Login

गोष्ट तिच्या स्वाभिमानाची

स्त्रीच्या स्वाभिमानाची गोष्ट!

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा

नेहा तिची बॅग घेऊन रूममधून बाहेर आली तसा रोहित चांगलाच घाबरला. आत्तापर्यंत त्याला नेहा उगीच रागात बोलत आहे असेच वाटत होते पण यावेळी प्रकरण खूप जास्त चिघळले गेले आहे याचा प्रत्यय नेहाची बॅग पाहून रोहितला आला. तो सोफ्यावरून उठला आणि नेहा समोर जाऊन उभा राहिला.

"रोहित प्लीज बाजूला होss"

"नेहा अगं आपली नेहमीच अशी छोटी मोठी भांडण होत असतात. सोड ना राग आता, बास झालं.." रोहित नेहाला जवळ घेत बोलू लागला तशी नेहा त्याच्यापासून दूर झाली.

"रोहित प्लीज ही अशी लाडीगोडी मला लावू नकोस.. हे खरं आहे की आपली नेहमीच अशी भांडणे होत राहतात पण यावेळी गोष्ट वेगळी आहे.. " नेहाने तिची बॅग पुढे ओढली तसा रोहितने तिचा हात पकडला आणि तिला मागे खेचले.

"रोहितsss" नेहा जोरात ओरडली.

"नेहा कायं लावलं आहेस तू हे? हे बघं यावेळी अती होतय तुझं. एवढा कायं राग कामाचा? आणि एका छोट्याशा गोष्टीमुळे घर सोडून जाण्यात कुठलं शहाणपण आलं आहे?

मला वाटलं होतं तू एक शांत, समंजस मुलगी आहेस. आततायीपणा वगैरे करणार नाहीस पण तु मला पूर्णपणे चुकीच ठरवलं. लोक अगदी बरोबर म्हणतात की मुलींच्या प्रेमावर विश्वासच ठेऊ नये.

मी एवढा जीव लावतो तुला. कायम तुला हवे नको ते सगळे पाहतो. आपली भांडण झाली की मी कायम ते मिटवण्याचा प्रयत्न करत असतो कारण मला कुठल्याही प्रकारची गोष्टीपेक्षा नातं महत्त्वाचं वाटतं. आज तुझ्या या वागण्यावरून हे नक्कीच लक्षात येत आहे की तुला आपल्या नात्यापेक्षाही जास्त तुझा इगो, हट्टीपणा महत्त्वाचा आहे. " रोहित मनांत येईल ते बोलून मोकळा झाला.

रोहितचे बोलणे ऐकून नेहा अजूनच दुःखी झाली.
" व्वा! रोहत तू माझ्याबद्दल जो विचार करतोय ते ऐकून अजून काहीच ऐकायची इच्छाच उरली नाही माझी खरंतर पण तरीही तुला काही बोलायचे आहे.

कायं म्हणाला तू की कायम भांडणं झाल्यावर तू माफी मागून मोकळा होतो कारण तुला नातं महत्त्वाचं वाटतं तर मी नक्कीच तुला आठवण करून देऊ इच्छिते की आपली जेव्हाही भांडणं होतात त्या बहुतांश वेळी चूक तुझी असते. रोहित तुला चांगलेच ठाऊक आहे हे की एकदा का तुला राग अनावर झाला की तू काहीही बोलतोस अगदी वाटेल तसे.

आजपर्यंत आठवून बघं तू किती काही बोलला आहेस मला रागात पण तरीही प्रत्येक वेळी मी तुला माफ करत आले आणि आजपर्यंत मी तुला समजून घेतले कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि छोट्याश्या भांडणांमुळे आपलं नातं ही तोडायची नव्हत मला कधीच पण काल मात्र तू माझा स्वाभिमान दुखावला आहेस.

रोहित आजपर्यंत मी सगळे सगळे ऐकून घेतले तुझे केवळ तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी पण तू काल जे काही बोललास ते कुठलेही स्त्री सहन करूच शकणार नाही. " नेहाला बोलता बोलता भरून आले.

" नेहा काल ते जरा पार्टीत गमतीत चालू होते सगळेss "रोहित नमतं घेत बोलतो.

" ही अशी गंमत ज्याने एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जाईल? "

" सॉरी ना शोनाsss " रोहित तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करतो तशी नेहा त्याला पुन्हा दूर ढकलते.

"रोहित प्लीजsss.. तुला अजूनही त्या गोष्टीचा पश्चाताप वाटत नाहीये तू गंमत म्हणतोय सरळ.. बास!

मला जाऊ दे रोहित मी नाही थांबणार यावेळी. कुठलीही मुलगी तिच्या नवर्‍याचे सगळे ऐकून घेते प्रेमापोटी पण जेव्हा तोच नवरा चारचौघांत तिचा अपमान करतो तेव्हा तिला सहन होतच नाही आणि काल तू तुझ्या पुरूषी अहंकाराखाली माझा स्वाभिमान चिरडला आहेस. आता तुझ्यासोबत राहणं मला अवघड आहे. "


" कसला स्वाभिमान गं? आणि जाऊन जाऊन कुठे जाशील? या जगात कोणं आहे तुझं? " रोहित छन्नी हसतो.

" हो या जगात तुझ्याशिवाय कोणी नाही माझं हे खरं आहे पण हे जग इतकं मोठं आहे त्यातल्या कुठल्याही कोपर्‍यात मला माझं एक छोटा नव जगं मिळेलच.

रोहित मी सुद्धा पैसे कमावते, चांगली शिकलेली आहे मी तरीही काल तू तुझ्या मित्रांसोबत बोलताना माझा अपमान केलास, माझ्या दिसण्यावरून त्यांच्यासमोर माझी खिल्ली उडवली भलेही ते गमतीत असेल पण तुला अधिकार नाही मला हे असे बोलण्याचा आणि तुझ्यापेक्षा मी कमी कमवत असले तरी हे असे चारचौघांत बोलायची तुला काहीच गरज नव्हती.

मी तुझ्या प्रेमामुळे आजपर्यंत सगळे काही मुकपणे गिळत आले होते पण आता मला माझा स्वाभिमान जपायचा आहे.. एक नव जग माझी वाट पाहतेय.." एवढे बोलून नेहा घराबाहेर पडली रोहित मात्र निर्विकार चेहरा घेऊन तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत होता कारण त्याच्या लेखी अजूनही त्याने कुठली चूक अशी केलीच नव्हती.

*समाप्त*