील झाली होती.

“तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी तसाच विचार केला असता. त्यात तुझी काहीही चूक नाही ताई आणि तू जे काही बोलत होतीस ते किमयावर असलेल्या प्रेमापोटीच होतं. उगीच स्वत:ला दोष देऊ नकोस.” बहिणीच्या मनात कुठल्याही प्रकारचं शल्य राहू नये म्हणून जयराज प्रयत्न करत होते.

“आत्ता जान्हवी कुठे आहे?” कोमलने विचारलं.

“आमच्या एका स्टाफच्या घरी तिची व्यवस्था केलीय थोड्या दिवसांसाठी.”

“त्याची काहीही गरज नाही. आपण दोघं आत्ता जायचं आणि जान्हवीला इकडे घेऊन यायचं.”

“नको. तिला बरं वाटेपर्यंत तिकडेच राहू दे. किमयापासून ही गोष्ट लपवायचा हाच एक मार्ग आहे.” जयराजने बहिणीची समजूत घातली.

“तसं असेल तर मीसुद्धा तुमच्या त्या स्टाफच्या घरी राहायला जाते.” किमयाच्या रूमच्या दिशेने आवाज आला. दोघांनी वळून बघितलं तर किमया उभी होती. तिचे दोन्ही डोळे वाहत होते. तिला पाहून जयराज धावत तिच्या दिशेने आले.

“तू? तुला आराम करायला सांगितलंय ना डॉक्टरांनी? मग उठून का आलीस?”

“मी उठून आले नसते तर इतकं मोठं सत्य मला कधीच समजलं नसतं.” किमया पालथ्या हाताने डोळे पुसत बोलली.

“पप्पा, आत्तू म्हणतेय ते ऐका प्लीज. तिला घरी घेऊन या. माझ्यासाठी...” किमयाच्या ह्या बोलण्यावर कोमलने होकारार्थी मान हलवली आणि जयराजने हसून त्यांचं म्हणणं मान्य केलं.

“ताई, तू किमयाजवळ थांब, मी जान्हवीला घेऊन येतो.” जयराज तडक निघाले.

***

तासाभरातच जयराज जान्हवीला घेऊन घरी आले. त्यांनी जान्हवीला कसलीही कल्पना दिली नसावी बहुतेक. कारण ते आले तेव्हा हॉलमध्ये कोणीही नव्हतं. जयराजनी आधार देत तिला घरात घेतलं.

“सावकाश. इथे बस थोडा वेळ.” जयराजनी जान्हवीला सोफ्यावर बसवलं.

“अहो, आता तरी सांगा, मला असं तडकाफडकी का घेऊन आलात? किमया नक्की बरी आहे ना?”

“कुठली मुलगी आईशिवाय बरी असेल?” समोरून आवाज आला तसं जान्हवीने चमकून बघितलं. कोमलच्या आधाराने किमया पुढे आली आणि थेट जान्हवीच्या कुशीत शिरली.

“मला माफ कर आई. प्लीज फरगिव्ह मी.” किमयाला अश्रू अनावर झाले होते.

“आई! तू मला आई म्हणून हाक मारलीस?” जान्हवीचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. “पुन्हा एकदा हाक मार आई म्हणून...”

“आई...” जान्हवीच्या डोळ्यातले अश्रू पुसत किमयाने तिला पुन्हा हाक मारली.

“जिने मला जन्म दिला तिला तर मी कधी बघितलं नाही; पण जी इतकी वर्षं माझ्यावर सेल्फलेसली प्रेम करत होती, तिचं प्रेमही मी ओळखू शकले नाही. मला माफ कर.” किमयाच्या ह्या बोलण्यावर जान्हवीने तिला मिठीत घेतलं.

“आणि मलाही माफ कर जान्हवी. किमया तुझ्याशी फटकून वागत होती त्याला कळत नकळत मीच जबाबदार होते.” कोमलने मोठ्या मनाने आपली चूक मान्य केली.

“झालं गेलं सगळं विसरून जाऊ या ताई. किमयाने मला आई म्हटलं, हिच्या तोंडून ही हाक ऐकायला माझे कान आसुसले होते. आज मी कृतकृत्य झाले!” जान्हवीच्या बोलण्याने सगळेच हेलावले.

किमयाने तिला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या प्रवाहात मागचे सगळे गैरसमज दूर झाले होते.

समाप्त
© स्मिता प्रकाशकर
0