Login

खोडकर चिनू (करावे तसे भरावे )

The Story Of Mischievous Child
खोडकर चिनू (करावे तसे भरावे)


छोटा चिनू पहिलीत होता. स्वभावाने खूप खोडकर आणि मस्ती करणारा. कोणाला मारून पळायचे तर कोणाचा न सांगताच हळूच डब्बा खायचा असे त्याचे काहीना काही चालू राहायचे. त्याला शिक्षक आणि त्याचे आई-बाबासुध्दा समजावून थकले होते. तो तेवढ्यापुरते ऐकायचा, पुन्हा त्याचे त्रास देण्याचे काम सुरूच होते.

एकदा शाळेने पाच जणांचा मिळून संघ बनवण्याचा निर्णय घेतला होता. मुलांना एकत्र काम करण्याचे आणि एकमेकांना मदत करून कसे पुढे जाता येईल हे त्यातून दाखवायचे होते.

तर प्रत्येक संघाला एक विषय देवून त्यात त्यांना कोणी माहिती लिहून काढेल, कोणी त्याचे चित्र चिटकवेल,कोणी त्याबद्दल माहिती सांगेन असे त्यांच्या मध्ये काम विभागून देण्याचे काम पण त्यातलाच एक जण करेल असा उपक्रम त्यांनी ठेवला होता. वर्गात मुलामुलींची संख्या छत्तीस होती. सहा संघ झाले , सर्वांनी नावे देताना आपल्या मित्रमैत्रिणींच्या नावे दिली. राहिला होता तो चिनूच!

कोणी त्याला आपल्यासोबत घ्यायला तयार नव्हते. असाच तो घरी दुःखी चेहरा करून गेला.

घरी आल्यावर त्याने त्याच्या खोलीतल्या वस्तू रागाने इकडे तिकडे फेकल्या. आई त्याला ओरडली आणि आधीच कोणी न घेतल्याचे दुःख ताजे असताना, तो रागाने "मी कोणालाच नको आहे." असे म्हणून पलंगावर रडत बसला.

त्याचे काहीतरी बिनसले आहे, हे आईला समजले. चिनूने त्यातही फ्रीजमध्ये ठेवलेले सर्व चॉकलेट्स फस्त केले. आईने त्याला खूप वेळा काय झाले, म्हणून विचारले. त्याने सांगितले नाही.


रात्री जेवणानंतर त्याचे बाबा बाजूला बसले आणि त्यांनी विचारले ,"चिनू काय झाले बाळा? कोण तुला काही बोलले का ? ही आई तुला काही बोलली का?"

बाबांच्या प्रेमळ विचारण्याने चिनू मुसमुसतच मान हलवत नाही म्हणाला.

"मग काय झाले ?" पुन्हा त्याला जवळ घेत त्यांनी विचारले.

चिनूने रडत "मला कोणीच शाळेत त्यांच्यासोबत घेत नाहीत. कोणालाच मी नको आहे."

"आता काय केले तू ?" आईने आपल्या मस्तीखोर मुलाला विचारले.

"मी काही नाही केले आज...." रडत चिडून चिनूने उत्तरं दिलं.

त्याच्या बाबांनी इशारा केला, तसे त्याची आई खोलीच्या बाहेर निघून गेली.

"आपण उद्या शाळेत जाऊ. मग बघू. आता तू झोप शांतपणे." बाबा त्याचे अश्रू पुसत त्याला म्हणाले.

तो झोपेपर्यंत त्याचे बाबा त्याला थोपटवत होते.


दुसऱ्यादिवशी शाळेत गेल्यावर ,त्याच्या वर्गशिक्षिका होत्या त्यांच्याशी बोलणे झाले. मग त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बोलावले.

"तुम्ही चिनुला तुमच्या सोबत का घेत नाहीत?" असे शिक्षिकेने विचारले असता सर्वांनी मान खाली घातली.

"जो कोणी मला सर्व सांगेल त्याला, मी खरे सांगितले म्हणून एक चॉकलेट देईन." त्या शिक्षिका म्हणाल्या.

तशी एक चुणचुणीत आणि गुबगुबीत दिसणारी मुलगी
"मी सांगते."असे हात वरती करत पुढे आली.

"मॅडम,हा चिनू सर्वांना त्रास देतो. न विचारता आमचे डब्बे खातो. एकदा ना ह्याने माझे चोकलेटस् खाल्ले आणि त्याचा कागद कचरापेटीत न टाकता माझ्या दप्तरात टाकला. त्यादिवशी त्याने मनूने काढलेले चित्र होते त्यावर पाणी ओतले.  म्हणून आम्ही त्याला घेतले नाही."

"चिनू तू हे सर्व केलेस? " बाबांनी विचारले.

त्याने मान खाली घातली.

"मग सर्वांनी बरोबर केले." त्याचे बाबा म्हणाले.

टपटप करत त्याच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले. आज तो एकटाच शिक्षा केल्यासारखा उभा होता.

"चिनू तू सर्वांची माफी माग. असे करणार का तू परत?"
त्यांची मॅडम पुढे येवून त्याच्याजवळ जात म्हणाली.

त्याने मान हलवून नकार दिला.

"चिनू, तू खूप हुशार आहेस, पण असा त्रास दुसऱ्यांना द्यायचा नसतो. तू त्रास देतोस त्यामुळे बघ दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो. हे सर्व तुझे मित्र आहेत. आपण एकाच वर्गात आहोत. काल तुझी पेन्सिल हरवली होती, तेव्हा मनूने तिची दिली होती ना? असेच एक दुसऱ्याला मदत करायचे. आता तू त्यांना त्रास दिला नसतास तर, तुला पण त्यांनी बरोबर घेतले असते."

"चिनू, सॉरी बोल सर्वांना आणि पुन्हा असे करणार नाही बोल. तू गुड बॉय आहेस ना?" त्याचे बाबा त्याला समजावत म्हणाले.

चिनूने सर्वांची माफी मागितली आणि त्याला एका संघात जागा मिळाली. त्यापासून चिनूने मस्ती करायचे सोडले नाही, पण त्रास मुद्दाम कोणाला दिला नाही.

त्याने दिलेल्या त्रासामुळे आणि केलेल्या खोड्यांमुळे त्याला तशी एकटेपणाची वागणूक मिळाली होती.


तात्पर्य:- चुकीचे काम केल्यावर चांगल्या कामाची अपेक्षा करू नये आणि आपण दिलेल्या त्रासामुळे दुसऱ्यांचे नुकसान करू नये.