Login

घरटं भाग ५

घरटं
घरटं भाग ५

त्या एका वाक्यानं विराज जमिनीवर बसूनच गेला. त्याचे हात थरथरत होते."मी… मी… कसे…?" त्याचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता."तुझं वचन होतं ना? म्हणाला होतास ना… की परत येशील रक्षाबंधनाला? माझ्यासाठी?"ती जवळ येत होती. तिच्या शब्दांमध्ये राग नव्हता. केवळ एक थकलेली तगमग होती आणि विराजच्या डोळ्यांपुढं ते सगळं चमकून गेलं.लहानपण. गाव. आई-बाबांचं नेहमीचं भांडणं. आईचं एकटं रडणं.आई गरोदर असतानाच्या आठवणी आणि एक आगीचा भडका.

त्याने स्वतःच्या डोळ्यांनी आई-वडीलांना आगीत भस्म होताना पाहिलं होतं. आणि त्याच वेळी, आठवलं त्याची आई गरोदर होती. एक दिवस तिनं त्याला सांगितलं होतं, "लवकरच तुझ्याकडे भाऊ किंवा बहीण येईल."आणि विराजनं त्या क्षणी हट्टाने म्हटलं होतं “आई, मला बहीणच हवी. मी तिला सोडून कुठं जाणार नाही. दरवर्षी राखी बांधून घेणार... सांगणार सगळ्यांना की माझी हि बहीण आहे.”पण ती आग सगळं घेऊन गेली. विराज तिथंच बेशुद्ध झाला. आणि जेव्हा शुद्धीत आला, तेव्हा तो मुंबईला होता आजीच्या घरी. त्या गावाची, त्या आगीतली, त्या बहिणीची आठवण विसरून टाकायचा हट्ट त्याच्या आजीनं लावला आणि काळाच्या धुक्यात कुठंतरी हरवलेलं ते सगळं.पण त्या घरानं त्याला विसरलं नव्हतंसमोर उभी असलेली ती मुलगी… ती त्याचीच बहीण होती.त्याच्या मनातून हरवलेलं, पण काळजाच्या कप्प्यात अजूनही दडपून बसलेलं ते एक ऋण.त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

"मी परत आलोय," तो कुजबुजला, "माफ कर… काहीच आठवत नव्हतं. पण आज रक्षाबंधन आहे… बांधशील ना राखी, या वेड्या भावाला?"ती गालातल्या गालात हसली. तिच्या फ्रॉकच्या खिशातून एक साधीशी राखी काढली. शांतपणे तिच्या भावाच्या हातात बांधली. आणि पायांजवळ वाकत म्हणाली, “धन्यवाद , दादा.”विराजनं पुढं होत तिच्या डोक्यावर हात ठेवला.तेव्हाच तिचं शरीर एक लहर घेत विरघळू लागलं. तिचं रूप पांढरं होत गेलं. डोळे शांत झाले. चेहऱ्यावर एक समाधानाचा प्रकाश उमटला.

"धन्यवाद दादा… तू ओळखलंस. आता इथं शांतता नांदेल. पण मला विसरू नकोस. ती आग… बाबांच्या चुकीमुळे लागली होती. देवाचा दिवा त्यांनी दारूच्या नशेत पाडला होता तो पडद्यावर पडला आणि घर भस्मसात झालं."त्या शब्दांनंतर जणू भिंतींवरचं ताणतणावाचं जाळं तुटून गेलं.एक थंड, मृदू झुळूक आली. यावेळी ती भितीदायक नव्हती. ती हवीहवीशी वाटणारी होती सुटकेची.दार आपोआप उघडलं.त्या कॅमेरामधून लाल लाईट पेटू लागली त्येनं पहिले तर त्या कॅमेरामध्ये विराजच्या आयुष्यातल्या हरवलेल्या आठवणींची नव्याने साक्ष देत होती.विराज दारातून बाहेर पडला. एकदा मागे वळून पाहिलं.ते मोडकळीस आलेलं घर आता त्याचं घर नव्हतं ते त्याचं घरटं होतं.

विराजच्या पायाखाली कोकणातली ओलसर लाल माती होती. खांद्यावर कॅमेरा, पण नजर मात्र कुठे हरवलेली जणू आत खोल कुठे शांततेचा शोध घेत होती.हो, शांतता.तीच शांतता जी त्याने अनेक वेळा मुंबईतल्या गोंगाटात शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तिथं ती कधीच सापडली नव्हती.आणि इथे या एका जुनाट, मोडकळीस आलेल्या घरात जिथं गावकऱ्यांच्या मते काहीतरी "शापित" होतं तिथं त्याला ती शांतता लाभली होती.शांततेमागचं कारण त्याला उमगायला वेळ लागला नाही त्या घरातलं एक अधुरं वचन पूर्ण झालं होतं. कोणीतरी वाट पाहणं थांबवलं होतं. ओझं हलकं झालं होतं.

मुंबई, काही दिवसांनी.स्टुडिओमध्ये विराज एकटाच बसलेला.लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक फोल्डर सेव्ह केलेला "माझं घर".त्याने तो ओपन करून एकेक करून फोटो उघडायला सुरुवात केली.ते घर,तो जुना झोपाळा,भिंतींवर विळखा घातलेल्या जुन्या जाळ्या धुळीने झाकलेली फोटोंची फ्रेम्स आणि मग शेवटी एक फोटो.
त्याच्या बहिणीचा चेहरा. धूसर, पण त्यावर हसू.तो फोटो पाहता पाहता विराजच्या चेहऱ्यावर काहीसं हसू उमटले.ह्यावेळी त्याच्या कॅमेऱ्यानं तो क्षण फक्त टिपला नव्हता तर मनाने अनुभवला होता.तो फोटो त्याने प्रिंट केला, नीट फ्रेम करून आपल्या खोलीत लावला. फोटोच्या खाली एक वाक्य लिहिलं:काही वचने अपुरी राहतात… पण आठवणी त्यांच्या पूर्णत्वाचा ध्यास सोडत नाहीत."

कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all