Login

घरटं भाग ३

घरटं
घरटं भाग ३

तळघरात एखाद्या प्राचीन मंदिरासारखी नीरव शांतता पसरली होती. इतकी, की स्वतःच्या श्वासाचाही आवाज अंगावर यावा. विराजच्या हातात असलेला मोबाईलचा टॉर्च थरथरत होता केवळ त्याच्या हाताने नव्हे, तर जणू तोही आतून हादरलेला. टॉर्चचा उजेड स्थिर न राहता थोडा इकडे तिकडे हलत होता, त्याच्या धडधडत्या छातीसारखा.

भिंतीवर एक जुना फोटो लटकवलेला होता. त्यावरचा रंग गेला होता, कडांवर गंज चढला होता. पण त्यातले चेहरे ओळखीचे , तरीही काही तरी वेगळं होतं त्याच्यात. विशेषतः डोळ्यांत. निर्विकार नजर, शून्यात पाहणारी. पण तरीही विराजला असं वाटलं की ती नजर थेट त्याच्यावर रोखलेली आहे.

तेवढ्यात वरच्या मजल्यावरून लहान मुलीच्या पावलांचे हलके टिपटीप आवाज ऐकू आले. काही क्षण ते चालू होते, आणि अचानक थांबले. ते थांबणं फारच अस्वस्थ करणारं होतं.एका कुजबुजत्या स्वरात कुणीतरी बोलले “दादा…”त्या एका शब्दाने विराजचा अवघा देह शहारला. शरीर जागेवर गोठलं.

“दादा… तू येशील ना?”तो आवाज कुठून आला हे न उमगताच, विराज नकळत जिन्याकडे धावला.

त्या जुनाट जिन्याच्या प्रत्येक पायरीवर धूळ होती. पायऱ्यांचे लाकूड हलकेसे कुरकुरत होते, जणू त्या घराने त्याच्या पावलांच्या ओळखी आठवाव्यात तसं काहीसं.

वर पोचताच विराजचा नजरेसमोर झोपाळा आला. पण आता त्याच्यावर एक चुरगळलेली पांढऱ्या रंगाची चादर अंथरलेली होती. झोपाळ्याच्या एका कोपऱ्यात एक बाहुली ठेवलेली होती जुनी, धुळकट, पण तिचे डोळे ते मात्र दरवाज्याकडे रोखलेले. नुसते बघणं नाही, तर जणू वाट पाहणं होतं.

विराज नकळत तिच्या दिशेने ओढला गेला. त्याचा हात पुढे सरकू लागला...इतक्यात एक हलकासा स्वर हवेत पसरला “आई म्हणायची, तो परत येईल रक्षाबंधनला... तुला तो विसरणार नाही या दिवशी तरी”त्या स्वरात काळजाला भिडणारी आर्तता होती. कुठलंसं जुनं दुःख, विसरूनही न विसरलेलं.

तेवढ्यात, एक झुळूक आली. विराजने भानावर येऊन मागे पाहिलं पण तिथे आता कोणी नव्हतं.होता तर फक्त काळोख.

पण भिंतीवर मात्र आता एक नवीन फोटो दिसू लागला. काही क्षण आधी नव्हता, आणि आता त्या फोटोत विराज होता. त्याच्या गळ्यात कॅमेरा. आणि त्याच्या शेजारी त्याची आई गरोदर होती विराज आपल्या आईच्या पोटावर हा ठेवून काही बोलत असावा.त्याच्या हातातून तो कॅमेरा खाली पडायचा बाकी होता इतका हादरला होता तो. “हे... कसं...” त्याचे शब्द ओठातच विरघळले.त्याने पुढे सरसावून बाहुली उचलण्यासाठी हात लांबवला आणि..सगळं घर एकाएकी थरथरू लागलं. काच फुटल्याचे आवाज, जणू भिंतीवर कोणी हातोड्याने घाव घालत होतं. झोपाळा जोरजोरात हेलकावू लागला. आणि त्याच दिशेने तोच स्वर आला “ते वचन तू विसरलास ना?”त्या स्वरात राग नव्हता. पण एक हळवा हंबरडा होता. एक तुटलेली आशा. एक वाट पाहत राहिलेली नजर.

कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all