Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १५

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १५
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग १५

नर्मदा सदनच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या त्या आलिशान मर्सिडीजने संपूर्ण गल्लीचे लक्ष वेधून घेतले होते. साक्षी धावतच जिने उतरून खाली आली. अमेयला तिथे, त्या अरुंद गल्लीत आणि जुन्या वाड्या समोर पाहून तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. तिला भीती होती की, अमेय तिचे हे मध्यमवर्गीय जग पाहून तिच्या बद्दलचे मत बदलून टाकेल.

" सर, सॉरी... रियली सॉरी ! तुम्हाला अशा ठिकाणी स्वतःहून यावं लागलं. तुम्ही फोन केला असता तर मी स्वतः ऑफिसला आले असते." साक्षी धापा टाकत म्हणाली. तिच्या आवाजात अतीव अपराधीपणा होता.

अमेयने गाडीला टेकून उभे राहत आजूबाजूच्या जुन्या पडक्या भिंतीं कडे आणि उघड्या गटाराच्या झाकणा कडे तिरस्काराने पाहिले.

" इट्स ओके साक्षी. पण तुझ्या घराचा पत्ता शोधणं म्हणजे एखाद्या भूलभुलैया मध्ये किंवा एखाद्या जुन्या काळात फिरण्यासारखं आहे. ही स्कायलाईनची सर्वात महत्त्वाची फाईल आहे. यात काही तांत्रिक बदल झाले आहेत, मला उद्या सकाळी ९ वाजता त्याचा पूर्ण रिव्ह्यू रिपोर्ट ऑफिसमध्ये हवा आहे." असं म्हणून अमेयने ती जाडजूड फाईल जवळपास तिच्या अंगावर भिरकावल्या सारखी दिली.

साक्षी ती फाईल हातात घेऊन मान खाली घालून गप्प उभी राहिली. अमेयची ती उद्धट वागणूक तिला जाणवत होती, पण त्याच्या प्रभावाखाली ती गप्प होती. तन्मय गॅलरीतून हे सर्व पाहत होता, त्याचा संयम आता सुटला होता. तो शांतपणे खाली आला आणि साक्षीच्या बाजूला येऊन उभा राहिला.

" साक्षीने ही फाईल उद्या दिली असती तरी चाललं असतं ना मिस्टर जहागीरदार ? आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस हा कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी असतो." तन्मयने अतिशय स्पष्ट पण शांत आवाजात विचारले.

अमेयने आता आपली नजर वळवून तन्मयकडे थेट पाहिले. त्याने तन्मयला वरपासून खालपर्यंत अशा नजरेने पाहिले जणू तो एखादा क्षुद्र जीव आहे.

" ओ.. संडे ? माझ्या डिक्शनरीत सुट्टी नावाचा शब्द नसतो. प्रगती करायची असेल तर घड्याळाचे काटे विसरावे लागतात. आणि मुळात तू कोण आहेस मला काम कसं करावं हे शिकवणारा ? "

" मी तन्मय. साक्षीचा बालमित्र. आणि व्यवसायाने बँकर आहे."

तन्मयने आपला संयम कायम ठेवत आणि अमेयच्या डोळ्यांत डोळे घालून उत्तर दिले.

" बँकर ? ओ, आय सी. " अमेय उपरोधिकपणे हसला आणि त्याने आपल्या महागड्या सुटाची बाही नीट केली.

" एका लहानशा सरकारी बँकेत बसून पासबुक प्रिंट करणारं किंवा लोकांसाठी रांगेत उभं राहणारं काम करत असशील. म्हणूनच तुला सुट्टीचं महत्त्व वाटतंय. ओरियन ग्रुपमध्ये आम्ही जगाचा इतिहास लिहितो, कोणाचं पासबुक नाही. वी क्रिएट हिस्ट्री.आमच्या एका निर्णयावर हजारो लोकांचं भविष्य अवलंबून असतं, त्यामुळे आम्हाला २४ तास ऑन ड्युटी राहावं लागतं."

साक्षीने तन्मयच्या हाताला स्पर्श करून त्याला गप्प राहण्याची विनंती केली, पण तन्मयने आज मागे हटायचे ठरवले नव्हते.

" काम कोणतंही असो मिस्टर जहागीरदार, माणुसकी आणि समोरच्याचा आदर या दोन गोष्टी कोणत्याही मोठ्या व्यवसायापेक्षा मोठ्या असतात. तुम्ही जगाचा इतिहास लिहीत असाल,
पण तुम्हाला स्वतःच्या संस्कृतीचा आणि माणसांचा आदर करण्याचा धडा गिरवायला कदाचित वेळ मिळाला नसावा. व्यवसायात नफा मिळवणं सोपं आहे, पण विश्वास मिळवणं कठीण असतं."

अमेयचा चेहरा रागाने लाल झाला. त्याला आजवर त्याच्या साम्राज्यात कोणीही अशा प्रकारे प्रत्यक्षपणे उत्तर देण्याची हिंमत केली नव्हती. अमेयने साक्षीकडे पाहिले, जी या दोघांच्या वादात पूर्णपणे पिचली जात होती.

" साक्षी, तुझ्या या मित्राला सांग की माझ्याशी कसं बोलायचं ते. त्याची ही फालतू तत्वज्ञानं ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. पण एक लक्षात ठेव, तुझ्या मित्राच्या या जिभेमुळे तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते, हे कदाचित त्याला माहीत नसावं."

अमेयने धमकीवजा थंड स्वरात म्हटले आणि गाडीचा दरवाजा जोरात आपटून तो आत बसला.
मर्सिडीज वेगाने निघून गेली आणि गल्लीत फक्त धूर आणि शांतता उरली. साक्षीने रागाने तन्मयकडे पाहिले.

" काय गरज होती तन्या हे सगळं करण्याची ? तुला माहितीये ना ते माझे बॉस आहेत ? माझं करिअर उद्धवस्त झालं असतं तर ? "

" तुझं करिअर माणसांच्या अपमानावर उभं राहणार असेल, तर ते नको असलेलं बरं साक्षू. " तन्मय इतकंच म्हणाला आणि शांतपणे वाड्यात निघून गेला. नर्मदा सदनच्या भिंतींनी आज पहिल्यांदा दोन वेगवेगळ्या विचारांच्या युद्धाचा अनुभव घेतला होता.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही