Login

कृपाळू हा..

माझे आजोबा... पांडुरंग जणू
आज माझं अंगण रिकामं होत. वाटल काय कमी आहे बरं... पालखी येणार म्हणून अंगणात सडा रांगोळी आहे. तुळस सजली आहे. घरातील पाखर अंगणात वावरत आहेत.. पण नजर माझी एका जागी स्थिर नव्हती... तेवढ्यात अंतरंगातून एक आवाज आला " अग वेडाबाई तू ज्याला शोधत आहे तो अंगणात कधीच दिसणार नाही " देवा....काय रे तुझी लीला...
गेली 35 वर्ष आजच्या ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी गळ्यात तुळशी माळ अंगात पांढरा सदरा आणि पायजमा हातात टाळ आणि कपाळावरती टिळा लावून तयारीत असणारा माझा पांडुरंग कुठे आहे???
माझे आजोबा श्री. वाळकु चव्हाण म्हणजेच गावातील जुने वारकरी..
संत परंपरा जपणारे नाही तर संत सत्व घेऊन जन्माला आलेले..
अत्यंत शांत आणि संयमी. ही वडिलधारी माणसं म्हणजेच वटवृक्षाच्या झाडाप्रमाणे असतात. असल्यावर वाटतं आपण छताखाली आहोत आणि आणि नसल्यावर वाटतं आपण पोरके आहोत. वडील जाऊन सहा वर्ष झाली... त्यांची उणीव आहेच पण वेळेनुरूप आजोबांनी ती कधी भासू दिली नाही.
वाटायचं आमचं दुःख सारखंच आहे. आमच्याकडे आमचा बाप नाही आणि आजोबांकडे त्यांचा मुलगा... नियतीच्या या खेळाची कल्पना कोणीच करू शकणार नाही.शरीर जीर्ण होत चाललं होत... पण जगण्याची असीम ऊर्जा त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळकायची...
मी संत गाडगेबाबा कधी पाहिले नाहीत... पण त्यांना स्वच्छतेचा ध्यास होता हे वाचण्यात मात्र आले आहे. पण माझे आजोबा म्हणजेच दुसरे गाडगेबाबा च जणू..
घरासमोरील झाडांना वेळेत पाणी, अंगणातील परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर... याचा अर्थ बाबा घरात आहेत..
पण जसे ते अंथरुणावर पडले तसे सारेच हरले...
झाड फुल हिरमुसली...
अंगण अबोल झाला...
बाबांची तळमळ वाढत होती... श्वासांची गति मंदावत होती.. आकाशातील सूर्य मावळतीला जात होता आणि माझ्या घरचा सूर्य देखील...
नातलगांनी भरलेलं घर.. रडण्याचा हंबरडा, जीवाची घालमेल...काही क्षणात सार शांत झालं...
सर्व असामंतात विलीन झालं..
आज मंदिरातील विठ्ठलाकडे पाहून वाटतं..
" सावळ्या माझ्या विठ्ठलाच मंदिरात मी कधी पाहिला नाही
घरचा माझा पांडुरंग विटेवर कधी उभा राहिला नाही..
तुझ्याच कडे आहे आता, तू काळजी घे,
घर माझं रिकामा, बा तूच लक्ष दे
पदरात संस्कारांची शिदोरी देऊन माझा विठ्ठल निघून गेला..
फक्त पाऊल खुणा आहेत मागे, आम्हा चालायला ".