सरोळीतील कॕटरींग व्यवसायाला रुचकरतेची जोड ..!
हिरण्यकेशी नदीच्या काठावर ऐटीत वसलेले आणि विपुल नैसर्गिक संपन्नतेने नटलेले सरोळी हे आमचे गाव अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. अन्न हे पुर्णब्रम्ह आहे. हेच अन्न जेंव्हा तयार करुन अनेक लोकांना वाढले जाते तेंव्हा आचारी लोकांची गरज लागते.आपल्या गावातील अशा आचारी लोकांची जेवण करण्याची कला अद्भुत आणि अवर्णनीय आहे. खमंग ,रुचकर जेवणातील गोडी त्यांच्यातील कसब जेवणाला आणखी लज्जत वाढवते.पूर्वी गावात कै. गणपती पाटील,कै.बाबुराव पाटील व कै. दत्तात्रय पाटील या मंडळीनी गावातील विविध समारंभात जेवणाची धुरा सांभाळली होती. प्रगत तंत्रज्ञान नसतानासुद्धा या आचारी लोकांच्या हाताला वेगळी चव होती. त्यांनी केलेला येळलेला भात , डाळीची आमटी खूपच चविष्ट लागायची.याच लोकांची सगळी कला गणपती बाबूराव पाटील यांनी आत्मसात केली येथूनच याला व्यापकतेचे स्वरुप मिळाले.
गणपतरावांनी यामध्ये चांगलाच जम बसवलेला होता. वाढती मागणी लक्षात घेता नवीन तरुण मुलांना तयार करुन गावात आचा-यांचा संच तयार केला. यामध्ये शिवाजी नलवडे ,शिवाजी पाटील , संदेश पाटील यांनी उत्साहाने यामध्ये काम करण्यास सुरवात केली.काळ बदलला समारंभासाठी वेगवेगळ्या जेवणाच्या रेसिपी आल्या याचाही बदल या आच्या-यांनी केला आणि येथूनच कॕटरींग व्यवसाय म्हणून यांनी सगळीकडे काम करण्यास सुरवात केली.
जेवणाच्या या प्रकारात मसाले भात ,आमटी, कुर्मा, भाजी , खुशखुशीत भजी ,चपाती, शेवयाची व गव्हाची खीर अशा विविध पदार्थांची रेलचेल असलेमुळे अनेक गावातून त्यांना जेवण करण्यासाठी मागणी आहे. लग्न समारंभ ,नामकरण सोहळा वाढदिवस गावातील महाशिवरात्र उत्सवात आणि सार्वजनिक गणेश उत्सव व हनुमान जन्मोत्सव , भावेश्वरी व मंगाईदेवी यात्रा यामध्ये या आचा-यांचा सहभाग असतो. यांना मदतनीस म्हणून ज्या त्या समारंभात गावकरी मदत करतात.
सध्या हे आचारी गावातील सगळ्या कार्यक्रमात जेवण करतात. या व्यवसायामुळे त्यांच्यात आर्थिक सुबत्ता आली आहे. वाजवी दर आणि माणुसकीमुळे इतर गावातून त्यांना भरपूर मागणी आहे. घरातील इतर कामे करत या लोकांनी कॕटरींग व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे.
रुचकर ,स्वादिष्ठ , झणझणीत ,खमंग , चटकदार अशा प्रकारच्या जेवणाने सगळीजण तृप्त होतात.यामुळे या व्यवसायाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. आपले गाव सगळ्या गोष्टींनी समृद्ध असताना कॅटरींग व्यवसायाने गावचे नाव उज्वल केले आहे. कोणत्याही कलेकडे व्यावसायीक दृष्टीने पाहिले असता हमखास यश मिळते. गावातिल या आच्याऱ्यांच्या सेवाभावीवृत्तीने गावचा व त्यांचा लौकीक वाढला आहे. या व्यवसायातून त्यांची प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा….!