कोकणातील गूढकथा २

ही एक काल्पनिक कथा आहे.

ही गोष्ट फार अलीकडची आहे. २०१६ मध्ये दिवाळीत मी भाऊबीजेसाठी बहिणीकडे जात होतो. माझी बहिण ज्या गावात राहते तिकडे सरळ हायवेने ही जाता येते आणि मधूनच एक वाट आहे छोट्या गावातून तिथून ही जाता येते. त्या वाटेने अंतर जरा कमी पडतं आणि वेळ ही खूप वाचतो. त्यामुळे लवकर पोहचता येईल असा विचार करून मी मधल्या वाटेने निघालो.
त्या रस्त्याच्या चकाव्याच्या गोष्टी खूप ऐकल्या होत्या. पण माझा काही या गोष्टींवर कधी विश्वास नव्हता.
साधारण दुपारी बाराच्या सुमारास मी त्या रस्त्याला आत शिरलो.

तितक्यात बहिणीचा फोनही आला.. म्हणुन मी गाडी थांबवली.. समोरच रामेश्वराचं देऊळ होतं.

"हा बोल.. निघालंय.. येतंय गो.. मधल्या वाटेन.. आता रामेश्वराच्या देवळाकडे आसय..अर्ध्या तासात तुझ्याकडे पोचतंय..!"

" हा..ये ...सावकाश ये .." असं म्हणुन तिने फोन ठेवला.

आता दर्शन घेण्यापेक्षा येताना घेऊ निवांत असा विचार करून मी तिथूनच रामेश्वराच्या पाया पडलो आणि निघालो पुढे. रस्ता अगदी ओळखीचा होता.. मी खुपदा याच वाटेने बहिणीकडे जायचो. त्यामुळे रस्ता चुकणं शक्यच नव्हते.

पण काहीतरी घोळ झाला.. दहा मिनीटांत मी परत देवळाच्या समोर येऊन पोहोचलो.

मी थोडासा चक्रावलो... पण तरीही परत गाडी पुढे नेली. पाच मिनिटांनी मला पाच जांभळीचा स्टॉप दिसला.. म्हटलं आलो... सापडला रस्ता.." मी सुटकेचा निश्वास सोडला की वाट सापडली.

मग गाडी सुसाट सोडली. पण पाच मिनिटांत मी परत रामेश्वराच्या दारात..

मी कपाळावर हात मारला.
पुढच्या अर्ध्या तासात असे माझ्यासोबत दोनवेळा घडले. आता मी पुरता घाबरलो होतो. शेवटी गाडी लावली आणि देवळात गेलो. नमस्कार केला. देवाला साकडं घातलं.. आणि दहा मिनिटानी जीव शांत करुन निघालो.

साधारण अर्धा किलोमीटर पुढे गेलो आणि एक माणुस लिफ्ट मागत होता. बिचारा उन्हाचा चालला होता. मी गाडी थांबवली.

"खय ओ चललात उन्हाचे?"

"पावण्यांनू.. माका जरा थयसर काठी पाशी सोडाशात काय??"

मी मानेनेच हो म्हटलं. काठी म्हणजे पोलीस चेक पोस्ट माझ्या बहिणीच्या घराच्या आधी साधारण किलोमीटर भर होतं.

तो माणूस गाडीवर बसला. आणि आम्ही निघालो..

पुढच्या २०-२५ मिनिटांत मी सुखरुप बहिणीकडे पोहचलो.

इतका उशीर झाला म्हणून ती काळजी करत होती.. तिने चार फोन केले होते.. पण मला काही ते ऐकू नाही आले.

"किती उशीर केलंस... आणि फोन पण उचलूक नाय.. मगाशी देवळाकडे होतंस मा?? अर्ध्या तासात येतं म्हटलंस आणि अडीच वाजले आता.."

मी जे घडलं ते खरं सांगितलं

"माका बहुतेक चकवो लागलो.."

झालेली घटना मी बहिणीला आणि भावोजीना सांगत होतो आणि बोलता बोलता माझ्या लक्षात आलं तो माणूस ज्याने लिफ्ट मागितली?? तो गेला कुठे??

तो गाडीवर बसल्यापासून बहिणीच्या घरी येईपर्यंतचं मला काहीही आठवत नव्हतं.. त्या माणसाने मला काठीपाशी उतरायला थांबवलं पण नव्हतं..? मग तो गेला कुठे? गाडीवरून उतरला कधी?? मला काहीच आठवेना..!!

मी मुकाटपणे भाऊबीज केली.. जेवलो आणि बहिणीचा निरोप घेऊन गुपचूप घरी आलो..

हा मात्र हायवेने..!!!

समाप्त

कथा पुर्णतः काल्पनिक असून समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. फक्त मनोरंजन म्हणून वाचावी